गंगुबाई काठियावाडी

अनाथ मुले आणि वेश्याव्यवसायिकांच्या समाजसेविका

गंगुबाई काठियावाडी उर्फ गंगा मा ह्या एक गुजराती भाषिक परंतु मुंबईत स्थाईक झालेल्या समाजसेविका होत्या. मुंबईतील कामाठीपुरा परिसरात त्या अनाथ मुले आणि वेश्याव्यवसायात अडकलेल्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रसिद्ध होत्या.[१]

गंगुबाई काठियावाडी
जन्म गंगा हरजीवनदास काठियावाडी
१९३९
काठियावाड, गुजरात
मृत्यू २००८ (६८ वर्षे)
कामाठीपुरा, मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
वांशिकत्व गुजराती
नागरिकत्व भारतीय
पेशा समाजसेविका, राजकारणी
जोडीदार रमणिक लाल
वडील हरजीवनदास

त्यांचे मूळ नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी असे होते. त्या मूळच्या गुजरात मधील सौराष्ट्र (जुने नाव काठियावाड) येथील रहिवासी होत्या. हिंदी चित्रपटात काम करण्याच्या वेडापायी त्या आपल्या प्रेमीसोबत मुंबईत पळून आल्या आणि कामाठीपुऱ्यात स्थाईक झाल्या.[२]

वैयक्तिक आयुष्य संपादन

मूळ नाव गंगा असलेल्या गंगुबाईचे वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या वडिलांकडे असलेल्या लेखापाल (अकाउंटंट) असलेल्या रमणिकलाल वर प्रेम जडले. या लग्नाला घरून विरोध असल्यामुळे हे दोघे गुजरात हुन मुंबईला पळून आले आणि लग्न करून कामाठीपुऱ्यात राहू लागले.[२][३]

माफिया क्वीन्स ऑफ मुंबई संपादन

पत्रकार आणि लेखक हुसैन एस झैदी यांनी विविध माहिती गोळा करून इ.स. २०११ साली 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' नावाचे एक पुस्तक प्रकाशित केले. यात मुंबईवर प्रभाव पडणाऱ्या एकूण तेरा महिलांच्या जीवनावर माहिती लिहिलेली आहे.[४][५] यात जैदी यांनी गंगुबाई यांची देखील माहिती दिली आहे. या ग्रंथानुसार गंगुबाई या उच्चशिक्षित घरातील होत्या. त्यांना चित्रपटात काम करण्याचे वेड होते. सोळा वर्षाच्या गंगुबाई आणि अठ्ठावीस वर्षांचे त्यांचे पती 'रमणिकलाल' मुंबईत पळून आले आणि लग्न करून राहू लागले. लग्नाच्या अवघ्या काही दिवसात केवळ ५०० रुपयांसाठी त्यांच्या पतीने त्यांची कुंटनखण्यात विक्री केली. अनिच्छेने गंगाची गंगुबाई झालेल्या त्या वेश्या व्यवसायाचे काम करू लागल्या. अल्पावधीतच गंगुबाई काही कुंटनखण्याच्या प्रमुख झाल्या. 'शौकत खान पठाण' नावाचा एक गुंड त्यांचे आर्थिक आणि शारीरिक शोषण करू लागला. एकदिवस त्याची माहिती काढून गंगुबाई तत्कालीन अंडरवर्ल्ड डॉन 'अब्दुल करीम खान' उर्फ 'करीम लाला' कडे गेल्या आणि शौकत खानची तक्रार केली. करीम लाला यांनी गंगुबाई यांना मदतीचे आश्वासन दिले. यामुळे गहिवरून गंगुबाई ने त्यांना राखी बांधली. यानंतर शौकत खानला करीम लालाने चांगलाच चोप दिला आणि चांगलीच समज दिली. तेव्हा पासून करीम लालाची मानलेली बहीण म्हणून गंगुबाईंचा मार्केट मध्ये दरारा वाढला. हा काळ १९६० च्या दशकांचा होता. याच काळात कामाठीपुऱ्यात 'सेंट अँथनीज गर्ल्स हायस्कूल' ही मुलींची शाळा उभी राहिली. यामुळे तेथील कुंटनखाने हलवण्याचा आदेश निघाला. गंगुबाई यांनी याला प्रखर विरोध केला तसेच आपले म्हणजे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापुढे प्रभावीपणे मांडले. यामुळे तेथील कुंटनखाने हलवल्या गेले नाही. याकाळात गंगुबाई अनाथ मुले आणि वेश्या व्यवसायातील महिलांच्या विविध समस्यांसाठी काम करत असत. चित्रपटात काम करण्याच्या वेडापायी पळून आलेल्या आणि वाम मार्गाला फसणाऱ्या अनेक तरुण युवतींना गंगुबाई यांनी समुपदेशन करून परत आपापल्या घरी पाठवले. या कारणाने गंगुबाई यांना सर्वजण आदराने 'गंगा मां' असे म्हणत असत. इतकेच नाही तर त्यांच्या मरणोपरांत (७० च्या दशकात) त्यांचे फोटो आणि पुतळे यांची तेथील सर्व कुंटनखण्यात उभारणी करण्यात आली.[६][७]

