ऊद (हिंदीत लुबान; लोबान; इंग्रजीत Styrax benzoin, गम बेंझोइन, गम बेंजामिन) हा स्टायरॅक्स बेंझोइन असे शास्त्रीय नाव असलेल्या एका झाडाचा डिंक आहे. ह्या राळेसारख्या परिचित पदार्थाचे उत्पादन मलाया, मलाक्का, जावा, सुमात्रा आदी देशांत होते. भारताच्या पूर्व भागात (बंगाल व आसाम) व ब्रम्हदेशात आढळणाऱ्या स्टायरॅक्स सेऱ्यालेटम या दुसऱ्या मोठ्या जातीपासून कमी प्रतीचा ऊद काढतात व चांगल्या उदात त्याची भेसळ करतात.

उदाच्या झाडाच्या सालीवर चरे पाडतात व त्यांतून स्रावणारा पिवळट पदार्थ सुकून घट्ट झाल्यावर जमा करून स्वच्छ करतात. ह्यात दोन प्रकार असतात. स्टायरॅक्स टोकिनेन्स व स्टायरेक्स बेंझाइड्स या वृक्षांपासून आत पांढरे ठिपके असलेला पिवळा किंवा तपकिरी, कठीण वा ठिसूळ ऊद (सयामी ऊद) मिळतो. स्टायरॅक्स बेंझोइन वृक्षापासून मिळालेला ऊद (सुमात्रा ऊद) लालसर किंवा करडा तपकिरी असतो. उदाचे खडे किंवा पूड मंदिरात किंवा घरात जाळतात. सयामी ऊद सरस असून उत्तेजक व कफोत्सारक म्हणून औषधात वापरतात. अनेक त्वचारोगांत ऊद, कोरफडीचा रस व अल्कोहोल मिसळून लावल्यास गुणकारी असतो. यांशिवाय उदबत्ती, सुगंधी तेले, अत्तरे, साबण, सौंदर्य प्रसाधने, दंतधावने इत्यादींत आणि धूप व धुरी देण्याच्या पदार्थांतही ऊद घालतात.

हे सुद्धा पहा

संपादन