सोनमासा
सोनमासा या माशाचा समावेश अस्थिमत्स्यांच्या (सांगाडा अस्थींचा बनलेला असतो अशा माशांच्या) सायप्रिनिडी मत्स्य कुलात करतात. त्याचे शास्त्रीय नाव कॅरॅसियस ऑरॅटस आहे. ही जाती घरगुती मत्स्यालयात पाळण्याच्या दृष्टीने फारच लोकप्रिय आहे. ती मूळची पूर्व आशियातील असून तिचा प्रसार पुष्कळ देशांत झालेला आहे. आपल्या मूलस्थानात ती उथळ तळी व प्रवाहांत सापडते. यूरोप व उत्तर आशियातील क्रुसियन कार्प (कॅरॅसियस कॅरॅसियस) माशाशी तिचे जवळचे नाते आहे. रंग व लांब पृष्ठपक्ष (पाठीवरील पर म्हणजे हालचाल व तोल सांभाळण्यास उपयोगी पडणारी स्नायुमय घडी) या बाबतींत या दोन्ही जातींचे सामान्य कार्प (साप्रिनस कार्पिओ) माशाशी साम्य आहे; परंतु त्यांच्या ओठावर सामान्य कार्पप्रमाणे सडपातळ स्पर्शग्राही रोम नसतात, हा यांच्यातील भेद आहे.
वर्णन
संपादननैसर्गिक अवस्थेत सोनमाशाचा रंग सामान्यतः हिरवट तपकिरी किंवा करडा असतो. शरीराचा आकार व पर सामान्य कार्पसारखे असतात. त्याच्या रंगात खूप विविधता आणि असामान्यता आढळते. पृष्ठपक्ष नसण्याची शक्यता असते आणि शेपटीचा पर त्रिखंडी असतो. डोळे प्रमाणापेक्षा जास्त बटबटीत असतात. चिनी व जपानी लोकांनी शतकानुशतके काळजीपूर्वक प्रयोग केल्यामुळे सोनमाशाच्या सव्वाशेहून अधिक अभिजाती निर्माण झालेल्या आहेत. मत्स्यालयातील सोनमासा आपल्या नैसर्गिक अधिवासात गेला, तर काही पिढ्या झाल्यानंतर त्याला क्रुसियन कार्पसारखा शरीराचा आकार आणि हिरवा ते आॅलिव्ह रंग पुन्हा येतो.
सोनमासा सर्वभक्षक असून पाठीचा कणा नसलेले सूक्ष्म प्राणी व विशेषेकरून लहान कवचधारी प्राणी, कीटकांच्या अळ्या, कृमी, बेडकांची अंडी, गोगलगायी व मासे खातो, याचबरोबर विविध प्रकारच्या पाणवनस्पतीही खातो. पिलांची वाढ, प्रौढाचा आकार व रंग हे त्याच्या योग्य आहारावर अवलंबून असतात. घरात ठेवलेल्या जलजीवालयातील माशांच्या आहारात बारीक केलेल्या डासांच्या अळ्या, लहान जलकृमी, पूर्ण उकडलेल्या अंड्यांचा बारीक केलेला बलक, तृणधान्य इ. खाद्यांचा समावेश असतो.