आवश्यक औषधे
जागतिक आरोग्य संघटनेने आवश्यक औषधांची व्याख्या अशी केलेली आहे : "बहुसंख्य लोकांच्या आरोग्यरक्षणाच्या गरजा पूर्ण करणारी औषधे; याचसाठी लोकसमूहाला परवडेल अशा किंमतीला ही औषधे सदासर्वदा पुरेशा प्रमाणात आणि उचित मात्रेमध्ये उपलब्ध असावयास हवीत."
जागतिक आरोग्य संघटनेने आवश्यक औषधांची नमुना यादी प्रकाशित केली आहे. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रत्येक देशास आपली यादी बनविण्यास प्रोत्साहन दिले जाते. आतापर्यंत दीडशेहून अधिक देशांनी अधिकृत आवश्यक औषध याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत गाभा यादी आणि पूरक यादी आहे.
गाभा यादीत मूलभूत आरोग्यरक्षण व्यवस्थेसाठी आवश्यक किमान औषधांची यादी त्यांची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि किंमती लक्षात घेऊन दिलेली आहे. पूरक यादीत खास निदानात्मक सुविधांसाठी लागणाऱ्या औषधांची यादी दिलेली आहे.