सुवर्णपर्ण किंवा स्टार ॲपल (शास्त्रीय नाव: Chrysophyllum cainito Linn) हा एक वृक्ष आहे.

Chrysophyllum
Starr 070906-8590 Chrysophyllum cainito
Star Apple (Kaimito)

भारतातील उष्ण हवामान असलेल्या भागांत, बेळगावात चोरला घाट,उत्तर कारवार,सावंतवाडी,आंबोली येथे सुवर्णपर्ण आढळून येतो.सुवर्णपर्णाच्या १७० जाती असल्या तरी भारतात मात्र दोन ते तीनच जाती आढळतात.याचे प्रचलित नाव आहे 'स्टार ॲपल'.याचे फळ कापल्यावर सफरचंदाप्रमाणेच मध्यभागी एक षटकोनी तारा दिसतो म्हणून हे नाव पडले आहे. हे सदाहरित झाड ३० ते ६० फुट व क्वचित १०० फुट उंचीपर्यंत वाढतं.ही झाडे चांगल्या जमिनीवर तर वाढतातच पण रेताड वा चिकणमातीसदृश जमिनीवरही वाढतात.बिया रुजल्यामुळे तसेच नवे अंकुर-फुटवे यांच्या कलमांमुळेही याची वाढ होते.

ऑगस्ट महिन्यात फुले येतात.पांढरट फुलांचे घाणेरीप्रमाणे झुबे आणि नंतर येणारी व डिसेंबरपर्यंत दिसणारी,हिरवट पिवळसर,कच्च्या टोमॅटोच्या वा ढेमशांच्या रंगाची फळंही पानांच्या पसाऱ्यात सहजासहजी दिसत नाहीत.चिकुसारखा चिकट पांढरा चीकही याच्या अपरिपक्व फळात आढळतो.फळं टणक,गोल वा लंबगोल आकाराची,गोडसर व तुरट मांसल गराची असतात.फळे झाडावरच पिकली कि गराला गोडवा येतो. पानांचा आकार टोकदार व उपशाखांना १० ते १२ पानं किंचित आतल्या वा बाहेरच्या बाजूला वळलेली असतात.पानांची वरची बाजू मऊसर व चकचकीत हिरवीगार असते तर पाठची बाजू तांबूस झळाळत्या मखमली लवीने आच्छादलेली असते. याचे खोड करड्या मातकट रंगाचे,भेगाळलेले,जिग-सॉ पझलच्या तुकड्यांप्रमाणे चिपा असलेले असते.लाकूड हलक्या-तपकिरी रंगाचे व मऊ असते.बांधकामासाठी याचा वापर होतो.फांद्या जमिनीला समांतर असल्या तरी उपशाखा जमिनीकडे झुकलेल्या असतात.

संदर्भ

संपादन
  • वृक्षराजी मुंबईची - डॉ.मुग्धा कर्णिक