ॲलोपॅथी

(अॅलोपॅथी या पानावरून पुनर्निर्देशित)

ही रोगोपचार पद्धती आधुनिक विज्ञानाच्या मदतीने तयार झाली आहे. हिलाच आधुनिक चिकित्सापद्धत असे म्हणतात. ॲलोपॅथी हा शब्द प्रथम होमिओपॅथिक डॉक्टरांनी वापरण्यास सुरुवात केली. (संदर्भ हवा) होमिओपॅथी शिकलेली डॉक्टर इतर डॉक्टरांना ॲलोपॅथिक डॉक्टर म्हणू लागले.

हिपोक्रॅटिसला आधुनिक वैद्यकशास्त्राचा जनक मानले जाते. त्याच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या शपथेतून वैद्यकशास्त्रातील नैतिकतेच्या तत्त्वांची पायाभरणी झाली.

आधुनिक वैद्यकशास्त्राच्या प्रगतीत कित्येक डॉक्टर्स तसेच वैद्यकीय संशोधकांनी अमूल्य योगदान दिले आहे. त्यांत ‘आजारांचे कारण म्हणजे इंद्रियांमध्ये दोष निर्माण होतात' असे सातशे शवविच्छेदने करून जगापुढे यासंबंधीचा सिद्धान्त मांडणारा जिओवनी मॉरगॅग्नी, मानवी शरीरात असलेल्या पेशींची अंतर्रचना शोधून या पेशींत होणारे बदल हे आजारांना कारणीभूत असतात असा सिद्धान्त मांडणारा रुडॉल्फ फर्को, मानवाला जंतूंमुळे निरनिराळे आजार होतात हे शोधून ‘अन्थ्रॅक्स’ या आजाराची लस आणि दुधाचे निर्जंतुकीकरण करण्याची प्रक्रिया शोधून काढणारा लुई पाश्चर वगैरे संशोधक आहेत. जंतुनाशक काबरेलिक आम्ल वापरून केल्या जाणाऱ्या र्निजतुक शस्त्रक्रियेचा प्रणेता जोसेफ लिस्टर, मलेरियावर भारतात येऊन संशोधन करणारा रोनाल्ड रॉस, त्याचा समकालीन प्रतिस्पर्धी जिओवनी ग्रासी, क्षयरोगाचे जंतू शोधणारा, पण नंतर त्यावर काढलेले औषध कुचकामी ठरले म्हणून परागंदा व्हावे लागलेला रॉबर्ट कॉख, पोलिओ निर्मूलनासाठी प्रतिबंधक लस शोधणारे जोनास साल्क आणि सबिन अशा अनेकानेक संशोधकांमुळे आधुनिक वैद्यकशास्त्र प्रगत होत गेले.