सुईचे विणकाम
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
सूत, तंतू किंवा धागे विणून कापड तयार करण्याच्या कलेला विणकाम म्हणतात. उभे (ताणा)व आडवे (बाणा) धागे एकमेकांमध्ये पद्घतशीरपणे गुंतवून कापड विणले जाते. धागे एकमेकांत गुंतविण्याचे हे काम मागाच्या किंवा एका वा अनेक सुयांच्या मदतीने केले जाते. सुयांच्या मदतीने करण्यात येणाऱ्या विणकामात अखंड धाग्यामध्ये अंतर्बंधित फासांची मालिका तयार होत जाऊन कापड तयार होते. हे विणकाम हातांनी किंवा यंत्राने केले जाते. या फासांचे उभे स्तंभ म्हणजे वेल आणि फासांच्या आडव्या ओळी म्हणजे कोर्स होत.
विणकामाच्या बहुतेक सुया १८–३५ सेंमी. लांब असतात. सुईचे एक टोक अणकुचीदार व फासे सुईवरून सरकून निघून जाऊ नये म्हणून दुसऱ्या टोकाला बोंड असते. पूर्वी सुईच्या एका टोकाला आकडा असून तो झाडाची डहाळी, हाडाचे तुकडे वा तांब्याच्या तारेचा असे. आता आधुनिक सुयांची टोके बोथट असतात आणि सर्वसाधारणपणे त्या ॲल्युमिनियम, पोलाद, लाकूड किंवा प्लॅस्टिक यांच्या असतात. कोणते कापड विणायचे त्याच्या स्वरूपानुसार सुयांची जाडी व धाग्याचे प्रकार ठरवितात. नाजुक कापडासाठी बारीक सुई व वजनाला हलका धागा निवडतात, तर भरड कापडासाठी जाड सुया व भरड धागा वापरतात. लोकरीचा धागा हा सुयांच्या विणकामाचा परंपरागत धागा आहे. मात्र कापसाचे सूत, रेशीम किंवा ॲक्रिलिकासारखे कृत्रिम तंतूही या विणकामासाठी वापरतात. तसेच अशा तंतूंचा संमिश्र धागाही वापरतात. सपाट कापड विणण्यासाठी दोन सुया तर मोजाचे नलिकाकार कापड विणण्यासाठी तीन वा चार सुया वापरतात. सुयांच्या विणकामाच्या ताणा पद्घत, बाणा पद्घत, गोल पद्घत व मिश्र पद्घत या प्रमुख पद्घती आहेत.
स्वेटर, मोजे, स्कार्फ, टोप्या, बनियन वा गंजीफ्रॉक इ. अनेक होजियरी कपडे सुयांच्या विणकामाने तयार करतात. हे कपडे ताणता येतात व ताण काढल्यावर ते सामान्यपणे मूळ आकाराचे होतात, म्हणून असे कपडे लोकप्रिय झाले आहेत. नाजुक झालरी (लेस) ते जाड रग यांसारखे कापडही सुयांनी विणतात. सजावटीच्या व सुशोभनाच्या कापडी वस्तूही सुयांच्या विणकामाद्वारे तयार केल्या जातात