अभिनवगुप्ताची रसविघ्ने
रसिकाची अलौकिक पातळी सुटल्यामुळे किंवा व्यक्तीसंबद्ध रतीक्रोधादी भावना प्रबळ झाल्यामुळे रसाचा आस्वाद घेण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. रसाच्या आस्वादात येणाऱ्या या अडथळ्यांना अभिनवगुप्ताने रसविघ्ने असे नाव दिले आहे. ही रसविघ्ने ७ प्रकारची आहेत.
संभावनाविरह
संपादनरसिकाच्या ठिकाणी काव्यास्वाद घेण्याची पात्रता असली पाहिजे. ही पात्रता कल्पनाशक्तीमुळे येते. संभावनाविरह म्हणजे रसिकाजवळ असणारा कल्पनाशक्तीचा अभाव. रसिकाजवळ काव्यातील वर्ण्य विषयाशी तादात्म्य पावण्याची क्षमता नसल्यास काव्यातील सौंदर्य त्याला प्रत्ययाला येणेच शक्य नाही. लौकिक जीवन हा जरी काव्यसृष्टीचा पाया असला तरी कवीने आपल्या कल्पनाशक्तीने त्याला अपूर्व स्वरूप दिलेले असते. हे अपूर्व स्वरूप जाणून घेण्यासाठी रसिकाकडेही कल्पनाशक्ती असणे आवश्यक ठरते. रसाच्या प्रतीतीसाठी जशी कल्पनाशक्ती आवश्यक असते तशीच रसाच्या निर्मितीसाठीही कल्पनाशक्ती आवश्यक असते. त्यामुळे जर कवीच्या ठिकाणीही कल्पनाशक्ती नसेल तर त्याचे काव्यही नीरस होऊन जाईल. कवी केवळ कल्पनाशक्तीच्या बळावरच परचित्त प्रवेश करू शकतो. अन्यथा त्याचे काव्य रसाची प्रतीती देण्यात असमर्थ ठरेल.
स्व-पर-गत देशकाल विशेषाविशेष
संपादनकाव्याचा आस्वाद घेताना रसिकाच्या ठिकाणी असलेले 'मी'पण नष्ट झाले पाहिजे. रसिकाच्या ठिकाणी 'हे माझे आहे.', 'हे परक्याचे आहे.', 'हे विशिष्ट देशातील आहे.', 'हे विशिष्ट काळातील आहे.' असा जर स्व-पर-स्थळ-काळ याविषयीचा विशिष्ट भाव जागृत असेल तर त्याला रसास्वाद घेणे अशक्य होते. रसाचा आस्वाद घेण्यासाठी रसिकाच्या मनातील स्वसंबद्ध भाव नाहीसा होऊन तो साधारण्याच्या पातळीवर येणे आवश्यक असते. असे न घडल्यास काव्यातील केवळ सुखकारक भागच आस्वाद्य वाटेल. या आस्वादात शुद्ध आनंद नसून वृत्ती स्व-पर भावाने, स्वार्थबुद्धीने शबलित झालेल्या असतील. काव्यानंदासाठी स्व-पर प्रमाणेच स्थलकाळाचेही बंधन सुटले पाहिजे. शेक्सपिअरची नाटके एकविसाव्या शतकातील भारतीयांना आस्वाद्य होण्यासाठी त्यांची स्थळ-काळविषयक भवान व्यापक बनली पाहिजे. विशिष्ट काळातील विशिष्ट पात्रांच्या माध्यमातून वर्णिलेले भाव त्या त्या पात्रांचे नसून सर्वसामान्य स्त्री-पुरुषांचे आहे हे जाणण्याचे सामर्थ्य रसिकाच्या ठिकाणी असले पाहिजे. आनंदवर्धनाने यालाच तत्त्वार्थदर्शिनी बुद्धी असे म्हणले आहे. या बुद्धीच्या सहाय्याने स्व-पर भावाच्या अतीत होऊन साधारण्याच्या पातळीवरून काव्याचा आस्वाद घेऊ शकतो.
