अरविंद थत्ते
पंडित अरविंद थत्ते ( १७ नोव्हेंबर १९५८)[१] हे भारतातील एक अग्रगण्य संवादिनी वादक आहेत. त्यांचा जन्म वडील दिगंबर आणि आई वत्सला यांच्या पोटी एका संगीतप्रेमी कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा कीर्तनकार, संगीत नाटकातील अभिनेते तसेच चित्रकार होते. वडील व्यवसायाने शिक्षक होते. तसेच वडील आणि मोठे भाऊ हार्मोनियम वाजवीत.[१] अरविंद वयाच्या ६व्या वर्षी पेटी वाजवायला शिकले. स्वतःच सराव करून करून त्यांना पेटी उत्तम वाजवायला येऊ लागली. मात्र त्यानंतर ते कंठसंगीत शिकण्यासाठी भारत गायन समाजात दाखल झाले; आणि नंतर तबला शिकण्यासाठी पंडित जी.एल. सामंत यांच्याकडे गेले. पुढे त्यांनी सुधीर दातार, सुहास दातार आणि पंडित जसराज यांना गुरू केले आणि त्यांच्याकडून संगीताचे अधिक ज्ञान मिळवले. पं. जसराज यांच्याकडे त्यांनी बारा वर्षे गायनाचे शिक्षण घेतले.[१]
अरविंद थत्ते हे गणितामधले एम.एस्सी. पीएच.डी (पुणे विद्यापीठ) असून संगीतासाठी त्यांनी त्यांच्या गणितक्षेत्रापासून फारकत घेतली. १९८२ साली ते आकाशवाणीच्या एकल पेटीवादनाच्या स्पर्धेत पहिले आले होते.[१]
अरविंद थत्ते यांनी मोगूबाई कुर्डीकर, पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, पंडित भीमसेन जोशी, पंडित रामभाऊ मराठे, पंडित कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर, के.एल. गिंडे, पंडित जसराज, पंडित जितेंद्र अभिषेकी, प्रभा अत्रे, परवीन सुलताना, मालिनी राजुरकर, लक्ष्मी शंकर, विजय सरदेशमुख, पंडित सी.आर. व्यास, शोभा गुर्टू आदि अनेक नामवंत कलाकारांच्या गायनात संवादिनीची संगत केली असून शिवाय ते हार्मोनियमचे एकल वादनही करतात. अरविंद थत्ते यांनी पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात ३५ गायकांना एकूण ७०हून अधिक वेळा पेटीची साथ केली आहे.
अरविंद थत्ते यांच्या शिष्यांमध्ये सुयोग कुंडलकर आणि चैतन्य कुंटे ही प्रमुख नावे आहेत.
अरविंद थत्ते यांना मिळालेले पुरस्कार
संपादन- वसंतोत्सवातले पुरस्कार
- लीलाताई जळगावकर पुरस्कार
- सोलापूरच्या राम पुजारी प्रतिष्ठानचा कुमार गंधर्व पुरस्कार (१९९३)
- राष्ट्रपती पुरस्कार