काय डेंजर वारा सुटलाय

मराठी नाटक

काय डेंजर वारा सुटलाय हे जयंत पवार यांचे एक मराठी नाटक आहे.

काय डेंजर वारा सुटलाय
लेखन जयंत पवार
व्यक्तिरेखा सत्यविजय नरहरी दाभाडे, मिसेस दाभाडे, बंटी, चिंगी; बबन येलमामे,
भाषा मराठी
देश भारत
विषय रहिवासी - बांधकाम व्यावसायिक ताणतणाव
पार्श्वभूमी महानगारातील अपार्टमेंटचे पुर्नबांधकाम व्यवसायातून रहिवासी - बांधकाम व्यावसायिक उत्तर आधुनिक समाजातील ताणतणाव
निर्मिती महाराष्ट्र रंगभूमी
दिग्दर्शन अनिरूद्ध खुटवड[]
संगीत गंधार संगोराम
नृत्यदिग्दर्शक आदेश वैद्य व सिद्धेश दळवीं
नेपथ्य प्रदीप पाटील
प्रकाशयोजना अनिरूद्ध खुटवड / नामदेव रोड्डे [ दुजोरा हवा]
ध्वनिव्यवस्था सचिन घाणेकर व प्रसाद ओक
रंगभूषा राजेश परब
वेशभूषा सोनल खराडे
कलाकार अनिल गवस, मृणाल चेंबूरकर, अक्षय शिंपी, पूर्णानंद वांढेकर, संजय देशपांडे, सिद्धेश शेलार, अमृता मापुसकर, नितीन भजन, दीपक कदम, राजहंस शिंदे, निशांत, प्रकाश पेटकर, वैखरी पाठक, विशाल राऊत, उदय दरेकर.

नव्वदनंतरचे महानगरी जीवन; जागतिकीकरणाच्या लाटेत सामान्य माणसाची झालेली कोंडी; भांडवलशाहीत पैशाच्या मागे जाणाऱ्या सर्व व्यवस्था; खाजगीकरण, उदारीकरणामुळे हतबल झालेली लोकशाही; सामान्य माणसाला वजा करून बिल्डर, राजकारणी आणि पोलीस यांच्या कह्यात गेलेल्या संरक्षण, न्याय, राजकारण, आरोग्य इत्यादी व्यवस्था; न्याय, नैतिकता, समता, हक्क, कर्तव्य, कायद्याचे राज्य या मूल्यांच्या जपणुकीबाबत समाजाची उदासीनता- असे समकालीन वास्तव हे नाटक मांडत जाते. या अर्थाने १९९० नंतरचा उत्तर आधुनिक समाज, त्याचे जगणे आणि त्याची संस्कृती-मूल्ये यांचे संदर्भच कसे बदलले आहे, ते हे नाटक अधोरेखित करते. महानगरी जीवनातील सामान्य माणसाचे अस्वस्थ वर्तमान आणि असुरक्षित जगणे समोर आणते; आणि आजच्या राजकीय, सामाजिक व्यवस्थेचा बुरखाही फाडते. []

नाटकाचे कथानक

संपादन

सत्यविजय नरहरी दाभाडे हे मुंबईतील कुसुमकुंज बिल्डिंगमध्ये मधील एका फ्लॅटमध्ये राहणारे मध्यमवर्गीय, सज्जन, पापभिरू, प्रामाणिक व कुटुंबवत्सल गृहस्थ. शिक्षिकेच्या पेशातून सेवानिवृत्ती घेतलेली, शुगर आणि बी. पी.ची पेशंट असलेली बायको; सिनेमा, टीव्ही सिरीयलचे आकर्षण असलेला तरुण मुलगा बंटी; आणि एम.बी.ए.ची पूर्वतयारी करणारी आणि एका तरुणाच्या प्रेमात पडलेली मुलगी- यांसह ते या इमारतीत गेली तीस वर्षे राहत आहेत. दाभाडे सेफ इंडिया इन्शुरंसमध्ये ऑफिसर आहेत. कीर्तनकार वडिलांच्या पोटी जन्मलेल्या दाभाडे यांचा सांभाळ त्यांचे आईवडील लहानपणीच गेल्यामुळे इंदूरच्या कीर्तनकार काकांनीच केला. त्यामुळे कीर्तनकाराचा गप्पीष्टपणा आणि शुचिता त्यांच्या बोलण्या-वागण्यात आहे.