निजसुखादीविवशीभाव
संपादनरसिक जर स्वतःच्या सुखदुःखात मग्न असेल तर त्याला काव्याचा आस्वाद निर्विघ्नपणे घेता येत नाही. यासाठीच लेखक आपल्या काव्यात रसिकाला त्याच्या व्यक्तिगत सुखदुःखांचे विस्मरण व्हावे या दृष्टीने काही गोष्टींची योजना करीत असतो. गीत, नृत्य, चमत्कृतीपूर्ण नाट्यमय प्रसंग, भाषाशैली यांच्या सहाय्याने रसिकाला लौकिक जगतातून अलौकिक जगतात नेण्याचा कवीचा प्रयत्न म्हणजे या रसविघ्नाचे निवारणच आहे. कवीप्रमाणेच रसिकानेही स्वतःच्या व्यक्तिगत सुखदुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याशिवाय त्याला रसाचा आस्वाद घेता येणार नाही.
प्रतीती-उपाय-वैकल्य
संपादनविभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव हे रसनिष्पत्तीचे उपाय (कारक) आहेत. हे उपायच जर विकल असतील तर रसाची प्रतीती येऊ शकत नाही. वर्ण्य विषयाची अंगोपांगे कवीने सूक्ष्मपणे वर्णावयास हवीत, नाट्यगत पात्रांनी उत्तम अभिनय केला पाहिजे. तरच रसिकाला काव्यार्थाचा साक्षात प्रत्यय येऊ शकेल. कवीचे वर्णनसामर्थ्य अगर पत्राचे अभिनयसामर्थ्य विकल असणे हे मोठेच रसविघ्न आहे.
स्फुटत्त्वाभाव
संपादनकवीने आपल्या काव्यार्थासाठी किंवा नाट्यार्थासाठी लोकधर्मींचा आधार घेतला पाहिजे, तरच कवीचा भाव साक्षात प्रतीतीचा विषय होऊ शकेल. उदा: ग्रामीण जीवनातील प्रसंग चित्रित करावयाचा असल्यास ग्रामीण जनतेच्या आशा-आकांक्षा-श्रद्धा-भावना योग्य वातावरणासह वर्णिल्या पाहिजेत. भाषा, आचरण, चालीरीती याच्या वास्तव चित्रणाने त्या जीवनाचा रसिकाला स्फुट प्रत्यय येऊ शकेल. यालाच भरताने लोकधर्मी वृत्ती-प्रवृत्ती असे म्हणले आहे. कोणत्याही भावानुभवाचे साक्षात्करण यांच्याच आधारे होऊ शकते. काव्यार्थाचे प्रत्यक्षवत् चित्रण न होणे म्हणजेच स्फुटत्त्वाभाव हे विघ्न होय.
अप्रधानता
संपादनकाव्य-नाटकांतील प्रधान विषय सोडून गौण विषयाला अतिरिक्त महत्त्व दिल्यास अपेक्षित स्थायीभाव उत्कट होऊ शकत नाही आणि त्यामुळे त्याचा स्वाद घेणे अशक्य होते. कवीने किंवा पात्राने अपेक्षित परिणाम साधण्याच्या दृष्टीने काव्यार्थातील गौण-प्रधान भागाचे तारतम्य सांभाळले पाहिजे. मध्यवर्ती विषयावरच रसिकाचे मन खिळून राहील अशी काव्य-नाट्याची रचना करावयास हवी.
संशययोग
संपादनविभावादींची योजना अशा औचित्याने करावयास हवी की, रसिकाला कोणत्याही प्रकारे संदिग्धता वाटू नये. विविध भावनांचे प्रत्यक्षीकरण ज्या अनुभावांच्या किंवा अभिनयाच्या माध्यमातून व्हावयाचे त्यांची योजना निश्चित स्वरूपात विशिष्ट स्थायीभावाचा आविष्कार करण्यास समर्थ असावी.
या रसविघ्नांचा परिहार झाला तरच रसिकाला काव्याचा आस्वाद घेणे शक्य होते. यातील काही रसविघ्ने काव्यगत आहेत तर काही रसिकगत आहेत. या रसविघ्नांचा परिहार होऊन कवी-रसिक-हृदयसंवाद साधला तरच चर्वणाव्यापार निष्पन्न होऊ शकेल, असे अभिनवगुप्ताने म्हणले आहे. अभिनवगुप्ताचा रसनिष्पत्तीविषयक विचार आधुनिक काळातील साहित्यशास्त्रकारांच्या विचारांचा पाया ठरला आहे. त्यामुळेच त्याच्या साधारणीकरणाच्या विचारांचा विस्तृत परामर्श घेणे आवश्यक ठरते.[१]
संदर्भ
संपादन- ^ गाडगीळ स. रा. : काव्यशास्त्रप्रदीप
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |