अड्रयेई ब्यलई
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
अड्रयेई, ब्यलई (२६ ऑक्टोबर १८८० – ८ जानेवारी १९३४). रशियन प्रतीकवादी कवी, कादंबरीकार, सिद्धांतकार आणि साहित्य समीक्षक. खरे नाव बर्यीस बूगायेव्ह. जन्म मॉस्को येथे एका बौद्धिक कुटुंबात. वडील, निकोलायविच बूगायेव्ह, एक प्रसिद्ध गणितज्ञ आणि प्राध्यापक. मॉस्को स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्सचे संस्थापक. आई अत्यंत बुद्धिमान आणि पियानोवादक. तिने बर्यीसला लहान वयातच संगीत शिक्षण दिले. बर्यीस मॉस्कोमधील ऐतिहासिक क्षेत्र अरबात येथे मोठा झाला. विविध विषयांचा व्यासंगी विद्वान. व्यासंगांमध्ये गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, संगीत, तत्त्वज्ञान आणि साहित्य यांचा समावेश. निकोलायविच बूगायेव्ह त्यांच्या प्रभावशाली तात्विक निबंधासाठी प्रसिद्ध होते. त्यात भूमिती आणि संभावनीयतेवर टीका तर काळजीपूर्वक आणि काटेकोर विश्लेषणावर भर असायचा. वडिलांच्या गणितातील अभिरुचीमुळे, त्यातील संभावनीयतेच्या तत्वाने, विशेषतः एन्ट्रॉपीने (अनिश्चितता आणि यादृच्छिकतेचे तत्व) तो प्रभावित होता. या तत्त्वांचा कोटिक लेटायेव्ह (१९१७) ह्या त्याच्या आत्मचरित्रात्मक लेखनात वारंवार उल्लेख त्याने केला आहे.
एल्. आय्. पॉलिव्हानॉव्ह ह्या श्रेष्ठ रशियन शिक्षकाच्या खाजगी संस्थेत त्याने आरंभीचे शिक्षण घेतले. पॉलिव्हानॉव्हने त्याला कवितेची गोडी लावली. पुढे मॉस्को विद्यापीठातून तत्त्वज्ञान आणि गणित ह्या विषयांच्या पदव्या त्याने मिळविल्या. प्रसिद्ध रशियन तत्त्वज्ञ व्हल्द्यीम्यीर सोलोवह्योव्ह ह्याचा सहवासही त्याला लाभला आणि सोलोव्ह्योव्हच्या गूढवादी विचारांचा प्रभाव ब्येलईवर पडला. कविता म्हणजे अंतःप्रज्ञेने केलेले सत्य व परमेश्वर ह्यांचे आकलन असून प्रतीकवाद हा धर्मच होय, असे सोलोव्ह्योव्हचे विचार होते. ब्येलई हा रशियन प्रतीकवादी काव्यसंप्रदायात सामील झाला, ह्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे सोलोव्ह्योव्हचा त्याच्यावर असलेला प्रभाव. एक तरुण माणूस म्हणून, ब्येलईवर तत्त्वज्ञ व्हल्द्यीम्यीर सोलोव्ह्योव्हच्या कुटुंबाचा, विशेषतः त्याचा धाकटा भाऊ मिखाईलच्या विचारांचा अत्यंत प्रभाव पडला; मिखाईलचे वर्णन त्याच्या दीर्घ आत्मचरित्रात्मक कवितेत ‘द फर्स्ट एन्काऊंटर’ (१९२१) मध्ये आढळते. हे शीर्षक व्हल्द्यीम्यीर सोलोव्ह्योव्हच्या ‘थ्री एंकॉउंटर्स’ या शीर्षकावर आधारलेले आहे. मिखाईल सोलोव्ह्योव्हनेच बूगायेव्हला त्याचे टोपणनाव ‘अड्रयेई ब्यलई’ दिले.
१९१३ नंतर ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ रूडोल्फ स्टाइनर ह्याच्या ‘अंथ्रॉपॉसॉफी’ (मानवी बुद्धीमध्ये आध्यात्मिक जगाशी संपर्क साधण्याची क्षमता आहे या तत्त्वावर आधारित तत्त्वज्ञान.) ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तत्त्वज्ञानानेही ब्येलई प्रभावित झाला, भारला गेला. स्टाइनरचे तत्त्वज्ञान रशियन प्रतीकवादी मनोभूमिकेला अनुकूलच होते. रशियन प्रतीकवादी कवींना सारे विश्व हीच विविध प्रतीकांनी घडविलेली एक व्यवस्था वाटत होती आणि स्टाइनरला मानवी पिंड हा ब्रह्मांडाचेच प्रतीक वाटत होता. १९०२ साली ‘सिंफनी’ (सेकंड ड्रॅमॅटिक) ह्या इंग्रजी शीर्षकार्थाचे त्याचे गद्यकाव्य प्रसिद्ध झाले आणि त्यानंतर अशा तीन सिंफनी त्याने प्रसिद्ध केल्या. तालबद्ध, नादवती शब्दकळेमुळे उत्कृष्ठ सांगीतिक रचनांसारख्या वाटणाऱ्या ह्या गद्यकाव्यांच्या रूपाने ब्येलईने एक आगळा साहित्यप्रकार रशियन भाषेत आणला. आपल्या ह्या रचनांना सांगीतिक, औपरोधिक आणि तात्त्विक-प्रतीकात्मक असे अर्थाने तीन पैलू असल्याचे ब्येलईने म्हणले होते. गोल्ड इन अँझर (१९०८, इं. शी.), अँशिस (१९०८, इं.शी.) आणि अर्न (१९०८, इं. शी) हे ब्येलईचे काव्यसंग्रह उल्लेखनीय आहेत. काव्याभिव्यक्तीच्या दृष्टीने रशियन भाषेच्या अंतःशक्तीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणाऱ्या कवींत ब्येलईचा समावेश होतो. प्रगाढ गांभीर्य हे रशियन प्रतीकवादी कवींच्या कवितेचे एक महत्त्वाचे वैशिष्टय. तथापि ब्येलईच्या कवितेत त्याची तत्त्वचिंतनात्मक वृत्ती दिसून येत असली तरी, त्याच्या मार्मिक विनोदबुद्दीचा प्रत्ययही अनेकदा येतो आणि त्या संदर्भात अन्य रशियन प्रतिकवादी कवींहून त्याचे वेगळेपण ठसठशीतपणे जाणवते.
