हरिभाऊ देशपांडे (जन्मदिनांक अज्ञात - - २३ जून, इ.स. १९८२) हे मराठी ऑर्गनवादक व नाट्य-अभिनेते होते. गंधर्व नाटकमंडळीं मध्ये ऑर्गनवादक म्हणून काम केलेल्या देशपांड्यांनी बालगंधर्वांच्या अनेक संगीतनाटकांतील पदांना ऑर्गनाची साथ केली होती.

संगीताची आवड असलेल्या बालगंधर्व यांच्या कन्या पद्माताई खेडेकर यांनी हरिभाऊ देशपांडे यांच्याकडून पेटीवादनाचे धडे घेतले होते.

हरिभाऊंची तीन मुले - चंद्रशेखर, संजय आणि अनिल ही तिघेही उत्तम ऑर्गन वाजवतात. चंद्रशेखर गायकही आहे. त्यांच्या एका मुलीचे नाव ऊर्मिला वैद्य. हरिभाऊंनी नाट्यसंगीत गाणारे अनेक शिष्य तयार केले. लालजी देसाई, मोहिनी पेंडसे-निमकर, आनंद भाटे हे त्यांपैकी काही. दरवर्षी गुरुपौर्णिमेला जॉली क्लबच्या हॉलमध्ये हरिभाऊंचे शिष्य गात असत. सर्व शिष्यांचे गाऊन झाल्यावर पहाटे साडेचार वाजता स्वतः बालगंधर्व गायला बसत.

हातात इतकी चांगली कला व इतका शिष्यगण असूनसुद्धा हरिभाऊ देेशपांडे यांचे उत्तरायुष्य हलाखीत गेले.

चरित्र संपादन

हरिभाऊंचे चिरंजीव - अनिल हरि देशपांडे यांनी त्यांचे वडील आणि बालगंधर्व यांच्या मैत्रिपूर्ण जीवनावर 'बालगंधर्वांची कला व हरिभाऊ देशपांडे चरित्र' नावाचे पुस्तक लिहिले आहे.

चंद्रशेखर देशपांडे संपादन

चंद्रशेखर देशपांडे (जन्म : ९ जुलै १९३८) हे हरिभाऊंचे ज्येष्ठ चिरंजीव. ह्यांनीही बालगंधर्वांना ऑर्गनची साथ केली होती. वयाच्या १२व्या वर्षी ते पेटी वाजवायला शिकले. त्यांचे पेटीवादन ऐकून हरिभाऊंनी त्यांना ऑर्गन वाजवायला शिकवले. चंद्रशेखर देशपाडे हे नवीन मराठी शाळेत संगीत शिक्षक होते. यांनी जयराम शिलेदार आणि जयमाला शिलेदारयांच्या ‘मराठी रंगभूमी’ संस्थेच्या सुमारे ४०० प्रयोगांमध्ये ऑर्गनची साथ केली आहे. वयाच्या ४५व्या वर्षी त्यांनी ऑर्गनवादन सोडून दिले. त्यानंतर बालगंधर्वांची गायकी नव्या पिढीपर्यंत पोचविण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले. ऑर्गनवादन अवघड असल्याने कोणी ते शिकायला तयार होत नाही असे चंद्रशेखर यांचे म्हणणे आहे.