सूची
सूची हा संदर्भसाहित्याचा एक प्रकार आहे. मराठी भाषेतील सर्वसामान्य व्यवहारात सूची ही संज्ञा सैलपणे, विविध अर्थांनी वापरण्यात येते.[१] सूची ह्या संज्ञेचे सुई, टोक अथवा (विषयांची) यादी असे विविध अर्थ प्रचलित आहेत.[२] मराठी भाषेत सूची ही संज्ञा विशिष्ट पारिभाषिक अर्थानेही वापरण्यात येते. ह्या अर्थानेही विविध अर्थ प्रचारात आहेत.
- ग्रंथांची, नियतकालिकांतील लेखांची, एखाद्या लेखकावरील, विषयावरील लेखनाची संदर्भसूची
- एखाद्या ग्रंथाच्या अखेरीस देण्यात येणारी त्या ग्रंथांतील व्यक्ती, ग्रंथ, लेख, विषय, स्थळे इत्यादींची निर्देशसूची
- शब्दसूची, काव्यसंग्रहाची, प्रथम-चरणांची सूची[१]
वरीलपैकी निर्देशसूची आणि शब्दसूची ह्यांचा वेगळा विचार करायला हवा असेही काही अभ्यासकांचे मत आहे.[३] बिब्लियोग्रोफी ह्या इंग्लिश संज्ञेचा पर्याय म्हणून मराठीत ग्रंथसूची ही संज्ञा वापरात आहे. ह्यातील ग्रंथ ह्या संज्ञेत काही वेळा हस्तलिखिते, मुद्रित ग्रंथ, नियतकालिके, प्रबंध, चित्रपट, सूक्ष्मपट अशा सर्व प्रलेखांचा समावेश करण्यात येतो.[४]
पारिभाषिक अर्थी सूची म्हणजे केवळ यादी नव्हे. तर विशिष्ट रचना असलेली यादी. तर्कतः अशी सूची कोणत्याही गोष्टीची करता येईल. सुईच्या टोकाने जसा नेमका बिंदू दाखवण्यात येतो तसेच सूचीने नेमका विशिष्ट संदर्भ दाखवण्यात येतो.[१] ह्या अर्थी संदर्भसाहित्य म्हणून संदर्भसामग्रीचा निर्देश करणारे, संदर्भसामग्रीची अधिक माहिती पुरवणारे साधन म्हणजे सूची असे म्हणता येईल.
कोश आणि सूची : साम्यभेद
संपादनरचनादृष्ट्या कोश आणि सूची ह्यांत काही साम्ये असतात. त्यामुळे काही वेळा कोशाचा उल्लेख सूची म्हणून तर काही वेळा सूचीचा उल्लेख कोश म्हणून करण्यात आलेला आढळतो. मात्र कोशात ज्ञानाचा, माहितीचा जसा प्रत्यक्ष संचय असतो तसा सूचीत नसतो. सूची ज्ञानसंचयाच्या दिशा वस्तुनिष्ठपणे दाखवण्याचे कार्य करते. कोश आणि सूची ह्या दोहोंतही नव्या ज्ञानाची निर्मिती किंवा नवे प्रतिपादन नसते. ह्या दोहोंचेही स्वरूप मुख्यतः संकलनात्मक स्वरूपाचे असते.[१] अर्थात कोश व सूची ह्यांचे स्वरूप कालौघात विकसित होत राहणारे असल्याने त्यांचे स्वरूप काही प्रमाणात लवचिक असू शकते.
संदर्भ
संपादन- ^ a b c d चुनेकर, सु. रा.; सूची : स्वरूप, शास्त्र व इतिहास; समाविष्ट : दादेगावकर, उमा (संकलन); आनंद साधले : साहित्यसूची; १९९०; मॅजिस्टिक प्रकाशन; मुंबई (पृ. १८)
- ^ दाते, यशवंत रामचंद्र आणि कर्वे, चिंतामण गणेश; महाराष्ट्र शब्दकोश; शिकागो विद्यापाठाच्या संकेतस्थळावरील संगणकीय आवृत्तीतील सूची ह्या शब्दाची नोंद[permanent dead link]. दि. २६ जानेवारी २०१७ रोजी २१:२० वाजता पाहिल्यानुसार
- ^ चुनेकर, सु. रा.; सूची : स्वरूप, शास्त्र व इतिहास; समाविष्ट : दादेगावकर, उमा (संकलन); आनंद साधले : साहित्यसूची; १९९०; मॅजिस्टिक प्रकाशन; मुंबई (पृ. १९)
- ^ कुलकर्णी, वसंत विष्णु (संपा.); मराठी कोश व संदर्भसाधने ह्यांची समग्र सूची (इ. स. १८०० – २००३); २००७; राज्य मराठी विकास संस्था; मुंबई; (पृ. एकवीस)