कुणाच्या अध्यात मध्यात नसणाऱ्या या सज्जन कुटुंबाच्या फ्लॅटवर बिल्डरची नजर पडते. त्यांच्या बेडरूमला सी-फेस असल्यामुळे त्याची वाट्टेल ती किंमत मोजायला तो तयार आहे. मात्र आपल्या प्रेमाचा साक्षी असलेला, मुंबईत आल्यावर जवळ घेणारा आणि त्यांच्या खिडकीतून दिसणारा हा समुद्र भाबड्या दाभाड्यांना आपला वाटतो, तर  त्यांच्या पत्नीला तो हिंस्र- सिंहासारखा आयाळ पसरलेला वाटतो. हा समुद्रच आता त्यांच्या मुळावर येतो. बिल्डरच्या मुलाला तो सी-फेस असलेलाच फ्लॅट हवा आहे. तीस वर्षापासून राहत असलेल्या घराशी भावनिक बंध जुळलेले असल्यामुळे दाभाड्यांना मात्र तो विकायचा नाही. पैशाने दाभाडे बधत नाही हे पाहून बिल्डर दुसरा मार्ग वापरतो.

एका पहाटे दाभाडे यांच्या घरात एक वृद्ध जोडपे लिमयांचे घर विचारत त्यांच्या शिरतात. त्यांचा टॅक्सी ड्रायव्हर बिलाच्या पैशावरून वाद उकरून काढतो. दाभाडे मध्ये पडतात तेव्हा त्यांनाच घेरतात. ते प्रवासी नसून बिल्डरने पाठवलेले घुसखोर असतात. ते घर खाली करण्यासाठी दम देतात. दाभाडे पोलिसांना फोन करतात. पण तेही आधी टाळाटाळ करतात, उशिरा पोचतात. तोपर्यंत दाभाडे यांच्या घराचा पूर्ण ताबा घेतात. पुढे घडणाऱ्या अनेक घटनांतून लोकशाहीतील पोलीस, न्याय, संरक्षण, वैद्यक, प्रशासन, राजकीय व सामाजिक व्यवस्थांचा फोलपणा नाटककार आपल्या समोर मांडत जातो. 

समकालीन जीवनभाष्य

संपादन

दाभाडेंचा फ्लॅट मुळात त्यांच्या परदेशातील काकांचा आहे. त्यांच्याकडून काही लेखी कागदपत्र त्यांनी तयार करून घेतलेले नाही. फक्त सोसायटीच्या मेंटेनन्सच्या पावत्या त्यांच्याकडे असतात, त्याही ज्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये आहेत, त्यावर घुसखोरांनी सर्व समान रचून ठेवलेले असतात. उलट काकांनी फ्लॅट विकल्याचे कागदपत्र घुसखोरांजवळ असतात. त्यामुळे आतली खोली घुसखोरांना, बाहेरची दाभाडे यांना, तर संडास बाथरूम तासांच्या हिशेबाने कॉमन अशी घराची विभागणी करून इन्स्पेक्टर निघून जातो.

बिल्डर दडपशाहीने त्यांच्या आजूबाजूचे फ्लॅट आधीच बळकावतो. त्यामुळे शेजारी दाभाड्यांना मदत करत नाही. सोसायटीचे सेक्रेटरी बाजी प्रभाकर देशपांडे त्यांच्या मदतीला येतात. ते दाभाड्यांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातात, तर मुख्यमंत्रीच हतबल असतात. ते म्हणतात, ‘शेवटी माणसाला किती जागा लागते? साडेतीन हात. आजच्या तारखेला तुम्हाला एक रूम आणि बाथरूम या शहरात मिळत असेल तर सफिशंट आहे...विकास दर दहा टक्क्यांवर न्यायचाय..(यासाठी) दाभाडे तुम्ही मला हवे आहात.’ (पृ. ५९-६०)

या साऱ्यांमुळे वैतागून दाभाडे आपल्या लोकशाही व्यवस्थेवरच चिडतात. ते म्हणतात, ‘नष्ट करून टाका ती लोकशाही. ज्याला हवं ते करायची मुभा देते लोकशाही. गोंधळ घालते. मग त्यात सुमार लोकांना महत्त्व येतं आणि हुशार लोकांचा अपमान होतो...लोकशाहीतल्या निवडणुका म्हणजे मिडीऑक्रिटीचा धुडगूस...राज्यक्रांती झाली. मध्यमवर्गाला सत्तेत वाटा मिळाला. संपली क्रांती...गरिबांना स्वातंत्र्य नाही. गरिबांना समता नाही. गरिबांशी बंधुभाव?

