आबिद शेख (जन्म 18जानेवारी 1970) : जन्मस्थळ : फलटण (जि. सातारा, महाराष्ट्र ) आबिद शेख हे मराठी पत्रकारीतेतील महत्त्वाचे नाव: पुण्यातील श्री शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण झाले. त्यांचे वडील बशीर अहमद मोहियुद्दिन शेख हे पुणे महापालिकेत नोकरीस होते; तर मातोश्री सौ. सुगराबी बशीर अहमद शेख जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षीका होत्या. थोरले बंधू महंमद शफी हे खासगी कंपनीत व बहिण सौ. शबनम पुणे महापालिकेत शिक्षिका आहेत. अत्यंत पुरोगामी विचारांच्या घरात जन्मलेल्या आबिद यांचे सामाजिक विचार अत्यंत प्रागतिक आहेत. ते त्यांच्या लेखणीतून वेळोवेळी सिद्ध झाले आहेत. पत्रकारीतेमध्ये त्यांनी गुन्हेगारी हा विषय विशेषत्वाने हाताळला असला तरी मराठीतील बहुतेक सर्व विषयांवर त्यांनी त्यांच्या लेखणीचे प्रभुत्व सिद्ध केले आहे. चित्रपट, चित्रपट संगीत हे ही त्यांच्या आवडीचे विषय.सामाजिक समस्यांबाबत त्यांनी अत्यंत पोटतिडीकेने लेखन केले. दै. पुण्यनगरीच्या महाराष्ट्रभर असलेल्या 'पंच पान' या विशेष पृष्ठामध्ये त्यांनी विविध विषयांवर लिहिलेले लेख कमालीचे गाजले. तसेच फेसबुकसारख्या सोशल मीडियावर त्यांनी निरनिराळ्या विषयांवर लिहिलेल्या लेखांना वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे.

आबिद यांनी 1990 मध्ये महाराष्ट्रातील पुणे शहरामध्ये पत्रकारीतेला सुरुवात केली. दै. लोकसत्तामध्ये त्यांनी पत्रकारेतेला प्रारंभ केला. त्यानंतर दै. सकाळ, दै. लोकमत, दै. पुढारी येथे त्यांनी चमकदार कामगिरी केली. सध्या दै. पुण्यनगरीमध्ये वृत्तसंपादक म्हणून ते कार्यरत आहेत. क्राईम रिपोर्टींग हा त्यांचा अभ्यासाचा व व्यासंगाचा विषय. विशेषतः मुंबई अंडरवर्ल्डबाबत अनेक ब्रेकींग न्यूझ त्यांनी दिल्या. पुणे प्रेस क्लब, महाराष्ट्र पत्रकार संघ व पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अनेक प्रतिष्ठीत पुरस्कार आबिद यांना लाभले आहेत. त्यांच्या मनोरुग्णांच्या नरकयातना, विळखा गुन्हेगारीचा या व तत्सम अनेक वृत्तमालिका राज्यभर गाजल्या. कथा एका डॉनची हे त्यांचे पुस्तक 2002 मध्ये दिलीपराज प्रकाशनतर्फे प्रकाशित झाले. चंद्रकांत घोरपडे, एस. के. कुलकर्णी, माधव गडकरी, अरुण टिकेकर, विजय कुवळेकर किशोर कुलकर्णी, वरुणराज भिडे, सतीश कामत, विजयकुमार साळुंखे, प्रभाकर खोले, राजीव साबडे, मल्हार अरणकल्ले अशा अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ पत्रकारांचा सहवास लाभला. निर्भिडपणा, दांडगा जनसंपर्क, लेखणीवरील हुकूमत आणि शब्दांवर प्रभुत्व ही आबिद यांच्या पत्रकारीतेची वैशिष्ट्ःये समजली जातात.