अशोक पुरुषोत्तम शहाणे (जन्म - ७ फेब्रुवारी १९३५) हे मराठी भाषेतील एक लेखक, भाषातज्ज्ञ, संपादक, व प्रकाशक आहेत.

अशोक शहाणे यांचे प्राथमिक-माध्यमिक शिक्षण सातारा येथे झाले. ते पुण्याला येऊन एस.एस.सी. झाले. पुढे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजातून (एम्‌ईएस-आताचे गरवारे कॉलेज) बी.ए.झाले. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी साधना, रहस्यरंजन इत्यादी नियतकालिकांतून लेखन केले. रहस्यरंजनचे काही काळ संपादनही केले.. पुण्यात असताना त्यांनी बंगाली भाषेचा अभ्यास केला.

त्यानंतर अशोक शहाणे हे १९५८-६० च्या सुमाराला आकार घेऊ लागलेल्या अनियतकालिकांच्या वाङ्मयीन चळवळीत सक्रिय झाले. त्यांनी प्रस्थापित लेखक, प्रकाशक, संपादक यांवर हल्ला चढवणारा ‘मराठी वाङ्मयावर क्ष-किरण’ हा लेख खळबळजनक ठरला. तेव्हापासून अशोक शहाणे हे अनियतकालिकांच्या चळवळीतले अध्वर्यू मानले जाऊ लागले. त्यांनी त्यानंतर 'तीस वर्षांची पुस्तकी हालहवाल' हे लेख लिहून अशीच खळबळ उडवून दिली होती. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स', 'आज दिनांक', 'महानगर' आणि 'साप्ताहिक सकाळ'मध्ये अल्पकाळ केलेले सदर लेखनही असेच चर्चेचा विषय झाले होते.

शहाणे यांनी एकोणीसशे साठच्या दशकात मुंबईहून ‘अथर्व’ (१९६१) व ‘असो’ (१९६४) अशी दोन अनियतकालिके सुरू केली. अथर्व पहिल्या अंकानंतर बंद पडले, तर ‘असो’चे १६ अंक निघाले. १९७६ साली त्यांनी पुण्याला प्रास प्रकाशन संस्थेची स्थापना केली. शहाणे बंगाली भाषेचे उत्तम जाणकार असल्याने त्यांनी शीर्षेंदू मुखोपाध्याय, मोती नंदी, समरेश बसू, श्यामल गंगोपाध्याय, रमानाथ राय अशा अनेक मोठ्या लेखकांच्या कथांचे मराठी अनुवाद केले.

अशोक शहाणे यांनी दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी आणि त्यांच्या चमूला बंगाली नाटककार अजितेश बंद्योपाध्याय यांचे महाभारताच्या शेवटच्या पर्वावरील 'हे समय उत्तान समय' हे मूळ बंगाली नाटक वाचून दाखवले, तेव्हा त्यांच्या हातात बंगाली पुस्तक होते अन्‌ ते वाचत होते मराठीत, आणि ते वाचन अतिशय सुगम आणि अस्खलित होते, याची आठवण रंगकर्मी डॉ. हेमू अधिकारी अजूनही सांगतात.

अशोक शहाणे यांनी 'प्रास प्रकाशन' या संस्‍थेमार्फत अनेक चांगली पुस्तके काढली. अरुण कोलटकरांची मराठी-इंग्रजी पुस्तके काढली. पुस्तकांच्या रूढ होऊ पाहणाऱ्या साचेबद्ध आकारांना सुरूंग लावण्याचे काम केले. पुस्तक तर काढायचे आहे; पण त्यासाठी पैसे नाहीत, या विवंचनेतून त्यांनी पुस्तकांच्या आकारात, मांडणी, सजावटीमध्ये जे बदल केले आहेत, ते मराठी वाचकांना चांगलेच माहीत आहेत.

कवी अरुण कोलटकर यांनी तुकोबांच्या अभंगांविषयी संशोधन केले होते. महाराष्ट्र शासनाने छापलेल्या तुकोबांच्या गाथेतले काही अभंग त्यांचे नाहीत आणि तुकोबांचे म्हणून असलेल्या बऱ्याच अभंगांचाही त्यात समावेश नाही. अशा एकूण जवळपास नऊ हजार अभंगांचा शोध अरुण कोलटकरांनी घेतला होता. हे संशोधन अशोक शहाणे पुस्तकरूपात प्रसिद्ध करणार आहेत.

प्रसिद्ध कॅलिग्राफी तज्ज्ञ र.कृ. जोशी यांच्या मराठी अंकलिपीचे पुस्तक, वसंत गुर्जर यांच्या कविता, सिनेदिग्दर्शक अरुण खोपकरांचे पुस्तक, नुकतेच दिवंगत झालेल्या रघू दंडवते यांची एक कादंबरी आणि कवितासंग्रह, 'असो' आणि 'वाचा'मधील सर्व लेखनाचे स्वतंत्र पुस्तक अशा योजना त्यांच्या हाताशी आहेत.

अशोक शहाणे यांनी लिहिलेली पुस्तके संपादन

  • अमिताभ (अमिताभ बच्चनचे चरित्र, मूळ बंगाली, लेखक सौम्य बंद्योपाध्याय)
  • अरुण कोलटकरांच्या कविता
  • इसम (मूळ बंगाली ‘लोकटा’, लेखक गौरकिशोर घोष)
  • कोंडी (मूळ बंगाली)
  • घरंदाज गोष्टी (काही बंगाली कथांचा मराठी अनुवाद)
  • जन-अरण्य (अनुवादित, मूळ बंगाली लेखक - शंकर)
  • डाकघर (मूळ बंगाली, लेखक - रवींद्रनाथ टागोर)
  • धाकटे आकाश
  • नपेक्षा (लेखसंग्रह)
  • नाट्यकला कशाला म्हणतात? (मूळ बंगाली, लेखक - शंभू मित्र)
  • परती (मूळ बंगाली, ‘फेरा’ लेखिका तस्लीमा नसरीन)
  • ‘प्रचंड विजेरी सुतार' या मूळ बंगाली दीर्घ कवितेचा अनुवाद (अजून पुस्तकरूपात प्रकाशित झालेला नाही)
  • फिटम्‌फाट (मूळ बंगाली ‘शोध’, लेखिका - तस्लीमा नसरीन)
  • मर्यादित (मूळ बंगाली ‘सीमाबद्ध’ लेखक - शंकर)
  • माझा भारत
  • माझी कहाणी (मूळ बंगाली, सतारवादक उस्ताद अल्लाउद्दीन खॉं यांचे आत्मचरित्र)
  • मेयेर बेला कुंवारपण (मूळ बंगाली, लेखिका - तस्लीमा नसरीन)
  • शरम (मूळ बंगाली ‘लज्जा’, लेखिका - तस्लीमा नसरीन)
  • साईखड्यांच्या खेळाची गोष्ट (मूळ बंगाली, लेखक - माणिक बंद्योपाध्याय)
  • सीमाबद्ध (अनुवादित, मूळ बंगाली लेखक - शंकर)

अशोक शहाणे यांच्या प्रास प्रकाशनाने प्रकाशित केलेली पुस्तके संपादन

  • काला घोडा (इंग्रजी, कवी - अरुण कोलटकर)
  • चिरीमिरी (कवी -अरुण कोलटकर)
  • जेजुरी (इंग्रजी काव्यसंग्रह, कवी - अरुण कोलटकर)
  • The Boatride and Other Poems (अरुण कोलटकर)
  • The Policeman (A wordless play in 13 scenes.By Arun Kolatkar)
  • द्रोण (कवी -अरुण कोलटकर)
  • भिजकी वही (कवी -अरुण कोलटकर)
  • सर्पसत्र (इंग्रजी काव्यसंग्रह, कवी - अरुण कोलटकर)

गांधी मला भेटला संपादन

'गांधी मला भेटला' ही १९८३मधे प्रसिद्ध झालेली वसंत दत्तात्रेय गुर्जर यांची पोस्टर कविता होती. त्याच्यावर बाळ ठाकूरांनी काढलेले पाठमोऱ्या गांधीजींचे चित्र होते. चित्राची मांडणी अशोक शहाण्यांनी केली होती. गांधीजींच्या पाठीमागे आपले जे काही सामाजिक वास्तव उरले त्याची कबुली म्हणजे ही गुर्जरांची कविता. ही कविता १९९४ मध्ये ऑल इंडिया बँक असोसिएशनच्या द्वैमासिकात जुलै-ऑगस्टला परत प्रसिद्ध झाली, आणि तिच्यावर खटला भरला गेला.

या कवितेसंबंधीचा खटला अखेरीस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊन संपला.. कवितेचे प्रकाशक देवीदास तुळजापूरकर यांनी ही कवीता 1994 मध्ये जेंव्हा प्रकाशित केली गेली तेंव्हाच कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतिल तर दिलगिरी व्यक्त केली होती त्याचा आधार घेत सर्वोच्च न्यायालयाने देवीदास तुळजापूरकर याना आरोपातून मुक्त केले. कवि वरील खटला अद्याप चालू झाला नाही. कवितेवर कोणीही बंदी आणलेली नाही पण तिच्या अश्लीलते बाबत मुद्दा आज अजूनही न्यायालय प्रविष्ट आहे.[ संदर्भ हवा ]

पुरस्कार संपादन

  • 'प्रास प्रकाशना'ला इ.स. २००४ साली अत्यंत प्रतिष्ठेचा 'वि. पु. भागवत' पुरस्कार मिळाला.

संदर्भ संपादन