बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील गुढीपाडवा आणि संदल हे सण मात्र वेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. बीड जिल्ह्यातील कळंबअंब्याचे हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेला हा गुढीपाडवा आणि संदल भारतातील गंगा-जमुना संस्कृतीच प्रतिक म्हणावे लागेल. बीड जिल्ह्यातील कळंबअंबा या गावातही गुढीपाडवा अन् संदलच्या माध्यमातून गावातील हिंदू आणि मुस्लिम नागरिकांचे ऐक्य गेल्या अनेक वर्षांपासून सांभाळले जात आहे. साधारणपणे साडेतीन हजार लोकसंख्या असलेला कळंबअंबा गावातील पाडव्याची यात्रचे एक वेगळे वैशिष्ट्ये आहे. पाडव्याच्या दिवशी कळंबअंब्याच्या केशरखान शहावली बाबाच्या दर्ग्याचा संदल असतो. याच दिवशी मराठी महिन्यानुसार नव्या वर्षाची सुरुवात हिंदू धर्मानुसार होते. हे दोन्ही उत्सव कळंबअंब्यात मात्र हिंदू आणि मुस्लिम वेगवेगळे न करता एकत्र येऊन साजरे करतात. यावेळी कळंबअंब्याच्या पंचक्रोशीतील अनेक लोक या कार्यक्रमासाठी गावात येतात. तसेच गावातील काही पाहुणेही या यात्रेला दरवर्षी येत असतात. पाडव्या दिवशी नवीन वर्ष सुरू होत असल्याने कळंबअंब्याच्या केशरखान शहावली बाबाच्या दर्ग्यात पंचाग वाचले जाते तर संध्याकाळी संदलच्या मिरवणुकीत हिंदू समाजातील नागरिकही सहभागी होतात. एवढेच नाही तर या संदलमध्ये सोंगाच्या गाड्याही असतात. एकूणच हिंदू आणि मुस्लिम समाजाला एकत्र गुंपणारा हा कळंबअंब्याचा पाडव्याचा आणि संदलचा सण भारतातील गंगा-जमुना तहजीबचा एक आदर्श नमुनाच म्हणावा लागेल. शहावली बाबाच्या दर्ग्यांचा उरूस यात्रा ही या दिवशी भरवली जाते. दुपारी केशरखान शहावाली बाबाच्या दर्ग्यात पांढऱ्या रंगाचा ध्वज हिंदू चढवतात. त्यानंतर गावातील भटपण करणारा ब्राह्मण नव्या वर्षाचे पंचाग दर्ग्यामध्ये वाचतो. हे पंचाग ऐकण्यासाठी हिंदू-मुस्लिम सारे गावकरी येतात. पर्जन्यमान कसे राहील , पिकपाण्याचा अंदाज काय राहील. तसेच कुठली पिक चांगली येऊ शकतील. कुठली पिक घेण्याचे शेतकऱ्यांनी टाळावे , पेरण्याला अनुकूल काळ कुठला राहील याची भाकनुकच या पंचागाच्या वाचनातून केली जाते. त्यानंतर केशरखान शहावली बाबा की जय , पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम , बजरंग बली की जय असा एकत्रित गजर पंचाग वाचनानंतर सर्व गावकरी मिळून करतात व संध्याकाळी केशर शहावाली बाबाचा संदल निघतो. या संदलमध्ये मुस्लिम समाजाच्या बरोबरच हिंदुही सहभागी होतात. संदलच्या मागे राम , कृष्ण यासारखे देवादिकांचे सोंगाच्या गाड्या असतात. तसेच भजनी मंडळ , आराधी मंडळही या संदलात सहभागी असतात. संध्याकाळी केशरखान शहावाली बाबाच्या संदल निमित्त कवालीचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कवालिचा आस्वाद गावातील सर्व नागरिक तसेच पंचक्रोशीतील नागरिक वर्षानुवर्षे घेत आहेत. दुसऱ्या दिवशी कुस्तीचा फड भरवून या यात्रेची सांगता होते.