कुळीथ (हुलगा, कुळथी गु. कुलीत हिं. कुलथी क. हुरुळी सं. कुलीथक इं. हॉर्स ग्रॅम, मद्रास ग्रॅम लॅ. डॉलिकॉस बायफ्‍लोरस, कुल-लेग्युमिनोजीउपकुल-पॅपिलिऑनेटी) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती व एक प्रकारचे कडधान्य आहे. कुळीथ या कडधान्यात भरपूर लोह असते.[१] पावट्याच्या वंशातील ही शिंबावंत (शेंगा येणारी) वेल उष्णकटिबंधात सामान्यपणे आढळते. अनेक शारीरिक लक्षणांत हिचे पावट्याच्या वेलीशी साम्य असले तरी काही फरक आहेत. हिची वेल वर्षायू (एक वर्ष जगणारी) असून फुले पतंगरूप, पिवळी आणि शिंबा लांब व वाकड्या असतात. त्यात पाच-सहा पिंगट, तांबूस किंवा काळ्या बिया असतात.

कुळीथ (अथवा हुलगा)

स्त्रियांस मासिक स्रावाच्या दोषांवर कुळिथाच्या बियांचा काढा देतात. उचकी, मूळव्याध, यकृताचे दोष यांवरही गुणकारी आहे लठ्ठपणा (मेदवृद्धी) कमी होण्यास व मुतखडा निचरून जाण्यास उपयुक्त असते. आजाऱ्याला अतिशय घाम येत असल्यास कुळथाचे पीठ सर्वांगास चोळतात. कुळीथ व मिरी यांचा काढा गंडमाळा व गालगुंडावर पिण्यास देतात. कुळथाचे दाणे भरडून, भिजवून अगर शिजवून दुभत्या आणि कष्टाळू जनावरांना पौष्टिक खाद्य (खुराक) म्हणून चारतात. दाण्यांची उसळ, कट अगर सार करतात. दाण्यांच्या पिठाचे पिठले वा गूळ घालून खाद्यपदार्थ बनवितात. पाला गुरांना चारतात. हे कडधान्याचे पीक मुख्यत्वेकरून भारताच्या दक्षिण भागात– आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यांत– मोठ्या प्रमाणावर काढतात. मध्य प्रदेशात व महाराष्ट्रातही काही प्रमाणावर कुळीथ पेरतात. इतर कडधान्ये माणसांच्या आहारात प्रथिनांची भर घालण्याकरिता वापरतात, पण कुळीथ हे विशेषतः जनावरांच्या खुराकाकरिता वापरतात.

लागवडसंपादन करा

लागवड केल्यापासून साधारणतः ९० दिवसांमध्ये कुळीथ पीक तयार होते. सध्या हे कुळीथ (अथवा हुलगा) कडधान्य जवळजवळ नामशेष झाले आहे, कारण पूर्वी याची लागवड करणारे शेतकरी आता त्या ऐवजी जास्त मागणी असणाऱ्या सोयाबीनचे पीक घेतात. तसेच पीक काढणीला वेळ झाल्यास कुळीथ(हुलगा) टरफल फुटून बाहेर सांडतो आणि शेतात विखुरतो, परिणामी नुकसान होते.

हंगामसंपादन करा

हे पीक पावसाळी असून काही ठिकाणी जून-जुलै महिन्यात, तर काही ठिकाणी जुलै-ऑगस्ट महिन्यात कोरडवाहू पीक म्हणून पेरतात. साडेतीन ते चार महिन्यांत पीक तयार होते.

जमीनसंपादन करा

कुळथाचे पीक जरी भारी काळ्या जमिनीपासून ते अगदी हलक्या, रेताड व खडकाळ जमिनीत वाढत असले, तरी बहुधा हलक्या जमिनीतच घेतले जाते. जिथे इतर कडधान्ये अगर तृणधान्ये पिकत नाहीत अशा जमिनीत कुळीथ घेतात.

