करुणात्रिपदी

श्री दत्त प्रार्थना

करुणात्रिपदी हे वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी रचलेले स्तोत्र असून दत्त संप्रदायात या स्तोत्राला अनन्य साधारण महत्व आहे. करुणात्रिपदी ही नावाप्रमाणेच करुणा भाकणारी, आपण केलेल्या अपराधांची माफी मागून क्षमा करावी अशी प्रार्थना करणारी भावपूर्ण रचना आहे.[१]

नरसोबाची वाडी ही दत्त महाराजांची राजधानी मानली जाते. येथे नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे बारा वर्षे वास्तव्य होते. त्यांच्या 'मनोहर पादुका' कृष्णा नदीच्या काठावरील औदुंबर वृक्षाखाली स्थापन केलेल्या आहेत. या तिर्थेक्षेत्राची नित्यपूजेची व उत्सवांची सर्व पद्धत आणि आचारसंहिता ही वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी घालून दिलेली आहे. येथे आषाढ पौर्णिमा ते दसरा हा अडीच महिन्यांचा काळ सोडला तर बाकी वर्षभर दररोज संध्याकाळी श्रींची पालखी प्रदक्षिणा असते.[१]

इ.स.१९०५ मध्ये एकेदिवशी येथे पालखी प्रदक्षिणा सुरू असताना, पुजारी गुंडोपंत खोंबारे यांच्या हातून अनवधानाने श्रींची उत्सवमूर्ती पालखीतून खाली आली. काहीतरी अपशकुन झाला म्हणून सगळेजण घाबरले. त्यावेळी वासुदेवानंद सरस्वती स्वामी हिंगोली जिल्ह्यातील नरसी (नामदेव) येथे चातुर्मास्यानिमित्त मुक्कामी होते. तेथे पुजारी मंडळी त्यांना भेटायला गेली. पुजाऱ्यांच्या कडून ही घटना ऐकल्यावर वासुदेवानंद सरस्वती स्वामी ध्यानाला बसले. ध्यानात त्यांनी दत्त महाराजांना या बाबत विचारले असता, दत्तात्रेयांनी सांगितले की,"हे लोक नियमांनुसार वागत नाहीत, पादुकांवर अशुद्ध पदार्थ घालतात, तुझी निंदा करतात. आम्हांलाच तिथे राहायचा कंटाळा आला आहे. पंच नेमून परभारे व्यवस्था करावी !" मग वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी पुजाऱ्यांना कडक शब्दात तंबी देऊन परत पुन्हा असे न करण्याची सूचना देऊन परत एकदा नियमावली घालून दिली. तसेच त्यावेळेस त्यांनी दत्तात्रेयांची प्रार्थना करून काही पदांची रचना केली. हीच ती तीन पदांची करुणात्रिपदी म्हणून प्रसिद्धीस आली. तेथून पुढे दररोज पालखीच्या तिसऱ्या प्रदक्षिणेला तीन थांब्यांवर ही करुणात्रिपदी म्हटली जाते.[१]

करुणात्रिपदी

संपादन

मूळ करुणात्रिपदी स्तोत्र आणि त्याच्या भावार्थासाठी येथे टिचकी मारावी.

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c "करुणात्रिपदी'ची जन्मकथा". dattmaharaj.com. १८ ऑगस्ट २०१७ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ७ मार्च २०२३ रोजी पाहिले.