एका वेळी एका पुरुषाने एकाच स्त्रीशी वैवाहिक संबंध ठेवणे, म्हणजे एकविवाह होय. असा विवाह धर्म, रूढी अगर कायदा यांस अनुसरून समाजसंमत पद्धतीने झालेला असावा. याचाच अर्थ धर्माने, रूढीने आणि कायद्याने पत्नी म्हणून मिळणारे सर्व हक्क एका वेळेला एकाच स्त्रीला मिळणार आणि पत्नीच्या सर्व जबाबदाऱ्या तीच उचलणार, असा होतो.


हिंदू धर्माने पुरुषाला एकपत्नीकत्वाचे बंधन घातले नव्हते, असे काहींचे म्हणणे आहे. एक पत्नी ह्यात असताना दुसरी आणण्याची सोय आणि अनुलोम विवाहपद्धतीने खालच्या वर्णातील स्त्रीशी वैवाहिक संबंध ठेवण्याची मुभा, या कारणांमुळे असे मत झाले असावे. परंतु दुसरी समवर्णी पत्नी आणणे हे अपवादात्मक होते आणि पहिल्या पत्नीच्या पूर्ण संमतीने व तिच्यातील काही वैगुण्यांमुळे दुसरी पत्नी करण्यास अनुज्ञा होती. एकपत्नीव्रत आणि पातिव्रत्य हेच हिंदू धर्माचे आदर्श आहेत, असेही म्हणले जाते. ख्रिस्ती धर्माचा प्रसार असलेल्या यूरोपीय व अमेरिकी समाजांत एकपत्नीकत्वाची चाल बरीच खोल रुजलेली दिसते. पण काहींच्या मते तिथेही एक दोन संप्रदाय सोडले, तर सतराव्या शतकापर्यंत बहुपत्नीकत्वाला धर्माने बंदी केली नव्हती.

धर्माचा आदेश अगर आदर्श काहीही असला आणि व्यवहारात बहुपतिकत्व किंवा बहुपत्नीकत्व वेगवेगळ्या समाजांत वेगवेगळ्या काळी जरी दिसून आले, तरी एकविवाह अधिकाधिक समाजांत सातत्याने टिकलेला आहे. परंतु एकविवाहाची पद्धत ही समाजाच्या प्रगत अवस्थेचे आणि मानवाच्या सभ्यतेचे अगर सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे, असे मानणे बरोबर नाही. कारण अनेक दृष्टींनी सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या समाजात बहुपत्नीकत्व आणि अंदमानी लोकांसारख्या मागासलेल्या समाजात एकपत्नीकत्व रूढ असलेले दिसते.

समूहविवाह, बहुपतिकत्व, बहुपत्नीकत्व आणि एकविवाह किंवा एकपत्नीकत्व असा विवाहसंबंधांचा उत्क्रांतिद्योतक क्रम लावणे, आता अशास्त्रीय मानले आहे. परंतु व्यक्तिस्वातंत्र्य व स्त्रीपुरुषसमानता ही तत्त्वे मूलभूत मानली, तर एकविवाह (एकपत्नीकत्व आणि एकपतिकत्व) श्रेष्ठ मानला पाहिजे. नैतिक मूल्ये, आर्थिक परिस्थिती किंवा अर्थव्यवस्था, शिक्षणाचा आशय आणि प्रसार तसेच जनसांख्यिकीय वैशिष्ट्य या प्रमुख कारणांवर विवाहाचा प्रकार मुख्यत: अवलंबून असतो. समता व व्यक्तिस्वातंत्र्य ही नैतिक मूल्ये; यंत्रोपकरणांच्या वाढीमुळे होणारा औद्योगिक विकास व नागरीकरण; उपजीविकेच्या साधनांसाठी होणारी स्पर्धा; उद्योगधंद्यानिमित्त अपरिहार्य झालेली गतिशीलता; शिक्षणाचा प्रसार आणि शिक्षणाची स्त्रीपुरुषांना असलेली समान संधी व त्यामुळे स्त्रीला उद्योगधंद्यात असलेला मुक्त प्रवेश आणि लाभलेले आर्थिक स्वातंत्र्य; सामाजिक नियंत्रणात धर्माला लाभलेले दुय्यम अगर कनिष्ठ स्थान; शासनाचा प्रभाव तसेच स्त्रीपुरुष समान मानण्याची शासकीय दृष्टी आणि स्त्रीपुरुषसंख्येतील समतोल इत्यादींमुळे एकविवाहपद्धती ही आधुनिक काळात अपरिहार्य झाली आहे आणि योग्यही मानली आहे.