अनुनासिक
बोलताना जो नाकातून ओझरता असा उच्चार होतो त्या उच्चाराला अनुनासिक असे म्हणतात. आणि ज्या (वर्णाचा)अक्षराचा असा उच्चार होतो त्या अक्षराला अनुनासिक उच्चाराचे अक्षर असे म्हणतात. उदा० अं, हं, (के)लें, हिंदीमधले मॉं, फ्रेन्चमधले रेस्तरां वगैरे. मराठी मुळाक्षरांमध्ये ङ, ञ, ण, न, म ही पाच नासिक्य व्यंजने आहेत. या नासिक्य व्यंजनांपैकी ङ आणि ञ या वर्णांचा उच्चार शुद्ध अनुनासिक आहे. या पाचांमधल्या कोणत्याही वर्णाचा लगेच पुढे आलेल्या व्यंजनाशी संयोग झाला की त्या जोडाक्षराचा खणखणीत अनुनासिक उच्च्चार होतो. मात्र नासिक्य वर्णाचा(पर-सवर्णाचा) असा संयोग फक्त त्याच वर्गातील व्यंजनाशी करावा असा संस्कृतमध्ये संकेत आहे. उदा० क, ख,ग, घ या अक्षरांचा ’ङ’ हा पर(पुढचा)-सवर्ण.
उदाहरणे
संपादनपर-सवर्ण जोडलेल्या व्यंजनाच्या उच्चाराचा शब्द | हा शब्द मराठीत शुद्धलेखनाच्या नियमांसअनुसरून पर-सवर्णाच्या ऐवजी या रकान्यात दिल्याप्रमाणे अनुस्वार देऊन लिहितात. | |
ङ् | दङ्गा | दंगा |
ञ् | झाञ्ज, अञ्जन', काञ्चन, लाञ्च्छन, नञ् (तत्पुरुष समास) | झांज, अंजन, कांचन, लांछन |
ण् | बण्ड,पाण्डे | बंड,पांडे |
न् | खन्त,यन्दा,कान्दा,रान्धा | खंत,यंदा,कांदा,रांधा, |
म् | सम्प | संप |
तत्सम
संपादनखणखणीत नाकात उच्चारले जाणारे अनुस्वारयुक्त तत्सम शब्द हिंदी-संस्कृतमध्ये लिहिताना पर-सवर्णयुक्त जोडाक्षर लिहितात. अशा वेळी अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच पर-सवर्ण म्हणून वापरतात.
मराठीत लिहिताना पर-सवर्णाच्या या रकान्यात दिल्याप्रमाणे अनुस्वार देऊन लिहावे | हिंदी-संस्कृतमध्ये शुद्धलेखनाचे नियमासअनुसरून ते शब्द पर-सवर्णयुक्त लिहितात. |
पंकज | पङ्कज', |
पंचानन, | पञ्चानन, |
पंडित | पण्डित, |
अंतर्गत | अन्तर्गत, |
अंबुज | अम्बुज. |
परस-वर्ण केव्हा चालत नाहीत
संपादनय, र, ल, व, श, ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ यांच्यापूर्वी येणाऱ्या नाकातल्या नाकात केलेल्या उच्चारांसाठी (अनुस्वार)शीर्षबिंदूच देतात.
- उदाहरणार्थ: संयम, संरचना, संलग्न, संवाद, दंश, दंष्ट्रा, मांस, सिंह, खंळ, सॅंक्षन, संज्ञा' हे शब्द 'सय्यम, सौंरचना/संव्रचना, संल्लग्न, सउंवाद/संव्वाद, दंव्श, दञ्ष्ट्रा, माउंस/मांव्स, सिंव्ह, खंळ्ळ, सॅङ्क्षन, संव्ज्ञा' असे लिहीत नाहीत.
- नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावताना : उदा० स्त्रियांत, शब्दांमध्ये, आम्हांला, तुमच्यासारख्यांना, वकिलांनी, जतूंपासून, घरांपुढे वगैरे शब्दांत पर-सवर्ण चालत नाहीत.
