सिमरनजीत कौर बाठ (जन्म 10 जुलै 1995[१] ) ही पंजाबमधील एक हौशी भारतीय बॉक्सर आहे.[१]२०११पासून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. 2018च्या एआयबीए जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत सिमरनजीतने भारतासाठी कांस्यपदक जिंकले होते. इस्तंबुल (तुर्की) येथे आयोजित अहमत कॉमर्ट आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठीच्या भारतीय महिला बॉक्सिंग संघाचा ती भाग होती. एवढेच नव्हे तर तिने 64 किलोग्राम वजनगटात सुवर्णपदक जिंकले. 2021मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिमरनजीत 60 किलो वजनगटात बॉक्सिंग करणार आहे. [1][2]

वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी संपादन

सिमरनजीतचा जन्म पंजाबमधील चाकर गावातील एका गरीब कुटुंबात झाला. तिची आई लोकांच्या घरांमध्ये काम करत असत, तर वडील अगदीच तुटपुंज्या पगारात एका दारूच्या दुकानात काम करायचे. मात्र घरात तिचे भाऊ आधीच बॉक्सिंगमध्ये होते. त्यामुळे सिमरनजीतच्या आईने तिला सर्वतोपरी मदत करत तिच्या मोठ्या भावंडांच्या पावलांवर पाऊल ठेवून पुढे जाण्यास प्रोत्साहन दिले.


सिमरनजीतची मोठी बहीण आणि दोन धाकटे भाऊसुद्धा बॉक्सर आहेत. परंतु त्यांच्यापैकी कोणीही तिच्याएवढी उंची गाठू शकले नाही. [3]


सिमरनजीतने मात्र एक शिक्षिका होण्याचे स्वप्न पाहिले होते. परंतु आपल्या मुलीने बॉक्सर व्हावे, असा तिच्या आईचा आग्रह होता. त्यांनी तिला गावातील शेर-ए-पंजाब बॉक्सिंग अकादमीमध्ये दाखल केले आणि तिला या खेळासाठी प्रोत्साहित केले. शेवटी सिमरनजीतने ते मान्य केले. [4]

मात्र जुलै 2018मध्ये तिच्या वडिलांच्या निधनाने सिमरनजीत आणि तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. [5]


सिमरनजीतच्या आईने मात्र आपल्या मुलीला धीर दिला आणि तिच्या पाठीशी उभी राहिली. त्यांचा असा दृढ विश्वास होता की क्रीडाक्षेत्रात नाव कमावून मोठे होणे, हाच दारिद्र्यातून स्वतःला बाहेर काढण्याचा आणि यशस्वी आयुष्य जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

व्यावसायिक कारकीर्द संपादन

2011 साली पतियाळामध्ये झालेल्या 6व्या ज्युनिअर महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सिमरनजीतने कांस्यपदक जिंकले. त्यानंतर 2013मध्ये आयोजित 8व्या ज्युनियर महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत तिने रौप्यपदक पटकावले. सिमरनजीतने सुरुवात 48 किलो वजनगटात केली होती, पण कालांतराने ती वरच्या वजनगटांमध्ये खेळू लागली.


2013मध्ये झालेल्या जागतिक युवा चॅम्पियनशिपमध्ये तिने 60 किलो वजनगटात भारताचे प्रतिनिधित्व केले आणि कांस्यपदक जिंकले. 2015मध्ये गुवाहाटी येथील न्यू बोंगाईगाव येथे 16व्या सिनियर (ईलीट) महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले.


2016 मध्ये हरिद्वार येथे झालेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये ती सुवर्णपदक जिंकत सर्वोत्कृष्ट बॉक्सर ठरली. तसेच तिने सिनिअर नॅशनलमध्ये रौप्य आणि ओपन नॅशनलमध्ये कांस्यपदके जिंकली. त्यानंतर कझाकस्तान येथे 2017 मध्ये झालेल्या सिनिअर आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये तिने आणखी दोन कांस्यपदकांची भर घातली.


2018मध्ये वडिलांच्या निधनानंतर, सिमरनजीतने तुर्कीतील 32व्या अहमत कॉमर्ट बॉक्सिंग स्पर्धेत 64 किलो वजनगटात सुवर्णपदक पटकावले. तिने हे पदक तिच्या वडिलांना समर्पित केले. [6]


नवी दिल्ली येथील 2018च्या एआयबीए महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठीच्या 10-सदस्यीय भारतीय संघात ती सहभागी झाली होती. त्या स्पर्धेत लाईट वेल्टरवेट श्रेणीत तिने भारतासाठी कांस्यपदक जिंकले होते. [6]


2019मध्ये इंडोनेशियातील लाबुआन बाजू येथे झालेल्या 23व्या प्रेसीडेंट्स चषक आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग टूर्नामेंटमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले. [1]


मार्च 2020मध्ये ती टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली. पात्र ठरल्यास रोख बक्षीस आणि नोकरी देण्याचे आश्वासन पंजाब सरकारने तिला दिले होते. आपल्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी ही मदत आवश्यक असल्याचे सिमरनजीतने म्हटले होते.[7]

संदर्भ संपादन

Simranjit Kaur (boxer) English Wikipedia [1]

Ludhiana girl Simranjit Kaur wins gold at international boxing tournament[2]

ਮੁੱਕੇਬਾਜ਼ ਸਿਮਰਨਜੀਤ ਕੌਰ ਦੀ ਮਾਂ ਦੀ ਕਹਾਣੀ ਜਿਸ ਨੇ ਘਰਾਂ 'ਚ ਕੰਮ ਕਰਕੇ ਧੀ ਨੂੰ ਓਲੰਪਿਕ ਪਹੁੰਚਾਇਆ[3]

Simranjit Kaur wanted to be a teacher but her mother nudged her towards boxing [4]

Pushed into boxing by her mother, Simranjit Kaur packs a punch on world championship debut[5]

Boxing federation of India [6]

https://timesofindia.indiatimes.com/sports/boxing/boxer-simranjit-kaur-finally-gets-her-due-reward-from-punjab-govt/articleshow/77873691.cms (7)

  1. ^ a b Kaur, Simranjit; Arun, Priti; Singh, Sukhwinder; Kaur, Damanjeet (2018-12). "EEG Based Decision Support System to Diagnose Adults with ADHD". 2018 IEEE Applied Signal Processing Conference (ASPCON). IEEE. doi:10.1109/aspcon.2018.8748412. ISBN 978-1-5386-6686-9. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)