काठी पूजा

छडी पूजा
(काठीपूजा या पानावरून पुनर्निर्देशित)

काठीपूजन ही मानवी इतिहासात विविध समुदायात केली गेलील एक प्राचीन पूजा-परंपरा आहे. नॉर्वेजियातील Mære चर्च, इस्रायलमधील Asherah pole या काठी पूजा परंपरा ज्यू धर्माच्या स्थापनेपूर्वीच्या काळात प्रचलित पूजन पद्धती होत्या

भारतीय उपखंडात बलुचिस्तानच्या हिंगलाज देवीस काठी सोबत यात्रेने जाण्याची प्रथा आहे. मध्यप्रदेशातील निमाड प्रांतात काठी मातेची पूजा आणि काठी नृत्याची परंपरा आहे[] डॉ. बिद्युत लता रे यांच्या मतानुसार ओरीसा राज्याच्या आदीवासींमध्ये प्रचलित खंबेश्वरी देवीची पूजा हा काठी पूजेचा प्रकार असून खंबेश्वरीची पूजा वैदिक हिंदू धर्मातील मुर्तीपुजांपेक्षा प्राचीन असावी.[]

गुजरातमधील गरबा हे काठी नृत्यच असते. तेव्हा पूजा मात्र गरबीची (भोके पाडलेल्या आणि आत दिवा ठेवलेल्या एका मातीच्या छोट्या माठाची) करतात.

महाराष्ट्र

संपादन

चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षारंभादिनादिवशी साजरा होणाऱ्या गुडी पाडव्याला महाराष्ट्रात गुडीच्या काठीची पूजा करतात. महाराष्ट्रात जोतिबाच्या यात्रेत काठ्यांची मिरवणूक आणि पूजा असते.

खांबदेव

संपादन

ठाणे जिल्ह्यातील तिसगाव येथे तिसाई मातेच्या मंदिरासमोर २० फूट उंचीचा खांबदेव असून चैत्र पौर्णिमेस देवीची पालखी फिरवून झाल्यानंतर खांबदेवास तिखट नैवेद्याचा मान दिला जातो. हा खांबदेव येणाऱ्या संकटांपासून गावाचे रक्षण करतो असे समजले जाते.[] आदीवासी समाजातील गावीत, वळवी, पाडवी, वसावे, नाईक या जमातीत अपघाती मृत्यू झालेल्या मृतव्यक्तींच्या स्मृतीप्रित्यर्थ खांबदेवांची स्थापना करून ‘खांबदेव’ या देवतेची पूजा केली जात असताना लोकगीतांचे गायन केले जाते.[]

विरगावची काठीकवाडी

संपादन

डॉ. सुधीर राजाराम देवरे यांच्या अहिराणी लोकपरंपरा या ग्रंथातील काठीकवाडी लेखानुसार, नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यातील विरगाव येथे गुढीपाडव्या पासून अक्षय तृतीयेपर्यंत येणाऱ्या प्रत्येक सोमवारी (सहसा चार किंवा पाच सोमवार येतात) रात्री संपूर्ण गावात काठीकवाडी मिरवणूकीने मिरवली जाते.

काठीकवाडी मिरवणूकीसाठी एक भगत असतो, डफ नावाच्या वाद्यावर शंकराची लोकगीते म्हटली जातात. काठीकवाडीच्या पूजेसाठी घरोघरच्या अंगणात पाट मांडून ठेवले जातात. दारासमोर कठीकवाडी आली की गल्लीतल्या पाटावर ती उभी केली जाते. स्त्रिया शंकराच्या पिंडेची व मुर्तीची पाण्याने अथवा दुधाने अंघोळ घालून पूजा व आरती करतात. भगताजवळ दक्षिणा देतात. त्यानंतर काठीकवाडी उचलून पुढच्या घरासमोरच्या पाटावर घेऊन जातात. आळीपाळीने काठी एकमेकांकडे देत मिरवणूक संपूर्ण गावात फिरते.[]

