काली माता मंदिर, देव्हाडी (तुमसर रोड)
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
[ चित्र हवे ] काली माता मंदिर हे भंडारा जिल्ह्यातील देव्हाडी (तुमसर रोड) रेल्वे स्थानकावर स्थित आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ते दोन रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी वसलेले आहे. मुंबई-हावडा मुख्य रेल्वे मार्गावर असलेल्या या मंदिराशी अनेक पुराणकथा आणि रहस्यमय आख्यायिका जोडल्या गेल्या आहेत. या मंदिराची स्थापना ब्रिटिशांच्या काळात झाली असून, तेव्हापासून येथे स्थानिक भक्तांसोबत रेल्वेचे कर्मचारी आणि प्रवासी श्रद्धेने नतमस्तक होत असतात.[१]
मंदिराचा इतिहास आणि आख्यायिका
संपादनब्रिटिशांच्या काळात रेल्वेमार्ग बांधकामादरम्यान, देव्हाडी रेल्वे स्थानकाजवळ काली मातेचे मंदिर अडथळा ठरत होते. मंदिराचे स्थान रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी येत असल्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मंदिर हटवण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, काली मातेला हलविण्यात अपयश आले. एक आख्यायिका सांगते की, मुख्य अधिकाऱ्याच्या स्वप्नात देवी प्रकट झाली आणि मंदिर न हलवण्याचा इशारा दिला. अखेरीस इंग्रजांनी मंदिर तिथेच ठेवण्याचा निर्णय घेतला आणि रेल्वे ट्रॅक मंदिरानुसार समायोजित केला.[१][२]
काली मातेच्या शिळा हलल्या नाहीत
संपादनप्रथम येथे सगुण मूर्ती नव्हती, फक्त काही शिळा होत्या. कामगारांनी या शिळा हलवण्यासाठी लोखंडी साखळ्या आणि वाफेच्या इंजिनाचा (steam locomotive) वापर केला. मात्र, त्या हलवता आल्या नाहीत. अखेरीस, ब्रिटिश अधिकाऱ्यांना काली मातेसमोर नतमस्तक व्हावे लागले आणि मंदिर जसेच्या तसे ठेवण्यात आले.[१]
आख्यायिका
संपादनस्थानिक गुप्ता कुटुंबाची सेवा
संपादनरेल्वे प्रवास सुरू झाल्यानंतर, दहीवडा विक्रेते रामदिन गयाप्रसाद गुप्ता यांनी मूळ शिळांजवळ काली मातेची सुंदर मूर्ती स्थापित केली. मूर्तीचे संरक्षण करण्यासाठी लहानसे छप्पर उभारले गेले. आजही या कुटुंबाचे वंशज, शंकर गुप्ता आणि यश गुप्ता, मंदिराची सेवा करतात. रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचाही येथे सहभाग असतो, विशेषतः दसऱ्याच्या दिवशी पूजा अधिकाऱ्यांच्या हस्ते केली जाते.[३]
उज्जैनच्या भक्ताची कथा
संपादनमध्य प्रदेशातील उज्जैन येथील एका भक्ताची मनोभावे पूजा आणि मंदिराला दिलेली घंटा प्रसिद्ध आहे. त्या भक्ताने आपल्या कुटुंबात मूलबाळ नसल्याची मनोकामना काली मातेसमोर व्यक्त केली होती. काही वर्षांत त्याच्या घरी पाळणा हलला, त्यानंतर तो दरवर्षी तुमसर रोड स्टेशनला काली मातेचे दर्शन घेण्यासाठी येतो.
महत्त्व
संपादनचैत्र आणि शारदीय नवरात्रांमध्ये येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते. अष्टमीला हवन आणि नवमीला महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. वर्षभर येथे दररोज सकाळ-संध्याकाळ आरती केली जाते.[३]
रेल्वेचे जुने कर्मचारी त्यांच्या मूळ गावी परतल्यावरही वर्षातून एकदा काली मातेचे दर्शन घेण्यासाठी येतात. रेल्वे कर्मचारी, अधिकारी आणि प्रवासी यांच्यासाठी हे मंदिर श्रद्धेचे अढळ स्थान बनले आहे.
संदर्भ
संपादन- ^ a b c NavbharatLive (2022-09-27). "दो रेल पटरियों के बीच स्थित काली माता का मंदिर". Navabharat (हिंदी भाषेत). 2024-10-29 रोजी पाहिले.
- ^ "A railway station where faith has a permanent platform ticket". 2023-10-23. ISSN 0971-8257.
- ^ a b NavbharatLive (2022-04-03). "रेल्वे स्टेशन के बीच बसे काली मंदिर में नवरात्रि के कलश हुए स्थापन". Navabharat (हिंदी भाषेत). 2024-10-29 रोजी पाहिले.