सुलभा शरद पिशवीकर (माहेरच्या गोडबोले) या एक शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायिका असून संगीत विषयावर लिहिणाऱ्या लेखिका आहेत.

सुलभा पिशवीकर या एस.एस.सी.च्या परीक्षेत महाराष्ट्र बोर्डात आठव्या आल्या होत्या. त्यावेळी त्यांना बोर्डाचे ’चॅटफील्ड पारितोषिक’ आणि मराठीचे ’पद्मसेना बाबूराव जोशी पारितोषिक’ मिळाले होते. पुणे विद्यापीठाच्या परीक्षेत अर्थशास्त्राचे ’कोल्हटकर’ पारितोषिक मिळवून पिशवीकर अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांत बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. १९६७ ते २००१ या काळात त्यांनी महाविद्यालयात राज्यशास्त्राचे अध्यापन केले.

श्यामराव बेंद्रे, पंडित प्रभुदेव सरदार. सरदारबाई कारदगेकर, गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्याकडे सुलभा पिशवीकर यांनी संगीताचे शिक्षण घेतले. पुणे विद्यापीठ युवक महोत्सवात त्यांना दोन वेळा शास्त्रीय संगीताचे ’नाट्याचार्य खाडिलकर पारितोषिक’ मिळाले आहे.आकाशवाणी्च्या आणि दूरदर्शनच्या त्या अर्हताप्राप्त कलाकार आहेत. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर प्रतिष्ठित संगीत मंडळांत आणि संगीत संमेलनांत त्यांचे गायन होत असते.

मराठवाडा विद्यापीठात मराठीच्या रेफ्रेशर कोर्समध्ये सहभागी झालेल्या प्राध्यापकांसाठी ’भारतीय संगीत : आस्वाद आणि आकलन’ याविषयावर प्रात्यक्षिकांसहित व्याख्यान देण्यासाठी, डॉ. पानतावणे यांनी पिशवीकरांना आमंत्रित केले होते. सोलापूरमध्येही यमन रागाची वैशिष्ट्ये, बंदिशी, गाणी असे सर्व सांगणारा ’बहुरूपी यमन’ नावाचा कार्यक्रम बाईंनी शिष्यमंडळींना बरोबर घेऊन सादर केला होता.

महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, नवशक्ती, संचार, केसरी, लोकमत, सकाळ तरुण भारत आणि सोलापूरमधील स्थानिक वृत्तपत्रे यांत पिशवीकरांचे संगीतविषयक स्फुट लिखाण प्रसिद्ध होत असे. रविवारच्या लोकसत्तेमध्ये सुलभा पिशवीकर आणि त्यांचे बंधू अच्युत गोडबोले हे दोघे मिळून ’नादवेध’ नावाची संगीतविषयक लेखांची मालिका लिहीत असत. त्याच लेखांचा संग्रह पुढे ’नादवेध’ या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित झाला.