चित्रपट संपादन

'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' पुस्तकावर आधारित संजय लीला भन्साळी यांनी सलमान खान आणि आलिया भट्ट याना घेऊन 'इन्शाअल्लाह' नावाने एक चित्रपट काढण्याचे ठरवले. परंतु काही कारणाने या चित्रपटाची निर्मिती झाली नाही. यानंतर लवकरच भन्साळी यांनी याच कथेवर आलिया भट्ट आणि अजय देवगण यांना घेऊन गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाची निर्मिती केली.[१]

विवाद संपादन

गंगूबाई काठियावाडी चित्रपटात गंगुबाईना मुंबईतील वेश्या व महिला गुंड दाखवण्यात आले आहे. त्यांचे दत्तक पुत्र बाबू रावजी शाह यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या आई सदरील चित्रपटात दाखवल्या वेश्या अथवा गुन्हेगार नव्हत्या, तर त्या केवळ एक समाजसेविका होत्या. या चित्रपटाच्या निर्मिती पूर्वीच शाह यांनी चित्रपट निर्माते संजय लिला भन्साळी, आलिया भट्ट आणि लेखक हुसैन जैदी यांच्यावर मुंबईच्या न्यायालयात याचिका दाखल करून चित्रपटावर स्थगितीची मागणी केली होती. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला तसेच निर्मात्या विरुद्धच्या मानहानीच्या कारवाईला अंतरिम स्थगिती देखील दिली. आता चित्रपट निर्मिती नंतर गंगुबाईंच्या नावाने झालेल्या बदनामीमुळे त्यांचे कुटुंबीय अस्वस्थ झाले असून त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना आपली ओळख लपवत वारंवार घर बदलावे लागत असून, त्यांनी नव्याने परत एक याचिका दाखल केली आहे.[८]

संदर्भ संपादन

  1. ^ a b "गंगूबाई काठियावाडी: कोण होती गंगूबाई काठियावाडी, ५०० रुपयांसाठी नवऱ्याने होतं विकलं". maharashtratimes.com. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ a b "गंगुबाई काठियावाडी'ला कुटुंबियांचाच विरोध; बदनामी केल्याचा आरोप". esakal.com. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "आलिया भट साकारत असलेल्या 'गंगुबाई काठियावाडी' नेमक्या कोण होत्या?". books.rediff.com. Archived from the original on 2020-01-15. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "Mafia Queens Of Mumbai: Stories of Women From The Ganglands (English) (Paperback)". books.rediff.com (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2022-02-19. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "Mafia queens of Mumbai | The life of gangster girls". livemint.com (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2013-08-17. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "आलिया भट साकारत असलेल्या 'गंगुबाई काठियावाडी' नेमक्या कोण होत्या". bbc.com. Archived from the original on 2020-01-15. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "गंगूबाई कोठेवाली-पति ने 500 में बेचा था, भंसाली उनपर फिल्म बनाएंगे". hindi.thequint.com. Archived from the original on 2021-04-24. 2022-02-19 रोजी पाहिले.
  8. ^ "'गंगूबाई काठियावाडी'वरून नवा वाद, मुलगा म्हणाला 'माझी आई समाजसेविका होती, पण चित्रपटात....'". एबीपी माझा. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन