आम्रपाली
आम्रपाली ("आंबपालिका" किंवा "आंबपाली") ही इ.स.पू. ५०० च्या आसपास प्राचीन भारतातील वैशाली (आजच्या बिहारमधील एक राज्य) प्रजासत्ताकाचीया एक प्रतिष्ठित नगरवधू होती. बुद्धांच्या शिकवणुकीनंतर ती एक अर्हत बनली. जुन्या पाली ग्रंथांमध्ये आणि बौद्ध परंपरांमध्ये तिचा उल्लेख आहे. सुमारे १५०० वर्षांपूर्वी बौद्ध जातक कथांमध्ये आम्रपालींची आख्यायिका पहिल्यांदा वाचायला मिळते.[ संदर्भ हवा ]
आम्रपाली | |
---|---|
जन्म |
आम्रपाली इ.स.पू. ५०० च्या आसपास वैशाली, प्राचीन भारत |
पेशा | अभिसारिका, गणिका, नगरवधू, राजनर्तकी व भिक्खुणी |
प्रसिद्ध कामे | आम्रपालीने गौतम बुद्धांना आमंत्रण देऊन त्यांना स्नेहपूर्वक भोजन दिले होते, आणि आपला महाल व आंब्याची बाग बौद्ध संघाला दान केली होती. |
ख्याती | आम्रपालीला सर्वश्रेष्ठ सौंदर्यवती घोषित करून 'नगरवधू' आणि 'जनपद कल्याणी' या उपाध्या दिल्या गेल्या होत्या. |
धर्म | बौद्ध धर्म |
आम्रपालीच्या आई-वडिलांची माहिती नाही, परंतु ज्या लोकांनी आम्रपालीचे पालनपोषण केले, त्यांना ती एका आंब्याच्या झाडाखाली मिळाली होती. यामुळे तिचे नाव आम्रपाली ठेवण्यात आले. ती दिसायला खूप सुंदर होती, तिचे डोळे मोठे-मोठे आणि काया अत्यंत आर्कषक होती. जो कोणी तिला पाहत होता त्याची दृष्टी तिच्यावर खिळून राहत होती.[ संदर्भ हवा ]
आम्रपालीने नगरवधू बनून अनेक वर्ष वैशालीतील लोकांचे मनोरंजन केले, परंतु एके दिवशी भगवान बुद्धांच्या संपर्कात येताच तिने सर्व गोष्टींचा त्याग करून ती बौद्ध भिक्खुणी बनली.[ संदर्भ हवा ]
इ.स.पूर्व ५०० या काळात आम्रपाली ही अनाथ कन्या जसजशी मोठी होऊ लागली तसतशी तिच्या अप्रतिम सौंदर्याची, लालित्याची, कौशल्याची व मोहकतेची ख्याती चारही दिशांना पसरू लागली. प्रतिष्ठित घराण्यांतील अनेक सरदार, नामदार तरुणांना तिचे आकर्षण वाटू लागले. तिच्यावरून वैशाली नगरीत अराजक नको म्हणून मग तिला वैशालीच्या प्रमुख गणिकापदी नियुक्त करण्यात आले. अनेक राजपुरुष, सरदार, धनवान तिच्या महाली पाहुणचार घेत. आपल्या रसरशीत लावण्याने व अदाकारीने आम्रपाली सर्व लब्धप्रतिष्ठितांची हृदये काबीज करत असे.[ संदर्भ हवा ]
तिच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून वैशालीशी शत्रुत्व असलेल्या मगधाच्या बिंबिसार राजालाही आपले कुतूहल आवरता आले नाही. त्याने वैशालीवर हल्ला केला आणि काही दिवस आम्रपालीच्या महाली पांथस्थाच्या छद्मवेषात आश्रय घेतला. बिंबिसार राजा हा एक उत्तम कलावंत, कलासक्त व संगीतज्ञ होता. बघता बघता बिंबिसार व आम्रपाली एकमेकांच्या प्रेमात पडले. पण जेव्हा आम्रपालीला त्याचे खरे रूप कळले तेव्हा तिने त्याला तिथून जाण्याची व चालू युद्ध समाप्त करण्याची विनंती केली. प्रेमात बुडालेल्या बिंबिसाराने आम्रपालीच्या इच्छेचा मान राखून युद्ध संपवले. त्याच्या ह्या कृतीने वैशाली नगरीच्या नागरिकांनी त्याची भ्याड राजा म्हणून हेटाळणी केली. ह्या सर्व प्रकारात आम्रपालीने आपल्या नगरीशी इमान राखले.[ संदर्भ हवा ]
