ह.रा. महाजनी

(ह. रा. महाजनी या पानावरून पुनर्निर्देशित)

हणमंत रामचंद्र महाजनी (जन्म : १ जून १९०७; - १८ ऑगस्ट १९६९} हे एक समाजवादी विचारसरणीचे पत्रकार म्हणून प्रसिद्ध होते. महाजनी यांचे शिक्षण जुन्या पठडीतील शास्त्रांप्रमाणे झाले होते. त्यांचा संस्कृतचाही अभ्यास होता. त्यामुळे त्यांचे लेखन भारदस्त होई. काही काळ त्यांनी शिक्षकाची नोकरी केली होती.

मराठी दैनिक लोकसत्ताचे संपादक म्हणून ह.रा. महाजनी यांची कारकीर्द दीर्घ म्हणजे तब्बल सतरा वर्षाची ठरली.स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी भाग घेतला होता. मानवेंद्रनाथ रॉय यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. सहसंपादकपदी निवड झाल्यानंतर दोन वर्षातच ते लोकसत्ताचे संपादक झाले. कार्यक्षम वितरण व्यवस्था व शब्दकोड्यांची लोकप्रियता या जोडीला महाजनी यांच्या संपादकीय कर्तृत्वालाहि या यशाचे मोठे श्रेय जाते.

आपल्या लेखन आणि संपादकीय कौशल्याने महाजनी यांनी लोकसत्ताला आघाडी मिळवून दिली. महाजनी यांच्या लेखणीत वाचकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य होते. पण केवळ त्यांच्या लेखनामुळे पत्र लोकप्रिय झाले नाही, तर त्यांच्या संपादकीय कौशल्याच्याही त्याला हातभार लागला होता.. महाजनींची भाषा शिक्षकी स्वरूपाची नव्हती. विषय रंजक कसा करावा याची त्यांना जाण होती. त्यांचे लिखाण तर्ककर्कश असले तरी ते धारदार व खोचकही असे. शि.म. परांजप्यांची वक्रोक्ती व काव्यमयता, न.चिं. केळकरांची रसिकता, लोकमान्य टिळकांचा रोखठोकपणा व आवेश या लेखनगुणांचे संस्कार महाजनींवर झाले होते. ताज्या व वेगळ्या बातम्या, नेटके संपादन, आकर्षण-अर्थपूर्ण शीर्षके, जिल्ह्यांच्या बातम्या, वाचकांचा पत्रव्यवहार या सगळ्यावर त्यांचे बारीक लक्ष असायचे. पत्राची साप्ताहिक आवृत्ती बोजड होऊ नये, त्यात उपयुक्त माहिती असावी यावर ते खास ध्यान देत.

रविवारची चिंतनिका, संगीत शाकुंतल, परी तू जागा चुकलासी, गुन्हेगाराची कैफियत, ईश्वराची आत्महत्या, असे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे.