ऐतिहासिक भाषाशास्त्र
विविध कालखंडांतील भाषेच्या स्वरूपांचा अभ्यास ऐतिहासिक भाषाशास्त्रात केला जातो. निरनिराळ्या काळखंडांतील भाषा, तिचे बदलते स्वरूप आणि तिच्यात आलेल्या शब्दांच्या उत्पत्तीचे सिद्धान्त या सर्वांचा विचार ऐतिहासिक भाषाशास्त्रात केला जातो. भाषा ही सतत बदलणारी असते. मराठी भाषेच्या यादवकालीन मराठी भाषा, बहामनीकालीन मराठी भाषा, शिवकालीन मराठी भाषा अशा अनेक पायऱ्या आहेत. भाषेच्या संदर्भात ध्वनी, शब्द, प्रत्यय, शब्दार्थ अशा विविध घटकांमधे बदल होत असतात. आर्यभाषेपासून वैदिक भाषा अशाच काही भाषा निर्माण होत गेल्या, त्या सर्व भाषांचा अभ्यास भारतीय ऐतिहासिक भाषाविज्ञानात केला जातो. भाषेच्या बाबतीत कालानुक्रमे वर्गीकरण करणे, ऐतिहासिक विवेचन करणे, भाषेची अन्य भाषांशी तुलना करणे अशा प्रकारचा अभ्यास या शास्त्रात होतो.
भाषेचा अभ्यास प्राचीन काळापासून त्या काळाच्या शास्त्रानुसार हा अभ्यास केला जात असे. हा अभ्यास तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, धर्मशास्त्र, इतिहास या क्षेत्रातील भाषेच्या प्रश्नाची उत्तरे शोधण्यातून होत असे. बायबलमध्ये, पूर्वी एकच भाषा होती; परंतु देवानेच माणसांना भिन्न भिन्न भाषा दिल्या अशी भाषेची उत्पत्ती सांगितली आहे. या काळात भाषाविषयक अनेक गैरसमजुती होत्या. प्राचीन काळात ग्रीक आणि लॅटिन या श्रेष्ठ भाषा तर इंग्लिश, ही भ्रष्टभाषा अशी समजूत होती. दुसऱ्या एका समजुतीनुसार एकच भाषा असेल तरच समाजात एकोपा टिकून राहील; भाषा वैविध्य आले की, संघर्ष सुरू होतो, असे मत प्रचलित होते. भाषेच्या अभ्यासाच्या दृष्टीने पुढे धर्मग्रंथ, महाकाव्ये, हस्तलिखिते यांची चिकित्सा शैलीच्या अनुषंगाने करून या ग्रंथाचा काळ ठरवण्यात आला आणि अशा अभ्यासाला ‘भाषाभ्यास’ (Philology) असे नाव देण्यात आले.[१]
ऐतिहासिक भाषाशास्त्राची पार्श्वभूमी
संपादनसोळाव्या व सतराव्या शतकात भौगोलिक शोध आणि सांस्कृतिक निरीक्षणे यामुळे बायबल मधील कथा; इतिहास आणि भूगोल यांच्या कसोट्यावर टिकू शकल्या नाहीत. या अभ्यासातून अनेक शंका आणि भाषेचे वैविध्य समोर आले. या वैविध्यामुळे भाषा-भाषेमधला सारखेपणा दिसू लागला. या भाषा अभ्यासातून बायबलने सांगितलेला सहा हजार वर्षाचा काळ कमी वाटू लागला.
बायबलची अशी चिकित्सा सुरू झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने भाषेच्या ऐतिहासिक अभ्यासाला प्रारंभ झाला. पुढे विसाव्या शतकात आधुनिक भाषाशास्त्राचा उगम झाल्यानंतर भाषेचा अभ्यास करण्याच्या अनेक पद्धती उदयास आल्या. त्यापैकी एक म्हणजे ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धती होय. ही भाषाशास्त्रातील एक महत्त्वाची शाखा असून भाषा कशी जन्मली किंवा भाषेचे मूळ काय, या प्रश्नांच्या उत्तरातून भाषेच्या ऐतिहासिक अभ्यासाला सुरुवात झाली आहे.
ऐतिहासिक भाषाशास्त्राचा विकास
संपादनया ऐतिहासिक भाषाशाश्त्राचा उत्कर्ष १९ व्या शतकात युरोपमध्ये झाला. त्या काळात ही अभ्यासपद्धती शास्त्रीय व वैज्ञानिक मानली जात असे. १८५७ च्या आसपास ऐतिहासिक भाषाशास्त्रत दोन भाषांमधील कुलसंबंधाच्या संशोधनाला प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. इतकी की, डार्विननेही त्याला आदर्श मानूनच ‘मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत’ मांडला. आधुनिक भाषाशास्त्राचा जनक सोस्यूरनेही सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक भाषाशास्त्राचा अभ्यास केलेला आहे.
विद्येच्या प्रसारानंतर युरोपीय लोक जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या राज्यात जाऊन राज्य करू लागले. त्यामुळे परकीय संस्कृती आणि परकीय भाषा यांचा अभ्यास होऊ लागला. याच प्रक्रियेतून भारतात संस्कृत भाषेचा अभ्यास भाषाशास्त्राच्या क्षेत्रात क्रांतिकारक ठरला. १७८६ साली सर विल्यम जोन्स याने संस्कृत, ग्रीक आणि लॅटिन या भाषांमधील साम्य पाहून या भाषांची एकाच जननी असावी असा विचार मांडला. त्यामुळे जोन्सला भाषांचे ऐतिहासिक संशोधन करावे लागले आणि भाषांची तुलना करावी लागली. या भाषांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर दोन भाषांमधील साम्याचा अभ्यास करून ध्वनिपरिवर्तनाचे नियम तयार करण्यात आले. त्यातून संस्कृत, ग्रीक, लॅटिन या भाषांमागे इसवीसनपूर्व तीन हजार वर्ष ‘आदी-इंडोयुरोपियन’ ही भाषा असावी असा तर्क मांडण्यात आला आणि यातील भाषांना भाषा- भगिनी ठरवण्यात आले. त्यांची भाषाकुले व उपकुले वृक्षाकृतीच्या आधारे दाखवण्यात आले.
ऐतिहासिक भाषाशास्त्राच्या मर्यादा
संपादनऐतिहासिक भाषाशास्त्राच्या मर्यादा
ऐतिहासिक भाषाशास्त्राची पद्धती रूढ झाली असली तरी भाषाशास्त्राच्या मर्यादाही आहेत. एक म्हणजे, या अभ्यासासाठी जी भाषिक सामग्री घेतली जाई, ती मृत भाषामधील लिखित सामग्री असे आणि त्यावरून अनुमाने केली जात. मात्र भाषेच्या ध्वनींविषयी, लिखित व मौखिक बोली स्वरूपात नेमका संबंध काय, याचा शोध घेतल्याशिवाय या तऱ्हेच्या अभ्यासावरून योग्य ते परिवर्तनाचे नियम हाती लागू शकणार नाही. ही या अभ्यासपद्धतीची मोठी मर्यादा आहे.
दुसरे म्हणजे, ‘जनन’ ही कल्पना भाषांच्या बाबतीत बरीच रूपकात्मक वापरावी लागते. जितकी ती वनस्पती व प्राणी उत्क्रांतीबद्दल वापरता येते तितकी भाषेबाबत वापरता येत नाही.
तिसरे म्हणजे, आदिभाषेची कल्पना मानताना करताना ती भाषा एकजिनसी स्वरूपाची असणे गरजेचे असते. मात्र भाषा परिवर्तनाचे नियम भाषा इतिहासाच्या काही टप्प्यात अधिक लागू पडतात तर काही टप्प्यात तितकेसे लागू पडत नाही. आणि असे का होते, याचे स्पष्टीकरण या अभ्यासपद्धतीत मिळत नाही.
ऐतिहासिक भाषाशास्त्राबाबत काही प्रश्न
संपादनभाषिक बदलाचे व त्यामागील नियमित तत्त्वांचे काटेकोर वर्णन देण्यात ऐतिहासिक भाषाअभ्यासाने प्रगती केली असली तरी १९ व्या शतकाच्या अखेरीस या अभ्यासपदाहती संदर्भात काही मुलभूत स्वरूपाच्या शंका उपस्थित होऊ लागल्या. या अभ्यासपद्धतीची ही मोठीच मर्यादा आहे.
एक म्हणजे भाषानाधील किंवा भाषाकुलामधील जनन-संबंध शोधत असताना जनक किंवा आदिभाषेचे स्वरूप निश्चित करता येणे खरोखर शक्य आहे का? दुसरे, साऱ्या भाषांची आधी एकजिनसी भाषा अस्तित्वात होती, याला वस्तुनिष्ठ कसलाही पुरावा नाही. भाषांचे स्वरूप पुनर्रचित असेच राह्रणार. त्यामुळे आदिभाषेच्या अस्तित्वाविषयी व स्वरूपाविषयी शंकाच राहते. भाषा सतत बदलत असल्यामुळे बदल हा अमुक ठिकाणपासून झाला असे मानता येत नाही. तेव्हा विशिष्ट बिंदूपासून परिवर्तनाचे वर्णन करणे सोयीचे नाही.
तिसरे असे की, भाषाकुळातील जननसंबंध शोधत मागे मागे गेल्यास भाषांची वा कुळांची संख्या कमी कमी होत गेली पाहिजे; ती तशी होताना दिसत नाही. याचा अर्थ ‘जनन’ ही संकल्पना मानवी कुलाला जशी लागू पडते, तशीच ती भाषाकुलाला लागू पडत नाही.
चौथे म्हणजे, एक भाषा संपून दुसरी भाषा कुठे सुरू झाली ते भौगोलिकदृष्ट्या ठरवणे जितके अवघड तितकेच ऐतिहासिक दृष्ट्या ठरवणे अवघड. भाषाकुल आकृत्या जितक्या रेखीव व सुटसुटीत वाटतात तितक्याच भाषा प्रत्यक्षात गुंतागुंतीच्या असतात. अशा मर्यादा समोर आल्यामुळे ऐतिहासिक व तौलनिक भाषाअभ्यासपद्धतीपेक्षा वेगळी अभ्यास पद्धती असते अशी जाणीव निर्माण करण्याचे कार्य सोस्यूरने केले. त्यातून पुढे वर्णनानात्मक भाषापद्धतीचा विचार पुढे आला[२][३]