सुलभा ब्रह्मे (इ.स. १९३२ - १ डिसेंबर, इ.स. २०१६) या पुण्यात राहणाऱ्या मार्क्सवादी विचारवंत आणि राजकीय व सामाजिक चळवळीत भाग घेणाऱ्या एक उच्च दर्जाच्या मराठी अर्थतज्ज्ञ होत्या.

सुलभा ब्रह्मे यांचे वडील प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष व अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ, आई सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला काळे गाडगीळ आणि भाऊ विख्यात पर्यावरणवादी व लेखक माधव गाडगीळ होत.

सुलभा ब्रह्मे यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या हुजुरपागा शाळेतून आणि महाविद्यालयीन शिक्षण एस.पी. कॉलेजातून झाले. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्समधून त्यांनी अर्थशास्त्रात पीएच.डी. केले.

जनतेचा आर्थिक विकास, पर्यावरण, सेंद्रिय शेती, अणुबाँबविरोधी चळवळ, स्त्रियांचे हक्क, जातवाद, जमातवाद, लोकशिक्षण, सर्वधर्मसमभाव आणि संस्कृतीसंवर्धन या विषयांवरील लोकचळवळीत सुलभा ब्रह्मे यांचा सक्रिय सहभाग होता.

सुलभा ब्रह्मे या सेंद्रिय व सर्व परिस्थितीत टिकाव धरू शकेल अशा कोकणातील शेतीसाठी प्रयोगशील होत्या. त्यासाठी त्यांनी या विषयावरील ५०हून अधिक पुस्तिका लिहून प्रकाशित केल्या होत्या.

शंकर ब्रह्मे समाज विज्ञान ग्रंथालय

संपादन

सुलभा ब्रह्मे यांनी स्थापन केलेली ही संस्था महाराष्ट्रातील डाव्या, प्रागतिक आणि धर्मनिरपेक्ष चळवळींचे केंद्र होती. संस्थेमध्ये संशोधन चाले आणि जनतेत जागृती करणाऱ्या महत्त्वाच्या विविध ज्वलंत विषयांवरील पुस्तिकांचे प्रकाशन होई.

सुलभा ब्रह्मे यांच्या सहभागाने स्थापन झालेल्या अन्य संस्था

संपादन
  • जागतिकीकरणविरोधी कृती समिती
  • पुरोगामी महिला संघटना
  • बायजा ट्रस्ट
  • महाराष्ट्र दुष्काळ निवारण आणि निर्मूलन मंडळ
  • लोकविज्ञान संघटना
  • लोकायत, वगैरे.