क्रिकेट मैदान अंडाकृती आकाराचे असून याचा व्यास सुमारे १३० मीटर असतो. याच्या मधोमध २०.११ मी. (६६ फूट) लांब व ३.०४ मी. (१० फूट) रुंद अशी खेळपट्टी तयार करण्यात येते.

खेळपट्टी दोन प्रकारची असू शकते. एकात खेळपट्टीवर हिरवळ असते, तर दुसऱ्या प्रकारात खेळपट्टीवर चटई (मॅटिंग) अंथरली जाते. खेळपट्टीच्या मध्यबिंदूपासून मैदानावर ६८.५८ मी. (७५ यार्ड) अंतरावर गोलाकार सीमारेषा आखली जाते. सीमारेषेचे अंतर जास्तीत जास्त ६८.५८ मी. असावे, असा प्रायोगिक नियम आहे. या सीमारेषेच्या कक्षेतील भाग म्हणजे क्रिकेटचे एकूण क्षेत्र (फील्ड) होय. सीमारेषा लांबून दिसावी, म्हणून तिच्यावर पांढरी फक्की टाकली जाते किंवा दोर बांधण्यात येतो. तसेच ठराविक अंतरावर निशाणे ठोकली जातात.