खगोलशास्त्रीय संकल्पना
खगोलशास्त्राशी संबंधित अशा अनेक संकल्पना आहेत, त्या जर नीटपणे माहीत नसतील तर खगोलशास्त्राचे वाचन केले तरी त्यातून नक्की अर्थबोध होत नाही. अशा काही संकल्पनांची येथे माहिती दिली आहे . ---
- भगोल
- पृथ्वीच्या गोलाला भूगोल आणि आकाशाच्या गोलाला भगोल म्हणतात.
- खगोल
- निरीक्षकाला आकाशाचा जो भाग दिसतो त्याला खगोल म्हणतात.
- क्रांतिअंश, विषुवांश
- भूगोलावर जसे अक्षांश आणि रेखांश, तसे भगोलावर क्रांतिअंश आणि विषुवांश. भूगोलावरील शून्य अंशाचे वृत्त म्हणजे विषुववृत्त आणि ९० अंशाचे वृत्त म्हणजे पृथ्वीचे उत्तर-दक्षिण ध्रुव. त्याच धर्तीवर भगोलाचे वैषुविक वृत्त आणि उत्तर-दक्षिण शाश्वतबिंदू होत.
- क्रांतिवृत्त आणि होरावृत्त
- वैषुविक वृत्ताशी काढलेल्या समांतर वृत्तांना क्रांतिवृत्त म्हणतात, आणि वैषुविक वृत्ताशी काटकोनात असणाऱ्या व उत्तर दक्षिण शाश्वतबिंदूंतून जाणाऱ्या वृत्तांना होरावृत्ते म्हणतात.
- खगोलावरचे सहनिर्देशांक--उन्नतांश आणि क्षित्यंश
- पृथ्वीच्या विषुववृत्तापासून जसजसे तिच्या ध्रुवबिंदूकडे जावे तसतशी उन्नति शून्य अंशापासून नव्वद अंशांपर्यंत चढते. उत्तरेकडील उन्नतांश+(अधिक) आणि दक्षिणेकडील उन्नतांश- (उणे) मानतात. क्षितिजपातळीपासून एका ठराविक दिशेपासून दुसऱ्या दिशेपर्यंत मोजलेले कोनात्मक अंतर म्हणजे क्षित्यंश होय. क्षित्यंश पूर्वेकडे शून्य अंश ते +१८० अंशापर्यंत अणि पश्चिमेकडे शून्य अंश ते -१८० अंशापर्यंत असू शकतात.