अब्दु्ल हलीम जाफर खान

उस्ताद अब्दुल हलीम जाफर खॉं (जन्म : मध्य प्रदेश, १८ फेब्रुवारी, इ.स. १९२७; - मुंबई, ४ जानेवारी, इ.स. २०१७) हे एक हिंदुस्तानी संगीत वाजवणारे सतारवादक होते.

इंदूरच्या बीनकार घराण्याची पताका फडकवणारे आजोबा आणि वडील यांच्यापासून संगीताचा वारसा जन्मसिद्ध हक्काने मिळालेले हलीम जाफर खॉं हे त्या घरातील एकमेव सतारवादक होत. भारतातील हिंदुस्थानी आणि कर्नाटक या दोन संगीत परंपरांचा सुखद मिलाप करून खॉंसाहेबांनी नव्या प्रयोगालाही सुरुवात केली होती. कर्नाटक संगीतात प्रचलित असलेले किरवाणी, लतांगी, गणमूर्ती यांसारखे अनेक राग त्यांनी हिंदुस्थानी संगीत शैलीत आणले, त्यावर नवे संस्कार केले आणि त्यातून रसिकांना अपूर्वाई अनुभवता आली.

१९५८ मध्ये जाफर खॉंसाहेबांची गाठ पियानोवादक आणि संगीतकार डेव्ह ब्रुबेक यांच्याशी पडली. तेथपासून एका नव्या युगाचाही आरंभ झाला. इंग्लिश गिटारवादक ज्युलिअन ब्रेम यांच्याबरोबर खॉंसाहेबांनी १९६३ मध्ये जाहीर कार्यक्रमही सादर केला. संगीतातून व्यक्त होणाऱ्या भारतीय संवेदनांना पाश्चात्त्यांच्या शैलीत मिसळून टाकणे ही तेव्हा तर अजब गोष्ट होती. ऐकणाऱ्यास या दोन्ही संगीत परंपरांचे आकलन होत असतानाच एका नव्या आनंदाची अनुभूतीही मिळाली आणि त्यातूनच जागतिक पातळीवरील स्वरसंवादाला सुरुवात झाली.

परंपरेने चालत आलेले ज्ञान आपल्या सर्जनाने उजळून टाकण्यासाठी अब्दुल हलीम जाखर खॉं यांनी जाफरबानी ही सतारवादनाची नवी शैली विकसित केली.

‘गूॅंज उठी शहनाई’ या १९५९ सालच्या चित्रपटातील उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांच्याबरोबरची त्यांची जुगलबंदी विशेष गाजली. संगीत दिग्दर्शक वसंत देसाई, सी. रामचंद्र, मदनमोहन आणि नौशाद यांनी अब्दुल हलीम जाफरखन यांच्या सतारवादनाचा आपल्या चित्रपटांसाठी उपयोग करून घेतला.

खॉंसाहेबांनी संगीत शिकवण्यासाठी मुंबईत १९७६ साली ‘हलीम अ‍ॅकॅडमी ऑफ सतार’ ही संस्था सुरू केली.

अब्दुल हलीम यांचे सतारवादन असलेले हिंदी चित्रपट संपादन

  • कोहिनूर
  • गूॅंज उठी शहनाई
  • झनक झनक पायल बाजे
  • परवाना
  • मुगले आझम

अब्दुल हलीम जाफर खान यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान संपादन

  • पद्मश्री (१९७०)
  • पद्मभूषण (२००६)
  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९८७), वगैरे.