सिल्हर डव्ह (१९१०, इं. शी.) आणि पीटर्झबर्ग (१९१६) ह्या त्याच्या कादंबऱ्यांपैकी पीटर्झबर्ग ही कादंबरी विशेष मान्यता पावली. सिल्वहर डव्हवर विख्यात रशियन साहित्यिक निकोलाय गोगोल ह्याचा प्रभाव दिसून येतो. तथापि सिल्वर डव्ह हा गोगोलची अनुकृती नव्हे ; ब्येलईच्या स्वतंत्र प्रतिभेचा ठसा तीवर स्पष्टपणे उमटलेला आहे. सिल्वर डव्ह मध्ये पौर्वात्य आणि पश्चिमी संस्कृतींतील विरोध प्रत्ययकारीपणे चित्रित केला आहे, तर पीटर्झबर्ग मध्ये रशियन नोकरशाही व क्रांतिकारक ह्यांच्या चित्रणातून क्रांतिपूर्व रशियातील ढासळत्या स्थितीचे दर्शन घडविलेले आहे. आपल्या लेखनातून ब्येलईने भाषेचे विविध प्रयोग केले. ही त्याची प्रयोगशीलता युगप्रवर्तक आयरिश कादंबरीकार जेम्स जॉइस ह्याच्या लेखनप्रवृत्तीशी निकटचे नाते जोडणारी आहे. कोटिक लेटायेव्ह (१९१७) ह्या त्याच्या आत्मचरित्रात्मक लेखनात तो जॉइसच्या विशेष जवळ आलेला दिसतो. १९१८ साली झालेल्या रशियन क्रांतीचे ब्येलईने स्वागत केले आणि त्या प्रीत्यर्थ ‘क्राइस्ट हॅज प्रिव्हेल्ड’ (इं. शी.) ही कविताही लिहिली. तथापि क्रांत्युत्तर काळातील घटनांनी तो नाउमेद झाल्याचे दिसते.
१९२१ साली तो बर्लिनला गेला पण तेथे त्याला मनःशांती मिळाली नाही. तेथे त्याचे आधीच ताणलेले लग्न कोसळले आणि स्टाइनरच्या शत्रुत्वाचा सामना करावा लागला. ब्यलईने त्याच्या आठवणी लिहायला सुरुवात केली, ज्या नंतर ऑन द बाऊंड्रीज ऑफ टू सेन्चुरीज (१९३०), द बिगिनिंग ऑफ द सेंचुरी, (१९३३) आणि बिटवीन टू रेव्होल्यूशन्स (१९३०) या तीन खंडांमध्ये प्रकाशित झाल्या. १९२३ मध्ये तो रशियास परतला आणि आमरण रशियात राहिला. तेथे त्याने कादंबऱ्यांची त्रयी लिहिली. ज्यांची पार्श्वभूमी मॉस्को शहर होती. त्याने साहित्य समीक्षा देखील लिहिली आणि त्याच्या स्वतःच्या सुरुवातीच्या काळातील लेखनाचे परीक्षण करून त्यात सुधारणा केल्या. १९२० च्या दशकातील ब्यलईचे लिखाण त्याची गद्यातील आणि कथानकांच्या जटिल मांडणीतील अभिरुची दर्शवते. १९३० च्या दशकाच्या सुरुवातीला त्याने लेखांची मालिका लिहून आणि त्याच्या आठवणीपर लेखनांत वैचारिक सुधारणा करून खरा वास्तववादी सोव्हिएत लेखक बनण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे समाजवादी वास्तववादाचा अभ्यास सुरू करण्याची योजना आखली.
१९३२ मध्ये सोव्हिएत युनियनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीच्या हुकूमाने स्थापन झालेली संघटना ज्याने विद्यमान साहित्यिक संस्था रद्द केल्या आणि सर्व व्यावसायिक सोव्हिएत लेखकांना एका मोठ्या संघात सामावून घेतले. युनियनने कम्युनिस्ट पक्षाच्या धोरणांना पाठिंबा दिला आणि ‘समाजवादी वास्तववाद’ या एकल सोव्हिएत साहित्यिक पद्धतीचे समर्थन आणि स्पष्टीकरण केले. याचवेळी १९३२ मध्ये सोव्हिएत युनियनच्या लेखक संघाच्या संघटनात्मक समितीचा तो सदस्य बनला. सर्व उपक्रमांना त्याने प्रयत्नपूर्वक अँथ्रोपोसॉपी आणि रशियन प्रतीकवादाशी जोडले.
अड्रयेई ब्यलई पारितोषिक हा रशियन साहित्यातील सर्वात महत्वाच्या पुरस्कारांपैकी एक पुरस्कार त्याच्या नावावर ठेवण्यात आला. त्याच्या कविता संगीतावर लयबद्ध केल्या गेल्या आणि वारंवार रशियन गायक-गीतकारांनी सादर केल्या. मॉस्को शहरी त्याचे निधन झाले.