अब्दुल रसूल कुर्बान हुसेन

अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हे सोलापूर येथील स्वातंत्र्य चळवळीतले पत्रकार होते. कुर्बान हुसेन यांना इंग्रजांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल दोषी ठरवून, १२ जानेवारी १९३१ रोजी फासावर चढविले. त्यावेळी कुर्बान हुसेन यांचे वय अवघे २२ वर्षे होते. एवढ्या तरुण वयात हौतात्म्य लाभलेले ते पहिलेच संपादक असावेत.[]

कुर्बान हुसेन
जन्म अब्दुल रसूल कुर्बान हुसेन
सोलापूर, महाराष्ट्र
मृत्यू १२ जानेवारी १९३१
मृत्यूचे कारण फाशी
राष्ट्रीयत्व भारतीय
ख्याती स्वातंत्रसैनिक
धर्म इस्लाम

सोलापुरातील स्वातंत्र्यलढा दडपण्यासाठी इंग्रजांनी मार्शल कायदा लागू केला. त्यामुळे कुर्बान हुसेन यांचे वृत्तपत्र बंद पडले.त्यांनी १९२७ साली ‘गझनफर’ नावाचे उर्दू भाषेतील साप्ताहिक सुरू केले होते. ‘गझनफर’ या शब्दाचा अर्थ आहे सिंह. लोकमान्य टिळकांच्याकेसरी’ वृत्तपत्राने ज्याप्रमाणे स्वातंत्र्यलढ्यासाठी जागृती केली, त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हयात कुर्बान हुसेन यांच्या ‘गझनफर’ वृत्तपत्राने कार्य सुरू केले होते. गझनफर हे नाव उर्दू भाषेतील होतं, परंतु ते मराठी भाषेत देवनागरी लिपीत छापले जात असे. त्यांनी गझनफर वृत्तपत्रातून स्वातंत्र्यलढा, कामगारांचे प्रश्न, हिदु-मुस्लिम ऐक्य यासह विविध विषयांवर लेखन केले.[] त्यांची भाषा प्रभावी आणि परखड होती. कुर्बान हुसेन हे एका सामान्य मुस्लिम कुटुंबात जन्माला आले. ते गिरणी कामगार होते. काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जात होते, ते सभांमध्ये अतिशय प्रभावी भाषणे करीत असत. ५ मे १९३० रोजी महात्मा गांधीजींना अटक झाल्यानंतर सोलापूर शहरात जे सभा झाली, त्यातील त्यांचे भाषण ऐकून तरुण कार्यकर्ते इंग्रजाविरुद्ध पेटून उठले होते. सोलापुरातील तरुण रस्त्यावर उतरल्यानंतर येथील परिस्थिती कलेक्टर यांच्या नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे ९, १०, ११ मे १९३० हे तीन दिवस सोलापूर शहरात इंग्रज सरकारचे शासनच नव्हते. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी तीन दिवस सोलापूर शहराने पूर्ण स्वातंत्र्य अनुभवले.

संदर्भ

संपादन
  1. ^ पुंडे, नीलकंठ (प्रथम आवृत्ती , मार्च २००९). मार्शल लॉ आणि सोलापूरचे चार हुतात्मे. सोलापूर: सुविद्या प्रकाशन. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ मोकाशी, रवींद्र (६ जानेवारी २०१६). "कुर्बान हुसेन यांची पत्रकारिता राष्ट्रप्रेम सामाजिक ऐक्याची". दिव्य मराठी. २० ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.