अबोली प्रतिष्ठान हे जळगावमधील होमिओपॅथीचे डॉक्टर सुनीलदत्त चौधरी यांच्या मदतीने आणि सल्ल्यावरून समाजातील विविध क्षेत्रातील तरुणांनी येऊन स्थापना केलेली संस्था आहे. ही ना नफा ना तोटा या भावनेने चालणारी बिनसरकारी सामाजिक संस्था असून, संस्थेचा उद्देश समाजातील अभागितांची दुःखे दूर करणे हे, आणि संस्थेचे ध्येय लोकांमधली उच्चनीचतेची भावना दूर करणे हे आहे. अबोली प्रतिष्ठानचे कार्य प्रामुख्याने सातपुड्याच्या परिसरातील आदिवासी खेड्यांत चालते.

या संस्थेने केलेली किंवा करायला घेतलेली कामे अशी आहेत -

  • वणीच्या सप्तशृंगीला जाताना वाटेत लागणाऱ्या गणपती मंदिराची दुरुस्ती करून तिथे एक सभागृह बांधले.
  • शेंदुर्णीच्या त्रिविक्रम महाराज मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले.
  • मध्य प्रदेशातील झाबुवा जिल्ह्यात नर्मदा नदीच्या तीरावर बडवाणी गावाजवळ एक केवडा नावाचे खेडे आहे. नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांना, वाटेत विसावा घेता यावा, म्हणून या देवळातील गाभारा दुरुस्त करून त्याच्या समोर एक दरबार सभागृह बांधून दिले.
  • हाटणी आणि नर्मदा नद्यांच्या संगमावरील एका आदिवासी खेड्यातील रहिवासी अतिशय गरीब असल्याने ते वर्षानुवर्षे परिक्रमा करणाऱ्यांना लुटतात. त्यांनी असे करू नये म्हणून त्यांच्यासाठी अबोली प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अन्नधान्य, गूळ, खाद्यतेले, कपडे, पांघरुणे, पायताणे वगैरे गोष्टी, तेथे जाऊन वाटतात.
  • स्वाइन फ्ल्यूच्या साथीच्या वेळी अबोली प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना, प्राथमिक शिक्षकांना, अंगणवाडीच्या शिक्षिकांना आणि एस.टी.च्या कामगारांना नाक-तोंड झाकण्यासाठी हजारो फेस मास्क(Face Mask) पुरवले होते.
  • अबोलीने जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात असलेल्या वैजापूर् या सातपुड्याच्या जंगलातील आदिवासी खेड्यात ११-९-२०१० रोजी एक पाच दिवसाचे मोफत वैद्यकीय सेवा शिबीर घेतले होते. अबोलीचे अध्यक्ष डॉ. नीलेश लालवाणी, डॉ. सुनीलदत्त चौधरी आणि अबोलीचे अनेक कार्यकर्ते तेथे राबत होते. त्यांनी तिथे गरजू आदिवासी स्त्रियांना एकेक साडी व जरुरी कपडे, आणि पुरुषांना पायजमे वगैरे वाटले होते.


संदर्भ

संपादन

अबोली प्रतिष्ठानचे संकेतस्थळ

पहा : प्रतिष्ठाने