काठीकवाडीच्या काठीची रचना

संपादन

काठीकवाडी म्हणजे एक खूप उंच आणि जोड काठी असते,काठीकवाडीची रचना पुढीलप्रमाणे केलेली असते. सर्वात खाली चंदनाची एक जाड काठी असते. तिच्या वरच्या टोकाला एक जाड बांबू जोडलेला असतो. आणि त्या जाड बांबूला पुन्हा एक कमी जाडीचा पण उंच असा बांबू जोडलेला असतो. अशा पद्धतीने ह्या काठीकवाडीची रचना असते. माणसाच्या छाती इतक्या उंचीवर या काठीला एक आडवी फळी जोडलेली असते. या आडव्या फळीवर पितळाची शंकराची मुर्ती आणि पिंड जोडलेली असते. गुढीपाडव्याच्या दिवशी गावकरी ही काठी नदीतून स्वच्छ धुऊन आणतात. तिची यथासांग पूजा करून संपूर्ण काठीला लाल नवे कापड गुंडाळतात. काठीच्या वरच्या टोकाला मोरपिसे आणि भगवे कापड फडकवून ठेवतात. अशी ही संपूर्ण सजवलेली काठीकवाडी एका घराच्या ओट्यावर उभी करून हवेने पडू नये म्हणून दोरीने घट्ट बांधून ठेवतात.[]

गड्डा यात्रेतील नंदीध्वज

संपादन

सोलापुरला गड्डा यात्रेत ७ काठ्यांची मिरवणूक असते. संक्रांतीला ही यात्रा भरते. यांना नंदीध्वज असे म्हणतात. ह्या काठ्या श्री सिद्धरामेश्वराच्या योगदंडाचे प्रतिक असतात. एका कुंभारकन्येला श्री सिद्धरामेश्वरांशी विवाह करायची इच्छा होती. त्यासाठी तिने घोर तप केले. श्रींना तर विवाह करायचा न्व्हता तेंव्हा आपल्या योगदंडाशी विवाह करायला संमती दिली. त्यांनंतर ती कुंभारकन्या होमात सती गेली. हा विवाह सोहोळा दरवर्षी साजरा केला जातो. संमती, अक्षता, होम आदि सर्व विधी होतात. ह्या काठ्या पूर्ण सजवलेल्या आणि साधारणपणे ३०-४० फूट ऊंच असतात. एकेक व्रतस्थ मानकरी ती काठी पेलतो. हा मान वेगेवेगळ्या जातीतील लोकांना आहे.[]

जतर काठी

संपादन

कोकणात चैत्र महिन्यात होणाऱ्या विविध देवस्थानांच्या यात्रांमध्ये आजूबाजूच्या गावांमधून "जतरकाठी" येते. जतरकाठी अर्थात जत्राकाठी हा पूर्ण वाढ झालेला पंधरा वीस फ़ुटांचा अखंड बांबू असतो. हा बांबू रंगीत कापड गुंडाळून झाकलेला असतो तसेच त्याला घुंगरू, फुलांचे हार इत्यादींनी सजवलेला असतो. जत्रेच्या आदल्या रात्री वाजत गाजत आणि नाचत ही "जतरकाठी" निघते आणि जत्रेच्या दिवशी देवस्थानाला पोहचते. तिथे या काठीची विधीवत पूजा होते.[]

संदर्भ

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भयादी

संपादन
  1. ^ http://sczcc.gov.in/MP/InternalPage.aspx?Antispam=u2ITHGrOy8d&ContentID=57&MyAntispam=uNPdqlozS8K [मृत दुवा]
  2. ^ http://odisha.gov.in/e-magazine/Orissareview/sept-oct-2005/engpdf/The%20Concept%20of%20the%20Goddess%20Khambhesvari.pdf
  3. ^ "संग्रहित प्रत". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-09-17 रोजी पाहिले.
  4. ^ आदीवासी लोकगीत आणि ललित साहित्याचा अनुबंध -विलास जयंत गावीत ‘Research Journey’ I nternational Multidisciplinary E- Research Journal Vol. 1 Issue. 1 ISSN : 2348-7143 (Online) Jan-March - 2014
  5. ^ a b लेख नाव: 'काठीकवाडी' ग्रंथ: अहिराणी लोकपरंपरा लेखक - डॉ. सुधीर राजाराम देवरे प्रकाशन ग्रंथाली मुंबई
  6. ^ http://www.misalpav.com/comment/738426#comment-738426
  7. ^ http://www.misalpav.com/comment/738410#comment-738410