- अनुस्वाराचा खणखणीत उच्चार नसेल तेव्हा. उदा० हं हं, चीं चीं, कोंकण, मुळगांवकर, आशा भोंसले वगैरे शब्दांत.
- एका व्यक्तीचा आदरार्थी उल्लेख करतात तेव्हा. उदा० नेहरूंनी, आजोबांपाशी, आपणांस, तुम्हांला वगैरे उल्लेख असताना.
- शुद्धलेखनाच्या जुन्या नियमांनुसार लेखन करीत असताना, किंवा जुन्या पुस्तकांची नवी आवृत्ती काढताना अर्धोच्चारित अनुस्वार जेथे जसे मुळात होते तेथे तसेच छापतात.
- शुद्धलेखनाच्या जुन्या नियमांनुसार अर्थभेद, व्युत्पत्तिभेद, लिंगभेद आणि वचनभेद दाखवताना. उदा० गुरूं/गुरू, नांव/नाव, घोडी/घोडीं, शब्दांत/शब्दात. येथे पर-सवर्ण वापरत नाहीत.
- प्रमाण भाषेतील एं या उच्चाराऐवजी बोलीभाषेत वापरल्या जाणाऱ्या दीर्घ अ या उच्चारासाठी. उदा० घरें ऐवजी घरं इत्यादी ठिकाणी
- लंडन, इंडिया, स्कॉटलंड, फ्रॅंकेस्टाइन, ग्रॅंट, बॉंब, कॅंप यांसारख्या मराठीत रूढ वापर असलेल्या शब्दांमध्ये अनुस्वार(शीर्षबिंदू)च वापरतात.
- शब्द रूढ नसतील तर परसवर्णाऐवजी न् वापरतात. उदा० अँड, फ्रेन्च, इ.
- चंद्रबिंदूयुक्त हिंदी शब्द मराठीत लिहिताना चंद्रबिंदू लिहितात, पण जर शब्दाचे मराठीकरण झाले आहे असे वाटले तर नुसता शीर्षबिंदू देतात. उदा० मॉं/मां, हूॅं/हूं, हॅंसी/हंसी, हैॅं/हैं इ. या ठिकाणी पर-सवर्ण चालत नाही.
परस-वर्ण/नासिक्य वर्ण केव्हा अनिवार्य आहेत
संपादन- हिंदी किंवा संस्कृत लिहिताना
- व्याकरणाच्या पुस्तकात किंवा शब्दकोशात उच्चार स्पष्ट करून दाखवण्यासाठी
- इंग्रजी शब्दातल्या ingचा उच्चार शब्दकोशांत इङ् असा लिहिलेला असतो. उदा० वॉशिङ्टन
- सन्मान, मृण्मय, निम्न, वाङ्मय, वाङ्निश्चय, अन्य, हेन्री, आम्ल, अननन्वित, होन्शू, अन्सारी, ब्रम्ह, यांसारख्या नासिक्य वर्णाची जोडाक्षरे असलेल्या शब्दांत
- अन्न, अण्णा, निम्मा या शब्दांत झाले आहे तसे, नासिक्य वर्णाचे द्वित्त झाल्यास.
- संस्कृत शब्द याच्ञा, आणि पालीमधले असंख्य शब्द लिहिताना नासिक्य वर्णच लिहावा लागतो.
- दक्षिण आफ्रिकेतील व भारताच्या ईशान्य भागांतील काही शब्दांत आणि व्यक्तिनामांत ङ आणि ञ ही अक्षरे येतात. उदा० ङक्रुमा, दार्जिलीङ, बाङ्ला, ममगाङ, निङतान, फालिङ, ङचेख इ.
- सामासिक शब्दांतला दुसरा शब्द ’अंत’ असेल तेव्हा. उदा० वेदान्त, देहान्त, सु्खान्त, शालान्त, सिद्धान्त वगैरे. असे न करता हे शब्द अनुस्वार वापरून अनुक्रमे वेदांत, देहांत, सुखांत, शालांत, सिद्धांत असे लिहिले तर त्यांचे अर्थ अनुक्रमे अनेक वेदांमध्ये, अनेक देहांमध्ये, सुखांमध्ये, शाळांमध्ये, सिद्ध पुरुषांमध्ये असे होतील.