नाथांच्या घरची उलटी खूण| पाण्याला मोठी लागली तहान || आत घागर बाहेर पाणी|पाण्याला पाणी आले मिळोनी || आज मी ऐक नवल देखिले |वळचणीचे पाणी आढयाला लागले|| शेतकऱ्याने शेत पेरिले| राखणदाराला त्याने गिळिले | हंडी खादली भात टाकिला |बकऱ्यापुढे देव कापिला|| एका जनार्दनी मार्ग उलटा |जो जाणे तो गुरूचा बेटा ||

अभंगाचे महत्त्व

संपादन

संत एकनाथांचा हा कोडे या प्रकारातील प्रसिद्ध अभंग आहे या अभंगात ते म्हणतात "नाथांच्या घरची खुण उलटी आहे. पाण्याला मोठी तहान लागली आहे. घागर पाण्यात बुडाली आहे.घागरीत पाणी आहे. आणि घागरीच्या बाहेरही पाणी आहे. हे घागरीतील पाणी बाहेरच्या अथांग पाण्यात मिसळून गेले.मी आज एक नवल पहिले. वळचणीला असणारे पाणी अढयाला गेले शेतकऱ्याने शेत पेरले. पण राखणदाराने त्याला गिळून टाकले खापराच्या हंडीत भात शिजवला पण जीवाने भात टाकून हंडी खाल्ली बकऱ्यापुढे देवाचा बळी दिला. हा मार्ग उलटा आहे हे वास्तव ज्याने जाणले तो गुरूचा बेटा होय.या अभंगातील भावार्था मागे आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे.तो अर्थ समजला की अभंगातील कोडेही उलगडते. परमेश्वर सर्व पिंडापिंडात भरलेला आहे. त्याला न ओळखता जीव देहात अडकला आहे. देहाचा संकुचीतपण संपला कि ईश्वरी चौतन्याचा अनुभव यावा लागतो. म्हणजे जीवरूपी पाण्यला समष्टीरूप पाण्याची तहान लागते .जिवातील चैत्यण्याला देहाचे बंधन आहे. म्हणून त्याला घागरीतील पाणी सर्वस्व आहे. असे वाटते हे . घागर अथांग पाण्यात बुडाली तर घागरीच्या आतही पाणी असते आणि बाहेरही वळचणीचे पाणी आढयाच्या पाण्याशी म्हणजे विश्वात्मक चैत्यन्याशी एकरूप झाले. शेतानेच राखणदाराला गिळून टाकले. म्हणजे काय? विधात्याने हे विश्व निर्माण केले.त्याने विश्वरूप शेताची पेरणी केली म्हणून अनेक जिवांची निर्मिती झाली .तो देहाच्या शेताची राखणदारी करतो. पण अज्ञानामुळे जीव ईश्वराला विसरला. त्याने ईश्वररुपी राखणदाराला गिळून टाकले. असे म्हणले आहे. देहरूपी खापराच्या हंडीत भात शिजवला. सुज्ञान माणुस भात खाऊन हंडी फेकून देतो.पण मायामोहामुळे जीवाचा विवेक सुटला. ईश्वररुपी भात टाकून देहरूपी हंडी तो खात बसला.नेहमी देवापुढे बळी दिला जातो. पण येथे जीवाने उलटेच काम केले. म्हणजे बकऱ्या पुढे देवाचा बळी दिला जातो. जीवाने अंगिकारलेला उलटा मार्ग टाकून सरळ मार्गाने चालण्याची जाणीव झाली की गुरूचे बळ मिळाले असा अर्थं होतो. त्याच्यावर गुरूची पूर्ण कृपा होते.एकेक शब्दाचा गूढ अर्थ जसजसा स्पष्ट होत जातो तसतसे अभंगातील कोडे उलगडते. मनाला एका वेगळ्याच समाधानाची अनुभूती येते.