कंकालेश्‍वर मंदिर (बीड)

(कंकालेश्‍वर मंदिर, बीड या पानावरून पुनर्निर्देशित)

कंकालेश्वर मंदिर हे भारतात महाराष्ट्र राज्यातील बीड येथे असून ते एका ८४ मीटर चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी बांधण्यात आलेले शिव मंदिर आहे एक मोठ्या आकाराचा कट्टा आहे. या कट्ट्यावर १.५२ मीटर उंचीच्या जगतीवर बिंदुसरा नदीच्या तीरावर हे मंदिर उभे आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मंदिर परीसर प्रदूषित होत आहे या कडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे

बीड येथील कंकालेश्वर मंदिर

मंदिराची रचना

संपादन

कंकालेश्वर मंदिर हे पश्चिमाभिमुख असून मुखपंडप, त्याच्यामागे अर्धमंडप आणि या मंडपाला जोडून तीन बाजूंना अंतराळयुक्त गर्भगृहे असा तलविन्यास या मंदिराचा आहे. ही तीनही गर्भगृहे सारख्याच आकाराची असून त्यांचा तलविन्यास तारकाकृती आहे. या मंदिराचा मंडप अष्टकोनी आकाराचा आहे. मंडपाच्या चार मुख्य दिशांना आणि चार उपदिशांना दोन स्तंभ किंवा एक स्तंभजोडी आहे. या सोळा स्तंभांवर घुमटाकार छत पेललेले आहे. हे छत उत्तरोत्तर लहान होत गेलेल्या वर्तुळाकृती वलयांनी बनलेले आहे. छतावर फुलांची नक्षी आणि अलंकरण आहे. छताच्या मध्यभागी सर्वात वर कमळ आहे.

मंडप आणि गर्भगृहामधील स्तंभांची रचना चौरस तलविन्यासाची असून चौरस तळखड्याच्या वर काही अंतरावर अनुक्रमे अष्टकोनी, चौरस आणि वर्तुळाकार बनणारा चौरस खांब आणि खांबाच्या वर्तुळाकृती भागावर किचकहस्त असा या स्तंभांचा घटकक्रम आहे.

मंदिराच्या बाहेरील भागात विविध थर असून सगळ्यात खालचा थर चौकटच्या नक्षीने तर सगळ्यात वरचा थर कीर्तिमुखांनी अलंकृत केलेला आहे. मंदिराच्या बाहेरील अंगाच्या भद्रावरील देवकोष्ठांमध्ये शक्ती, ब्रह्मदेव आणि शिव संप्रदायातील देवदेवता आहेत. वर मंडोवरावरील जंघाभागात विष्णूचे दहा अवतार आणि अष्टदिक्पाल दाखविले आहेत.

कंकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहांची द्वारे पंचशाखा प्रकारची असून त्यावर कमळदल, पुष्प आणि व्याल यांचे अलंकरण आहे. या द्वरशाखांच्या खालच्या भागात कुंभ आणि चौरी धारण करणाऱ्या दासी आणि निधी दाखविले आहेत. मुख्य गर्भगृहाच्या ललाटावर गणेशमूर्ती आहे.

मंदिराविषयी

संपादन

बीडच्या स्थानिक इतिहासाचे प्रसिद्ध अभ्यासक डॉ. सतीश साळुंके यांनी या मंदिराचे पूर्णतः संशोधन केले. त्यांच्या संशोधनानुसार दहाव्या ते 11 व्या शतकात चालुक्य राजा विक्रमादित्य (सहावा) याने हे मंदिर बांधले. हे दशावतारी मंदिर आहे. चालुक्य काळातील स्त्रिया लढाईत प्रत्यक्ष भाग घेत असत. मंदिरावर लढणाऱ्या स्त्रियांचे शिल्प आहे. त्यावर ग्रीक शिल्पकलेची छाप आढळते. जैन धर्मियातील आर्यनाथ, नेमिनाथ या दोन तीर्थंकरांचे शिल्पही मंदिरावर आहे. मंदिराचा आकार स्टार फिशप्रमाणे असून मंदिराच्या मंडपाखाली आणखी एक गर्भगृह आहे. ते पाचशे वर्षांपासून बंद आहे. कंकालेश्वर मंदिर अनेक वष्रे बंद होते. तिथे खनकाह होते. पुढे महाशिवरात्रीच्या जत्रेलाही बंदी घालण्याचा निर्णय निझामाच्या मंत्रिमंडळाने घेतला. निझामाने सरकारी हुकूम काढून शामबुवा पाठक या पुजाऱ्यास मंदिरात पूजेसाठी नियुक्त केले. ही कोंडी फुटायला 1915 उगवावे लागले. क्रांतिकारी तरुण पुरुषोत्तम गोडसे याने निझामाला भीक न घालता पोलिसांचे कडे तोडून कंकालेश्वर मंदिरातील पिंडीला अभिषेक केला. 17 सप्टेंबर 1948 अर्थात हैदराबाद स्वातंत्र्यदिनी दिवशी हे मंदिर खऱ्या अर्थाने मुक्त झाले.[] या पुरातन मंदिराचा उल्लेख पुरण ग्रंथात ही आहे .अत्री ऋषी व अनुसया यांनी या ठिकाणी शिधेश्वराचा अभिषेक केला. ब्रम्ह-विष्णू -महेशाला प्रसन्न करून घेतल्याची दंतकथा सांगितली जाते .

चित्रदालन

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "खनकाह ते कंकालेश्वर".[permanent dead link]
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: