अलीवर्दीखान

(अलिवर्दी खान या पानावरून पुनर्निर्देशित)

अलीवर्दीखान तथा अलाविर्दीखान हा मोगल साम्राज्यांतर्गत बंगाल प्रांताचा १७४० ते ५६ या काळातील नवाब होता. अलीवर्दीखानाची नोकरीतील हुशारी पाहून बंगालचा नबाब शुजाउद्दीनखान (१७२७—३९) याने त्याच्याकडे बिहार प्रांताच्या व्यवस्थेचे काम सोपविले. त्या वेळी त्याने पाटणामोंघीर येथील हिंदू शासकांचा निःपात करून तेथे आपले वर्चस्व स्थापन केले. शुजाउद्दीनखानाचा मुलगा सर्फराझखान याच्या बेसावध कारभाराचा फायदा घेऊन त्याने १७४० च्या गिरियाच्या लढाईत त्याला मारून नबाबपद मिळविले. १७४१ मध्ये रघूजी भोसले व त्याचा दिवाण भास्करराम कोल्हटकर यांनी बंगालवर स्वारी करून अलीवर्दीखानास घेरले.

अलीवर्दीखानाने मराठ्यांचा जोरदार प्रतिकार केला. त्याने भास्कररामाचा विश्वासघाताने खून केला. परंतु शेवटी मराठ्यांच्या सतत स्वाऱ्यांनी हैराण होऊन अलीवर्दीखानाने त्यांच्याशी १७५१ मध्ये तह केला आणि रघूजी भोसले यास चौथ देण्याचे कबूल केले. यूरोपीय व्यापाऱ्यांशी तो कडक पण निःपक्षपातीपणाने वागत असे.