नारायण आठवले
नारायण आठवले (जन्म : १६ ऑगस्ट १९३२; - २८ एप्रिल २०११) हे मराठी भाषेतील पत्रकार, साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक आणि भारतातील शिवसेना या राजकीय पक्षाचे माजी खासदार होते. ते त्या पक्षाच्या तिकिटावर इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये, महाराष्ट्र राज्यातील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांची खासदारकीची कारकीर्द जेमतेम अठरा महिन्यांची होती.
त्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा, गोवा मुक्ति चळवळ आदी आंदोलनांत सक्रिय भाग घेतला होता. ४०हून अधिक वर्षे त्यांनी राजकारणावर आणि सामाजिक विषयांवर लेखन केले. लोकाभिमुख पत्रकार म्हणून त्यांनी महाराष्ट्रात व गोव्यात गोमंतक, जनवाणी, लोकमित्र, लोकसत्ता, नवशक्ती ह्या वर्तमानपत्रांत, आणि प्रभंजन, चित्रलेखा आदी साप्ताहिकांमधून लिखाण केले. त्यांची लोकसत्तेतील भारूड आणि फटकळ गाथा ही सदरे गाजली होती. सोबत या साप्ताहिकात त्यांचे लिखाण ’बॉम्बे कॉलिंग’ या, आणि चित्रलेखामध्ये ’महाराष्ट्र माझा’ आणि ’सख्या हरी’ या शीर्षकांखाली होत असे.
नारायण आठवले यांनी गोव्यात ‘लोकविश्वास प्रतिष्ठान‘ या नावाच्या मूकबधिर मुलांसाठीच्या संस्थेच्या स्थापनेसाठी मोलाचे काम केले.[ संदर्भ हवा ] ही संस्था मूकबधिर मुलांसाठी निवासी शाळा चालवते.
‘गोमंतक मराठी अकादमी‘च्या उभारणीतही त्यांचे योगदान होते.[ संदर्भ हवा ]
अनिरुद्ध पुनर्वसू यांचे साहित्य
संपादनत्यांनी त्यांचे ललित व अन्य साहित्य अनिरुद्ध पुनर्वसु, नाना वांद्रेकर, नारायण महाराज, पूर्वा नगरकर, फकीरदास फटकळ आणि सख्याहरी या टोपण नांवांनी लिहिले. नारायण महाराज या नावाने त्यांनी विडंबनकाव्य लिहिले. त्यांच्या नांवावर एकूण १८ कादंबऱ्या, दोन कथासंग्रह आणि सुमारे ५ लेखसंग्रह एवढे साहित्य प्रकाशित झाले आहे.
कादंबऱ्या, लेखसंग्रह वगैरे
संपादन- घाव घाली निशाणी (लेखसंग्रह)
- थोरला हो (कादंबरी)
- नाही प्रीत पंतंगाची खरी (कादंबरी)
- रेसचा घोडा (कादंबरी)
- लटिके बोलेल तो अधम
- सहस्रेषु (कादंबरी)
- सुखरूप (कादंबरी)
नारायण आठवले यांना मिळालेले पुरस्कार
संपादन- आचार्य अत्रे स्मृति पुरस्कार १९९२मध्ये
- पुढारीकार डॉ.ग.गो. जाधव स्मृति पुरस्कार २००७ मध्ये..
- गोमंतक मराठी अकादमीचा कै.गो.पु. हेगडे पुरस्कार नारायण आठवले यांना १९९४ साली मिळाला.
- भ्रमंती पुरस्कार १९९५मध्ये.
- मुंबई पत्रकार संघाचा जयहिंद प्रकाशन पुरस्कार १९८५मध्ये.
- समतानंद अनंत हरि गद्रे पुरस्कार १९९४मध्ये