(क. गोमळे; लॅ. सिडेरोझायलॉन टोमेंटोजम; कुल-सॅपोटेसी). साधारण मध्यम आकाराचा हा सदापर्णी वृक्ष महाराष्ट्रात सर्वत्र सदापर्णी जंगलांत, बेळगाव व कारवार येथे शिवाय पेगू, श्रीलंका येथेही आढळतो. ह्याची साल भेगाळ असून बाजूच्या लहान फांद्यांचे काट्यांत रूपांतर झालेले आढळते. कोवळ्या फांद्या, पाने, फुले इत्यादींवर भुरकट लव असते. त्यावरून याच्या लॅटिन नावातील जातिनिर्देशक शब्द योजला गेला आहे. पाने ५–११ x ३–४ सेंमी., जाड, साधी, एकाआड एक, दीर्घवृत्ताकृती, वरून चकचकीत व खालून फिकट असतात. फुले पांढरी , लहान, थोडी सुवासिक असून कक्षास्थ (बगलेत) गोलसर झुबक्यांनी ऑक्टोबर – जानेवारीत येतात. त्यांची संरचना ] ⇨ सॅपोटेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे; संदले व प्रदले पाच; केसरदले व वंध्यकेसर मिळून दहा व एकांतरित (एका आड एक) ; किंजल लांब आणि प्रदलाबाहेर डोकावणारा [ →फूल]; मृदुफळ अंडाकृती, बोराएवढे, पिवळट हिरवे व बी बहुधा एक, गुळगुळीत, चकचकीत असते. फळ खाद्य असून भाजी, आमटी, लोणचे यांकरिता उपयुक्त आहे. शोभेकरिता व सावलीकरिता ही झाडे बागेत आणि रस्त्यांच्या दुतर्फा लावतात. लाकूड कठीण असून घरबांधणीला वापरतात.