मशागतसंपादन करा

जमीन एकदोन वेळा नांगरतात. काही वेळा नांगरीतही नाहीत, दोन-तीन वेळा कुळवून काम भागवितात. ज्वारी, बाजरी, कपाशीमध्ये ते मिश्रपीक म्हणूनही घेतात. त्यावेळी मुख्य पिकाला जी मशागात दिली जाते, तिचा फायदा कुळिथाला मिळतो.

खतसंपादन करा

भारी जमिनीत या पिकाला खत व वरखत क्वचितच घालतात. हलक्या जमिनीत हेक्टरमध्ये ५,००० ते ६,००० किग्रॅ. शेणखत अगर कंपोस्ट खत आणि २५ किग्रॅ. नायट्रोजन व ५० किग्रॅ. फॉस्फरस पुरविण्यातइतके वरखत घातल्याने उत्पन्न चांगले येते. नायट्रोजन जास्त प्रमाणात दिल्यास पीक फोफावते पण शेंगा मात्र कमी लागतात.

पेरणीसंपादन करा

दक्षिण भारतात काही ठिकाणी कुळथाचे बी फोकून पेरतात इतरत्र ते तिफणीने पेरतात. पेरणी इतर कडधान्यांच्या पिकांपेक्षा सामान्यतः दाट करतात आणि पिकाची विरळणी करीत नाहीत. हेक्टरमध्ये २५–३० किग्रॅ. बी पेरतात. पिकांच्या दोन ओळींत ३० सेंमी. अंतर ठेवतात.

आंतर मशगतसंपादन करा

साधारणतः या पिकाला दोनदा कोळपणी देतात. ते जमिनीवर पसरून जमीन झाकून तणाची वाढ होऊ देत नाही म्हणून निंदणीची आवश्यकता नसते. ते मटकीप्रमाणे जमिनीतील ओल टिकवून धरते.

काढणी-मळणीसंपादन करा

पाने पिवळी पडून गळण्याची सुरुवात झाली की पीक उपटतात, खळ्यात आणून वाळवून मूग अगर उडदाप्रमाणे त्याची बैलांच्या पायांखाली तुडवून मळणी करतात.

उत्पन्नसंपादन करा

कुळथाच्या पिकापासून हेक्टरी ३५०–५०० किग्रॅ. दाणे मिळतात. भुसकटही मिळते ते जनावरांना चारतात. चांगली काळजी घेतलेल्या एका हेक्टरातील पिकाचे उत्पन्न ७५० किग्रॅ. अगर अधिक येऊ शकते.

रोग व किडीसंपादन करा

कुळथावर रोगराई विशेष नसते. तथापि कधी-कधी पाने पिवळी व पांढरी पडणे (व्हायरसजन्य रोग), मुळे कुजणे हे रोग होतात. ‘यलो मोझेक’ रोगामुळे पिकाचे उत्पन्न बरेच घटते. यावर उपाय म्हणून रोगप्रतिबंधक वाणाचे बी वापरतात.

याला कीटकांचाही विशेष उपद्रव होत नाही. साठवणीतल्या दाण्यांना मात्र पोरकिडा लागतो. यासाठी साठवण करताना योग्य प्रकारे काळजी घेतात.[२]

पदार्थसंपादन करा

कुळीथापासून उसळ, पिठी किंवा पिठले आणि लाडू तयार केले जाते. कुळीथ(हुलगा) भाजून फुटाण्यासारखा ही खाल्ला जातो.

आयुर्वेदातील कथित औषधी गुणसंपादन करा

कुळीथामुळे वातकफ कमी होतो. कुळीथ मुतखड्यावर औषधाप्रमाणे काम करतात. मेद वाढला असता, सूज आली असता, जंत झाले असता हितकर असतात.

संदर्भसंपादन करा

  1. ^ "कुळीथ (Horse gram)". ३१ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  2. ^ "कुळीथ". ३१ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.