हॉर्निमन सर्कल हे दक्षिण मुंबईच्या फोर्ट परिसरात आहे. ह्या भागात अनेक हेरिटेज इमारती आहेत. ह्या इमारतींचे व्हिक्टोरियन रचनेत बांधकाम केलेले आहे.जगभरातील पर्यटक येथे अश्या हेरिटेज इमारती पाहण्यासाठी येत असतात.हॉर्निमन सर्कल हे नाव बेंजामिन गाय हॉर्निमन ह्यांच्या नावावरून पडले आहे. हॉर्निमन हे जन्माने ब्रिटिश होते. त्यांचा पेशा पत्रकारिता होता.सन १८९४ मध्ये त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली आणि सन १९०६ मध्ये भारतात येऊन कोलकत्ता येथील स्टेट्समनमध्ये कामास सुरुवात केली. मुंबईत फिरोजशहा मेहता यांनी सुरू केलेल्या बॉम्बे क्रॉनिकल्स या वृत्तपत्राचे संपादक म्हणून सन १९१३ मध्ये त्यांनी सुरुवात केली.त्यांच्या नेतृत्वाखाली बॉम्बे क्रॉनिकल्स हे वृत्तपत्र भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे मुखपत्र बनले.ते भारतीय स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते.त्यांनी भारतीय पत्रकार संघ स्थापन केला. जालियनवाला बागेत झालेल्या हत्याकांडाचे फोटो त्यांनी डेली हेराल्ड वृत्तपत्रामध्ये छापले.त्यांनी जालियनवाला हत्याकांडावर पुस्तक लिहिले.त्यावेळी त्यांना अटक केली आणि इंग्लंडला पाठविले.सन १९२६ मध्ये ते जेव्हा भारतात परतले तेव्हा त्यांनी हेराल्ड नावाचे साप्ताहिक आणि इंडियन नेशनल हेराल्ड नावाचे वर्तमानपत्र चालू केले. हॉर्निमन, रुसी करंजिया,आणि दिनकर नाडकर्णी ह्या तिघांनी ब्लित्झ पत्र चालू केले.दरम्यानच्या काळात हॉर्निमन आजारी पडले तेव्हा सरकारने त्यांचे बँक खाते गोठवलेले असल्यामुळे त्यांच्या कृष्णराव पाटील ह्या कनिष्ठ सहकाऱ्याने हॉर्निमन ह्यांच्या कार्यालयाबाहेर उभे राहून हॉर्निमन यांच्या उपचारासाठी पैसे गोळा केले. दिनांक १६ ऑक्टोबर १९४८ रोजी त्यांचे देहावसान झाले. पाटील कुटुंबियांनी हॉर्निमन ह्यांचा ब्रिटिश पासपोर्ट आणि लिहिण्याचे टेबल जपून त्यांच्या स्मृती जपल्या आहेत. पासपोर्ट व लिहिण्याच्या टेबलाचे फोटो अलिकडेच पाटील कुटुंबियांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.[]

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स,वसई विरार पुरवणी, मंगळवार, दिनांक ३ सप्टेंबर २०२४