पुढे आम्रपालीने बिंबिसाराच्या पुत्रास, विमल कौंडिण्यास जन्म दिला. बिंबिसाराचा पुत्र अजातशत्रू याने वैशालीवर कब्जा मिळवून पूर्वीच्या अपमानाचा सूड घेतला. एकदा आम्रपालीने रस्त्यातून एका तेजस्वी, देखण्या बौद्ध भिक्खूला इतर भिक्खूंच्या समवेत जाताना पाहिले. असे रूप, असे तेज, असा डौल तिने अद्याप पाहिला नव्हता. बऱ्याच काळाने आम्रपालीच्या हृदयात त्या भिक्खूच्या केवळ दर्शनाने चलबिचल झाली, मनात त्याच्याविषयी अभिलाषा उत्पन्न झाली. तिने त्या भिक्खूला आपल्या महाली भोजनाचे आमंत्रण धाडले. काही काळाने तो बौद्ध भिक्खू परत येऊन आपल्या साथीदारांना म्हणाला की, आम्रपालीने त्याला वर्षाविहारासाठी, म्हणजेच वर्षाकाळात निवास करण्यासाठी आपल्या महाली राहण्याचे निमंत्रण दिले आहे. सर्व बौद्ध भिक्खू वर्षाकाळात चार महिने मठांमध्ये किंवा सलग एकाच ठिकाणी निवास करत असत. आम्रपालीचे निमंत्रण त्या तेजस्वी भिक्खूने स्वीकारले नाही. गौतम बुद्धाला विचारूनच, त्याची परवानगी घेऊनच तो हे निमंत्रण स्वीकारेल असे उत्तर त्याने आम्रपालीला दिले.
त्या भिक्खूने सर्व वृत्तान्त गौतम बुद्धांना कथन केला व आम्रपालीने आपल्याला वर्षाविहाराचे निमंत्रण दिल्याचेही सांगितले. बुद्धाने काही क्षण त्याच्या डोळ्यांत खोलवर डोकावून पाहिले व त्याला तसे करण्याची परवानगी दिली. चार महिने होत आले तसे लोक उत्सुकतेने भिक्खू परत येण्याची वाट पाहू लागले. आणि भिक्खू परत आला, पण त्याच्या पाठोपाठ आम्रपालीही भिक्खुणीच्या वेषात चालत येत होती. तिने गौतम बुद्धाची भेट घेतल्यावर आपण कसे त्या तरुण भिक्खूला भुरळ पाडण्याचा, आकर्षित करण्याचा, अनुरक्त करण्याचा वृथा प्रयत्न केला याचे त्यांच्यापाशी वर्णन केले.[ संदर्भ हवा ]
बुद्धाने नंतर आपल्या शिष्यांना सांगितले की त्याने तरुण भिक्खूस आम्रपालीच्या घरी राहण्याची परवानगी दिली, कारण त्याला त्या भिक्खूच्या डोळ्यांत कसलीही कामवासना दिसली नाही. त्याच्या आत्मभानाने, मनोनिग्रहाने व तेजोबळाने त्याने आपली जागृतावस्था कधीच त्यागली नाही. परिणामवश आम्रपालीचे स्वतःच्या सौंदर्याविषयीचे गर्वहरण झाले व तिला वेगळ्या प्रकारे आयुष्य व्यतीत करण्याची ओढ लागली.[ संदर्भ हवा ]
अशा प्रकारे संन्यस्त जीवनाकडे आकृष्ट झालेल्या आम्रपालीने बुद्धाला आपल्या प्रासादात भोजनास बोलावले. बुद्धानेही ते आमंत्रण स्वीकारले. त्यानंतर तिने आपल्या राजगणिकेच्या पदाचा त्याग केला व बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्माच्या प्रसाराचे काम करता करता तिला आत्मसाक्षात्कार झाला व ती अर्हत बनली.[ संदर्भ हवा ]
बौद्ध संप्रदायात तिच्या योगदानाचे, कार्याचे महत्त्व कायम आहे. वयात आल्यावर तिचा मुलगा विमल कौंडिण्यही बौद्ध भिक्खू झाला. आम्रपालीच्या अंबपाली आम्रवनात वैशाली मुक्कामी बुद्ध राहायचे आणि तिने पुढे हेच आम्रवन तिने बुद्धांना अर्पण केले. ह्याच ठिकाणी बुद्धांनी प्रसिद्ध अंबपालिका सूक्त सांगितले.[ संदर्भ हवा ]
चित्रपट
संपादन१९६६ साली, आम्रपालीच्या जीवनावर 'आम्रपाली' नावाचा हिंदी चित्रपट निघाला होता.[१] लेख टंडन त्याचे दिग्दर्शक होते. आम्रपालीची भूमिका वैजयंतीमालाने केली होती.
आम्रपालीवरील पुस्तके
संपादन- आम्रपाली (कादंबरी, लेखक - जनार्दन ओक)
- देवांगना : वैशालीची नगरवधू आम्रपालीची कथा (जनार्दन ओक)