आठवडा किंवा सप्ताह हे एक कालमापन एकक आहे. एका आठवड्यामध्ये ७ दिवस असतात.

प्रत्येक आठवड्यात सात वार असतात, ते पुढील प्रमाणे - १.रविवार, २.सोमवार, ३.मंगळवार, ४.बुधवार, ५.गुरुवार, ६.शुक्रवार, ७.शनिवार.

प्रत्येक वार दर आठव्या दिवशी परत येतो. त्यामुळे या चक्राला आठवडा असे म्हणतात.

हिंदू पंचांगानुसार सूर्योदयापासून नवीन वार सुरू होतो. मुसलमान सूर्यास्तानंतर पुढचा वार सुरू झाला असे समजतात, तर आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार मध्यरात्री बारानंतर नवीन वार सुरू होतो. तिन्ही पद्धतींमध्ये सूर्योदय ते सूर्यास्त या काळात एकच समान वार असतो. वारांनाच वासर असेही म्हटले जाते.

वारांची ही नावे त्याकाळी माहीत असलेल्या आकाशस्थ 'ग्रहांवरून घेतली आहेत. माणसाचे भविष्य सांगण्यासाठी त्याच्या जन्मवेळी आकाशातील ग्रहांच्या स्थितींवरून जी जन्मकुंडली बनवतात, तिच्यातच हेच सात ग्रह (आणि राहू-केतू) असतात.

रवि-सोम...शनी हा क्रम खालील सूत्रावरून ठरला :
आ मंदात्‌‌ शीघ्रपर्यंतम् होरेशा:
अर्थ - आकाशात मार्गक्रमण करताना दिसणाऱ्या मंदगतीच्या ग्रहापासून शीघ्रगतीच्या ग्रहापर्यंत होरे सुरू असतात.
मंदग्रह ते शीघ्र ग्रह पुढील प्रमाणे आहेत - शनी (सर्वात मंद), गुरू, मंगळ , रवि, शुक्र, बुध, चंद्र (सोम, सर्वात जलद).
एका दिवसाचे २४ होरे असतात. होरा म्हणजे तास. प्रत्येक होरा एका एका ग्रहाला दिलेला असतो. सूर्योदयाच्या वेळेस ज्या ग्रहाचा होरा असतो त्याचे नाव त्या दिवशीच्या वारास दिलेले असते.

वारांची इंग्रजी नावे : Sunday (सूर्याच्या नावावरून), . Monday (चंद्राच्या नावावरून), Tuesday (Týr or Tiw या देवाच्या नावावरून), Wednesday (Odin या देवाच्या नावावरून), Thursday (Thor या देवाच्या नावावरून), Friday (Frigg या देवीच्या नावावरून), Saturday (शनीवरून).

वारांची हिंदी-उर्दू नावे : इतवार, पीर, मंगल. बुध, जुमेरात, जुम्मा, शनीचर