खैर(कात), (शास्त्रीय नाव: Acacia catechu, अकॅशिया कॅटिचू ; इंग्लिश: Black Catechu (ब्लॅक कॅटिचू), Mimosa catechu (मिमोसा कॅटिचू); संस्कृत खदिर) हा १५ मी. उंचीपर्यंत वाढणारा पानझडी, काटेरी वृक्ष आहे. चीन, आग्नेय आशिया, भारतीय उपखंड व हिंदी महासागराच्या परिघावरील भूभाग या प्रदेशांत हा निसर्गतः आढळतो. याच्यापासून काथ हा विड्याचा घटकपदार्थ बनवला जातो.

खैराची पाने, शेंगा, बिया यांचे वनस्पतिशास्त्रीय रेखाचित्र

खैराचा आढळ प्रामुख्याने आशिया खंडातील भारत, चीन, पाकिस्तान, ब्रह्मदेश इत्यादी ठिकाणी असतो. या झाडाच्या कोवळ्या फांद्या िपगट रंगाच्या असतात. जून खोडाची साल करडी खरखरीत असते. पाने संयुक्त असून पिसासारखी दोन भागांत विभागलेली असतात. खैराची फुले पिवळ्या रंगाची असतात. त्यांना देठ नसतो. पानाच्या बगलेत किंवा कणसाच्या स्वरूपात पातळ, सपाट टोकाला निमुळत्या होत गेलेल्या शेंगा वृक्षावर येतात. या शेंगांमध्ये ३ ते ८ बिया असतात. खैराचे लाकूड कठीण आणि टिकाऊ असते. त्याला वाळवी लागत नाही. त्यामुळे त्याचा उपयोग लाकडी खांब, हत्यारे अवजारे, बासरी, होड्या इत्यादी वस्तू बनवण्यासाठी होतो.

आयुर्वेदात खैर संपादन

खैराच्या झाडाच्या अतिजून, लालसर मध्यकाष्ठापासून पाण्यात उकळवून काढलेल्या पदार्थास कात (किंवा काथ) म्हणतात.

खैराच्या बिया प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत. आयुर्वेदीय औषधांमध्ये मुखविकार, डायरिया यावर औषध म्हणून कात वापरतात. तसेच तोंडाला चव आणण्यासाठी पचनक्रिया सुधारण्यासाठी व दाताचे आरोग्य सुधारण्यासाठी, तसेच त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी काताचा वापर करतात. कात कफ कमी करून गळा साफ करतो. अतिसार, आमांश पोटात दुखणे इत्यादींसाठी काताची पूड अणि मध घेतात. अधिक वेळा लघवी होत असल्यास कातपूड वापरतात. काताचा उपयोग जखम लवकर भरून येण्यासाठी होतो. तसेच उपदंशच्या व्रणावरही कात उपयुक्त आहे. कात पाचक, रक्तशोधक आणि कफनाशक असून खदिरवटी, खदिरादी तेल या आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरतात. खैराचे लाल खैर, सोनखैर असे इतर प्रकार आहेत.

धार्मिक, सांस्कॄतिक संदर्भ संपादन

हिंदू मान्यतेनुसार खैर मृग नक्षत्राचा आराध्यवृक्ष मानला जातो.

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत