( जन्म : २८ फेब्रु. १९६२) - सत्यशोधक-ब्राह्मणेतर चळवळीचे कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक, कवी, व संपादक. महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या नेर (प.) तालुक्यातील आजंती या गावात एका शेतकरी कुटुंबात जन्म. सध्या वर्धा येथे वास्तव्य. नागपूर विद्यापीठाअंतर्गत वर्धा येथील जी. एस. कॉमर्स कॉलेजमधून बी. कॉम. ( १९८८), बी. ए. (ॲडिशनल, १९८९), एम. ए. मराठी ( १९९१ ), 'महात्मा फुलेंची कविता' या विषयावर एम. फील. ( १९९३) पदवी आणि पुढे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून विदर्भातील सत्यशोधक चळवळीच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास' पीएच. डी. (२००२) पदवी प्राप्त. सत्यशोधक चळवळीत त्यांचे सक्रीय योगदान राहिलेले असून इतर सामाजिक चळवळींमधूनही प्रबोधानाचे कार्य करण्यावर त्यांनी भर दिला आहे. डॉ. अशोक चोपडे यांनी संशोधनपूर्ण ग्रंथलेखनासह अनेक महत्त्वाची संपादनेही केली आहेत. 'आधुनिक मराठी कवितेचे जनक : जोतीराव फुले' आणि 'विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य हे महत्त्वाचे दोन ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. 'आधुनिक मराठी कवितेचे जनक : जोतीराव फुले' या ग्रंथातून त्यांनी आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून जोतीराव फुले यांच्या कवितांची वैशिष्टयपूर्णतः सप्रमाण मांडलेली आहे. तर 'विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य' या ग्रंथातून विदर्भातील सत्यशोधक चळवळीतील साहित्याविषयीचे विवेचन केलेले आहे. या ग्रंथात विदर्भाबाहेरील सत्यशोधक चळवळीविषयीचे मूलगामी चिंतन व्यक्त झालेले असून आधुनिक भारताच्या जडण-घडणीचे अनेक संदर्भ त्यात समाविष्ट आहेत. अभ्यासक, संशोधन आणि लेखकांना अनेक महत्त्वपूर्ण संदर्भ त्यांनी संपादित केलेल्या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने सत्यशोधकांच्या जुन्या पुस्तकांची संपादने आहेत. यामध्ये १) सत्यशोधक महासाधू सं. तुकाराम - ह. न. नवलकर- १९२८, २) महात्मा फुले लिखित छ. शिवाजी महाराजांचा पोवाडा, ३) महाराष्ट्रातील बहुजन समाजवाद - वामनराव घोरपडे-१९४८, ४) ब्राह्मण आमचे पुढारी नव्हेत - १९२०, ५) मर्द मराठे - ए. ए. मानकर - १९३८, ६) सत्यशोधक नायगावकर (खुशाल व गुलाबराव सिसोदे यांचे अल्प चरित्र), ७) साप्ता. ब्राह्मणेतरमधील अग्रलेख (इ. स. १९२६-२७) संपा. : व्यंकटराव गोडे ८) वेडाचार - पं. धोंडीराम कुंभार - १८९७ इत्यादी पुस्तकांचे त्यांनी संपादन कार्य केले आहे. यातील अनेक पुस्तकांना त्यांनी लिहिलेल्या विवेचक प्रस्तावना या सत्यशोधक साहित्यावर महत्त्वपूर्ण भाष्य करतात. याशिवाय अनेक महत्त्वाच्या संपादित ग्रंथांमध्येही त्यांचे महत्त्वपूर्ण विषयांवर लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी लिहिलेला 'खानदेशातील सत्यशोधक चळवळ' हा दीर्घ लेख अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या लेखातून खानदेशातील सत्यशोधक चळवळीच्या इतिहासाचे अनेक अलक्षित संदर्भ पुढे करण्यात आलेले आहेत. 'मराठा मार्ग' मासिकांचे संपादक म्हणूनही त्यांनी बरीच वर्षे (२००९-२०१७) कार्य केले आहे. मराठा मार्ग मधील त्यांचे संपादकीय महत्त्वपूर्ण आहे. अनेक अखिल भारतीय सत्यशोधक साहित्य संमेलने व अधिवेशनाच्या स्मरणिकांचे संपादनही त्यांनी केले आहेत. डॉ. अशोक चोपडे यांच्या अनेक कविता कवितारती आणि अन्य नियतकालिकांमधूनही प्रसिद्ध होत आल्या आहेत. त्यांच्या लेखनाची सुरुवात ही कवितेपासून झालेली आहे. बहुजनसंघर्ष, अक्षरवैदर्भी, पुरोगामी सत्यशोधक, राजकीय सत्तांतर, अक्षगाथा यांसारख्या विविध नियतकालिकांमधून आणि लोकसत्ता, लोकमत, नागपूर पत्रिका इत्यादी दैनिकांमधूनही त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. डॉ. अशोक चोपडे यांनी सत्यशोधक विचारांचा कालानुरूप झालेल्या विकासाचा वारसा घेऊन प्रबोधन चळवळीत सक्रीय कार्य करण्यावर भर दिला आहे. सामाजिक- सांस्कृतिक परिवर्तनासाठी त्यांनी अनेक वेगवेगळ्या परिवर्तनवादी उपक्रमांमध्ये मौलिक योगदान दिले आहे. सत्यशोधक समाज, विदर्भ प्रदेशचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष, अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले आहे. सत्यशोधक साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषदेचेही ते पदाधिकारी राहिले आहेत. अभ्यासक, संशोधक आणि कार्यकर्ते यांच्यातील संवाद विकसित करून प्रबोधन चळवळीची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे. साहित्य आणि अन्य कलांच्या संवर्धनाच्या दृष्टीनेही काही महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यांच्या 'आधुनिक मराठी कवितेचे जनक : जोतीराव फुले' या ग्रंथाला तरवडी जिल्हा अहमदनगर येथील 'सत्यशोधक मुकुंदराव पाटील वाङ्मय पुरस्कार' आणि 'विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य' या ग्रंथाला बुलडाणा येथील 'भगवान ठग तुका म्हणे पुरस्कार' प्राप्त झालेला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथे संपन्न झालेल्या महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलना ( २४ जानेवारी, २०१९ ) चे अध्यक्ष राहिले आहे.