कस्तुरबा गांधी
कस्तुरबा मोहनदास गांधी (जन्म : ११ एप्रिल १८६९; - २२ फेब्रुवारी १९४४, पुणे) या महात्मा गांधी यांच्या पत्नी होत्या. त्यांना प्रेमाने बा असे संबोधले जायचे.
कस्तुरबा मोहनदास गांधी | |
---|---|
११ एप्रिल १८६९ ते २२ फेब्रुवारी १९४४ | |
टोपण नाव: | बा |
जन्म दिनांक: | ११-४-१८६९ |
मृत्यु दिनांक: | २२-२-१९४४ |
धर्म: | हिंदू |
गोकुळदास माखजी या पोरबंदर येथील श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी जन्मलेल्या [१]कस्तुरबांचा विवाह मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाला. लग्नाच्या वेळी दोघांचेही वय १३ वर्षे होते. लग्नसमयी त्या निरक्षर होत्या- त्यांना गांधीजींनी लिहावाचायला शिकवले. त्यावेळच्या स्त्रियांच्या स्थितीचा विचार करता ही एक धक्कादायक गोष्ट होती. १८८८ साली जेव्हा गांधीजी विद्याभ्यासासाठी लंडन येथे गेले, तेव्हा कस्तुरबा तान्हुल्या हरिलालचे संगोपन करण्यासाठी भारतातच राहिल्या. त्यांना आणखी तीन मुले होती- मणिलाल (जन्म :)इ.स. १८९२, रामदास (जन्म : इ.स. १८९७) आणि देवदास (जन्म : इ.स. १९००).
१९०६ साली गांधीजींनी ब्रम्हचर्य पालनाचा निर्णय घेतला. कस्तुरबांनी या निर्णयास खंबीर साथ दिली. गांधीजींचे अनेक निर्णय त्यांना पटत नसत. एखादी कल्पना त्यांच्या गळी उतरवण्यासाठी गांधीजींना बरेच परिश्रम पडत. असे असूनही गांधीजींच्या प्रत्येक निर्णयात त्या त्यांच्याबरोबर राहिल्या. त्या खूप धार्मिक होत्या. असे असूनही, आपल्या पतीप्रमाणेच त्यांनी जातिभेदाचा त्याग केला व सर्व जातिधर्मांच्या लोकांबरोबर त्या आश्रमात राहिल्या.
कस्तुरबा गांधींनी पतीच्या राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतला.[२] १८९७ साली त्या महात्माजींबरोबर राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेस गेल्या. १९०४-१९१२ दरम्यान त्या दरबान शहराजवळील फिनिक्स वसाहतीमध्ये समाजकार्यात मग्न होत्या. १९१३ मधील भारतीय मजुरांच्या शोषणाविरोधातील चळवळीत त्यांना ३ महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. त्या महात्माजींच्या तुरुंगवासाच्या काळात त्यांनी भारतामध्ये चळवळीचे कार्य सांभाळले. १९१५ मध्ये गांधीजी निळीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रहासाठी जेव्हा परतले, तेव्हा कस्तुरबाही त्यांच्याबरोबर भारतात आल्या. त्यांनी या शेतकऱ्यांच्या बायका आणि मुलांना साक्षरता आणि स्वच्छतेचे धडे दिले.
चरित्र
संपादनकस्तुरबा गांधी यांची अनेक चरित्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्यांतली ही काही :-
- कस्तुरबा (दा.पां. रानडे)
- कस्तुरबा (हिंदी नाटक, लेखक - आर..के.पालीवाल)
- कस्तुरबा एक समर्पित जीवन - लेखिका : माया बदनोरे सुरेखा देवघरे यांनी या पुस्तकाचा हिंदी अनुवाद केला आहे.
- कस्तूरबा गांधी (हिंदी चरित्र, लेखक - महेश शर्मा)
- राष्ट्रमाता कस्तूरबा (विश्वंभर शर्मा)
- द सीक्रेट डायरी ऑफ कस्तूरबा (इंग्रजी; लेखिका- नीलिमा डालमिया)
- बा (अनुवादित कादंबरी, मूळ हिंदी लेखक गिरिराज किशोर, मराठी अनुवाद - डॉ. अरुण मांडे)
- हमारी बा - कस्तुरबा (हिंदी चित्रपट; दिग्दर्शक सचिन कौशिक + मनीष ठाकुर)
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ अरुण गांधी (१९९८). The Forgotten Woman. झार्क माऊंटन पब्लिशर्स. pp. ३१४. ISBN ISBN 1-886940-02-9 Check
|isbn=
value: invalid character (सहाय्य). - ^ "कस्तुरबा देशातील पहिल्या सत्याग्रही:तुषार गांधी". Maharashtra Times. 2021-10-02 रोजी पाहिले.