सोफिया कव्हल्येव्हस्कइ

सोफिया उर्फ सॉन्या कव्हल्येव्हस्कइ ह्या रशियन गणितज्ञ आणि ललित लेखिका. त्यांनी आंशिक विकलक समीकरणाच्या सिद्धांतात महत्त्वाचे योगदान दिले. आधुनिक युरोपात गणित या विषयात पी.एचडी. संपादन करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत, तसेच सायंटिफिक जर्नल्सच्या संपादकीय मंडळात आणि गणितात प्राध्यापक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या पहिल्या महिला होत.

कव्हल्येव्हस्कइ यांचा जन्म रशियातील मॉस्को (Moscow) येथे झाला. लहान वयातच त्यांची गणितातील रुची पालकांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांच्यासाठी खास शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे त्यांना कलनशास्त्राची (Calculus) ओळख झाली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धाच्या त्या काळात रशियात स्त्रियांना विद्यापीठात प्रवेश नव्हता. त्यामुळे त्यांनी व्ल्हॅडिमिर कव्हल्येव्हस्कइ (Vladimir Kovalevskaya) या पुराजीवशास्त्रज्ञाशी विवाह करून १८६८मध्ये पतीसमवेत जर्मनीला प्रयाण केले. तेथे दोन वर्षे हायड्ल्बर्ग येथील विद्यापीठात त्यांनी उच्च गणिताचा अभ्यास केला आणि मग बर्लिन येथे प्रसिद्ध गणिती व्हायरस्ट्रास (Weierstrass) यांच्या खाजगी मार्गदर्शनाखाली अध्ययन आणि संशोधन सुरू ठेवले.

आंशिक विकलक समीकरणांसंबंधीचा त्यांचा शोधनिबंध कोशी-कव्हल्येव्हस्कइ सिद्धांत म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. विश्लेषक आंशिक विकलक समीकरणांमधील स्थानिक अस्तित्व आणि एकमेवता (Local Existence and Uniqueness) यासंबंधीचा हा मुख्य सिद्धांत आहे. यातील एक विशिष्ट प्रकार कोशी यांनी सन १८४२मध्ये सिद्ध केला होता, पण कव्हल्येव्हस्कइ यांनी त्याचे व्यापकीकरण करून पूर्ण सिद्धांत मांडला. ज्यांचे सहगुणक वैश्लेषिक फले आहेत अशा न-मितीय विकलक समीकरणप्रणालींसाठी (systems of n-dimensional integral equations having analytic functions as coefficients) अस्तित्वात असलेल्या उकलींसंबंधी हा सिद्धांत आहे. हे प्रमेय आणि त्याची सिद्धता वास्तव किंवा संमिश्र चलांच्या वैश्लेषिक फलांसाठी (analytic functions of real or complex variables) सत्य आहे.

कव्हल्येव्हस्कइ यांचा अल्पायुषी जीवनपट विसाव्या शतकापूर्वी स्त्रीसंशोधकांच्या वाट्याला येणाऱ्या अडचणींवरही प्रकाश टाकतो. उच्च दर्जाचे संशोधन करूनही त्यानंतर पुढील काही वर्षे केवळ स्त्री असल्यामुळे त्यांना प्राध्यापकपद मिळू शकले नाही. मात्र सन १८८४मध्ये त्या स्वीडनच्या स्टॉकहोम विद्यापीठात प्राध्यापक झाल्या. तेथेच त्या शेवटपर्यंत कार्यरत होत्या. स्थिर बिंदूभोवती घन पदार्थाचे परिभ्रमण (Rotation of a Solid Body about a Fixed Point) या विषयावरील त्यांच्या शोधनिबंधास सन १८८८मध्ये फ्रेंच ॲकेडमी ऑफ सायन्सेसचे प्री बॉरदीन (Prix Bordin) पारितोषिक मिळाले.

कव्हल्येव्हस्कइ यांना गणिताबरोबरच ललित लेखनातही रस होता. त्यांच्या कादंबऱ्या, नाटके आणि निबंध प्रसिद्ध असून त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींवर आत्मचरित्रात्मक लेखनही केले आहे. त्यांना मानवंदना म्हणून गणिती संशोधनात कृतिशील सहभागासाठी स्त्रियांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या द असोसिएशन फॉर विमेन इन मॅथेमॅटिक्स या संस्थेतर्फे सॉन्या कव्हल्येव्हस्कइ दिन या नावाने गणिताच्या प्रसारासाठी विशेष दिवस साजरे केले जातात. यावेळी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थिनी आणि त्यांचे शिक्षक-शिक्षिका यांच्यासाठी व्याख्याने, कार्यशाळा, गणिती कूटप्रश्न सोडविण्याच्या स्पर्धा इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचप्रमाणे या संस्थेतर्फे दरवर्षी सोसायटी फॉर इंडस्ट्रिअल ॲण्ड अप्लाईड मॅथेमॅटिक्स या संस्थेच्या सहकार्याने सॉन्या कव्हल्येव्हस्कइ व्याख्यान आयोजित केले जाते. याद्वारे उपयोजित आणि संगणकीय गणिताच्या क्षेत्रातील स्त्री संशोधकांच्या लक्षणीय योगदानाकडे लक्ष वेधण्यात येते.

कव्हल्येव्हस्कइ यांच्या संघर्षपूर्ण जीवनाचे चित्रण कादंबऱ्या, चित्रपट आणि दूरदर्शनवरील चरित्रपट यांमधून करण्यात आले आहे. त्यांच्या सन्मानार्थ रशियामध्ये नाणी आणि टपाल तिकिटे काढण्यात आली आहेत. जर्मनीमधील अलेक्झांडर व्हॉन हंबाेल्ट प्रतिष्ठान ही संस्था सन २००२ पासून विविध विज्ञानशाखांमध्ये उल्लेखनीय संशोधन करणाऱ्या तरुण स्त्री किंवा पुरुष संशोधकांना सोफिया कव्हल्येव्हस्कइ पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करते.

कव्हल्येव्हस्कइ यांचे निधन स्टॉकहोम, स्वीडन येथे झाले.