आकाशनिंब
आकाशनिंबाचे/बुचाचे झाड हा एक पांढरी सुवासिक फुले येणारा वृक्ष आहे. आकाशनीम हे त्याचे हिंदी नाव आहे.
आकाशनिंब / बूच | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
आकाशनिंब किंवा बुचाचे झाड
| ||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||
| ||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||
मिलिंग्टोनिया होरटेन्सिस |
आकाशनिंब किंवा बुच हा मूळचा ब्रह्मदेश आणि मलेशियातील, पण आता भारतात सर्वत्र दिसणारा शोभिवंत वृक्ष आहे. ह्या झाडाला भारतातील हवामान चांगले मानवते आणि त्यामुळे येथे त्याची वाढ चांगली होते. हा वृक्ष सरळसोट उंच वाढणारा असून ८० फुटापर्यंत उंची गाठू शकतो.[१]
ह्या झाडाची मुळे खोलवर न जाता जमिनीत वरवरच पसरलेली असतात. त्यामुळे त्याखाली इतर झाडे झुडपे वाढू शकत नाहीत.[२] जोरदार वाऱ्यात हे झाड उन्मळून पडण्याची शक्यताही जास्त असते.
बुचाच्या झाडाची साल खरबरीत असून त्यावर जाड रेषा असतात आणि रंग पिवळसर तपकिरी असतो. ही साल सहज काढता येते आणि त्याचे छोटे छोटे ढलपेही निघतात. त्यापासून बुचे तयार करतात. बुच हे ह्या झाडाचे नाव त्यावरूनच आले आहे.
बुचाच्या झाडाची पाने संयुक्त असून द्विसंयुक्त (Bipinnate) प्रकारची असतात. पानाच्या मध्यशिरेच्या दोन्ही बाजूला जोडीजोडीने पर्णिका असतात तर टोकाला एकच पर्णिका असते. पर्णिकांचा आकार एक ते तीन इंच लांब असतो आणि त्यांचा रंग गडद हिरवा असतो. जानेवारी ते मार्च झाडाची क्रमाक्रमाने पानगळ होऊन नवीन पाने येत राहतात. त्यामुळे संपूर्ण झाड निष्पर्ण कधीच न होता सदाहरितच राहते.
बुचाच्या झाडाची फुले पांढरी असली तरी फुलांना क्वचित गुलाबी छटा असते. फुलांचा देठ हा बारीक नळीसारखा आणि साधारण दोन ते अडीच इंच लांब असतो. फुलाला पाच पाकळ्या असून त्यापैकी दोन पाकळ्या एकच वाटावी अश्या एकमेकांना जोडलेल्या असतात. त्यामुळे फूल बघताना चार पाकळ्यांचे वाटू शकते. फांदीवर गुच्छाने फुले येतात. अशी फुले खाली झुकलेली असतात आणि ती झाडावर फार काळ न टिकता गळून पडतात. एप्रिल ते जून आणि ऑक्टोबर ते डिसेंबर असा दोन वेळा झाडाला बहर येतो.[२] झाड बहरात असताना झाडाखाली फुलांचा गालिचा पसरलेला दिसतो. फुले सुवासिक असतात आणि त्यांचा आसपासच्या वातावरणात दरवळणारा गंध लांबूनही ओळखू येतो.
बुचाच्या झाडाला बारीक, चपट्या आणि टोकदार अश्या आठ ते दहा इंच लांबीच्या शेंगा लागतात. शेंगांत बिया तयार होतात. प्रत्येक बी भोवती नाजूक पापुद्ऱ्याचे आवरण असते. शेंगा पिकल्यावर उकलतात आणि बिया बाहेर पडतात. बऱ्याचदा पोपट आणि इतर काही पक्षी शेंगांतील बिया खाण्यासाठी झाडावर आलेले दिसतात. अर्थातच अशा पक्ष्यांमुळे बियांचा आपोआपच सर्वत्र प्रसार होतो.
ह्या झाडाच्या बियांपासून नवीन रोपे तयार करता येऊ शकतात पण शेंगा किंवा बिया भारतात सर्वत्र तयार होत नाहीत[१] अश्या वेळेस कलमांद्वारे नवीन झाडे तयार करता येतात. वरवर असणाऱ्या झाडाच्या मुळाभोवती झाडाचे मुळ्याचुषक (sucker) तयार झालेले आढळून येतात आणि असे मुळ्याचुषक खुडून दुसरीकडे लावल्यास त्यापासूनही नवीन झाड तयार करता येते.
चित्रदालन
संपादन-
बुचाच्या झाडाची खाली झुकलेली फुले
-
बुचाच्या झाडाची संयुक्त पाने व पर्णिका
-
बुचाच्या झाडाला लागलेल्या शेंगा
-
बुचाच्या झाडाचे खडबडीत खोड