शक्यच नाही. असा आप्पलपोटा मध्यमवर्ग बरोबर घेऊन जीडीपी दहा टक्के करायचाय आपल्याला?’ (पृ. ६०)

जागतिकीकरणात लोकशाहीचे स्वरूप व सामान्यांना प्राप्त होणारे बकालपण ह्यावर कडवट भाष्य या संवादात येते. विकासाच्या व्याख्येबद्दलच इथे प्रश्न उपस्थित केला जात आहे. दाभाडे आधुनिक लोकशाहीची तत्त्वे आणि प्रत्यक्ष लोकशाहीचे स्वरूप यांची विसंगतीही दाखवून देतात आणि आधुनिकतेची उलटतपासणी घेतात. हे नाटक जागतिकीकरण या सामाजिक- सांस्कृतिक व्यवस्था यांवर उत्तर आधुनिक भाष्य करते.

आधुनिकतेने समोर आणलेल्या तत्त्वज्ञानाच्या मर्यादा दाखवत नाटककार उत्तर आधुनिक मांडणी करू पाहतात. दाभाडे म्हणतात, पूर, भूकंप यांप्रमाणेच मर्डर, रायटस ह्या देखील नैसर्गिक आपत्तीच आहेत. जेव्हा बंटी अमेरिकेतील ९/११चा दहशतवादी हल्ला निसर्गानेच घडवला का, असा उलट प्रश्न विचारतो; तेव्हा दाभाडे त्या कृतीची भावनाच कशी मूलभूत आहे ते सांगतात. ‘निसर्गानेच! माणसाच्या मेंदूतल्या नैसर्गिक भावनांनी. त्याला रेप्टाईल कॉप्लेक्स म्हणतात.’ (पृ. ११) हा रेप्टाईल कॉप्लेक्स मानवी मेंदूत उत्क्रांतीच्या टप्प्यात निर्माण होतो. अशाप्रकारे वरवर मानवी कृती वाटणारी हिंसक गोष्टही कशी नैसर्गिक आहे, ते दाभाडे सांगतात.

जीवशास्त्र, उत्क्रांती व मनोविज्ञान यांच्या आधारे आधुनिक ज्ञान-संकल्पनाही दाभाडे नाकारत जातात. भालचंद्र नेमाडे जसे उपरोधाच्या पातळीवर आपल्या कादंबऱ्यात उत्क्रांती, मनोविज्ञान व पुरातत्त्वशास्त्र नाकारतात व मानववंशशास्त्राच्या आधारे मानवी वर्तन व संस्कृतीचा  शोध घेऊ पाहतात; तसेच जयंत पवारही मानवी वर्तन व सांस्कृतिकडे मानववंशशास्त्राच्या नजरेतून पाहतात. दाभाडे म्हणतात, ‘तत्त्वज्ञानाचा जन्म भीतीतून होतो. त्यामुळे ज्याला मरणाची भीती वाटते त्याला मी तत्त्वज्ञान ऐकवतो.’ (पृ. ११) इथे तत्त्वज्ञानाच्या निर्मितीमागचे कारण सांगत, आपल्या संत परंपरेतील दया, क्षमा या मूल्यांचीही तपासणी केली जाते. दाभाडे म्हणतात, ‘दयामाया खरी नव्हेच. क्रोध, हिंसा, लढाया ह्याच खऱ्या. राग, लोभ, हेवा, मत्सर ह्या उपयुक्त गोष्टी आहेत. दुष्टपणा उपयुक्त नसता तर माणसाच्या उत्क्रांतीत तो नष्ट झाला नसता? नित्शे तर म्हणतो, माणूस उत्क्रांत होत जाताना हा दुष्ट्पणाच कामी येणाराय त्याच्या. (पृ.६२) उत्क्रांतीतही माणसाच्या हिंस्रता, दुष्टपणा या आदिम भावना टिकून राहिल्या, त्या मानवी सांस्कृतिक विकासात नष्ट झाल्या नाहीत; कारण त्या उपयुक्त व मूलभूत आहेत, असे दाभाडे म्हणतात.

संदर्भ

संपादन
  1. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/drama/-/articleshow/6384459.cms
  2. ^ काय डेंजर वारा सुटलाय : वर्तमान महानगरी वास्तवाचे उत्तर आधुनिक दर्शन, डॉ. देवानंद सोनटक्के, युगवाणी, नागपूर,