के.रा. छापखाने
केशव रामचंद्र छापखाने (२७ नोव्हेंबर, इ.स. १८७५ - १३ फेब्रुवारी, इ.स. १९४०) हे एक मराठी पत्रकार, नाटककार व लेखक होते. त्यांनी शेक्सपियरच्या रोमियो अँड ज्युलिएट या नाटकाचे ’मोहनतारा’ या नावाचे मराठी रूपांतर केले. यांचे मूळ आडनाव कानिटकर होते परंतु त्यांचे खापरपणजोबा गंगाधर रामचंद्र यांचेपासून छापखाने हेच नाव रूढ झाले.
के.रा. छापखाने यांचे शिक्षण कोल्हापुरातील राजाराम कॉलेजात आणि नंतर पुण्यातील डेक्कन कॉलेजात झाले. ते एम.ए. एल्एल.बी. होते. हे सर्व शिक्षण त्यांनी शिष्यवृत्त्या आणि स्वकष्टार्जनाने केले होते. एल्एल.बी.नंतर त्यांनी सांगलीत येऊन यशस्वी वकिली केली. लोकमान्य टिळकांचे ते चांगले स्नेही होते. छापखाने एक नामांकित वक्ते होते. त्यांचा ज्ञानेश्वरीचाही व्यासंग होता. डॉ. ॲनी बेझंट यांच्या संपर्कात आल्याने त्यांना थिऑसॉफीच्या अंतर्वतुळात प्रवेश मिळाला होता. सांगलीतल्या थिऑसॉफिकल सोसायटीचे ते अध्यक्ष होते.
के.रा. छापखाने हे इ.स. १९१३ (की १९०८?) साली पुणे शहरात भरलेल्या ९व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते.
नट रामभाऊ गोखले, नानबा गोखले व कानिटकर नावाचे एक स्त्रीपार्टी नट यांनी नव्याने स्थापन केलेल्या ’सामाजिक नाटक मंडळी’ या कंपनीसाठी के.रा. छापखाने यांनी, [[शेक्सपियर][]च्या रोमियो अँड ज्युलिएट या नाटकाचे मराठी रूपांतर असलेले मोहनतारा हे नाटक लिहिले. ’मोहनतारा’चा पहिला प्रयोग इ.स. १९०६ साली झाला. पुढेही अनेक प्रयोग होत राहिले.. मात्र हे नाटक पुस्तकरूपात १९०८ साली आले. शेक्सपियरच्या या नाटकाची त्यापूर्वी तीन भाषांतरे झाली होती, पण छापखाने यांचे रूपांतर सर्वात सरस आहे असा तत्कालीन रंगकर्मींचा अभिप्राय होता.
के.रा. छापखाने यांनी लिहिलेली पुस्तके
संपादन- जे. कृष्णमूर्ति संदेश-परिचय’ (१९३४)
- स्वाध्याय ज्ञानेश्वरी : राजाराम कॉलेजमधील व्याख्यान-मालिकेसाठी केलेली टिपणे, मुद्रित स्वरूपात (१९३३-३४)
- प्रणवसंदेश - मुद्रित झालेले, पण अधिकृतरीत्या प्रकाशित न झालेले पुस्तक.
- मोहनतारा (नाटक, शेक्सपियरच्या रोमियो अँड ज्युलिएटचे मराठी रूपांतर - १९०८)