सिंको दे मायो
सिंको दे मायो (स्पॅनिश अर्थ : मे महिन्याचा ५ वा दिवस) हा उत्सव दरवर्षी ५ मे रोजी साजरा केला जातो. हा उत्सव मुख्यत्वे मेक्सिकोमधील प्युबला राज्यात प्युबेला युद्धदिनाच्या स्मरणासाठी साजरा केला जातो. अमेरिकेत हा उत्सव मेक्सिकन नागरिक राहत असलेल्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अमेरिकेत हा दिवस मेक्सिकन संस्कृतीच्या गौरवार्थ साजरा करतात. ५ मे १८६२ रोजी इग्नाशिओ झारागोझा सेगुइन यांच्या नेतृत्वाखाली मेक्सिकन लष्कराने प्युबला येथे झालेल्या युद्धात फ्रेंच लष्कराचा अनेपेक्षितरित्या पाडाव करून विजय संपादन केला. साधारण गैरसमजातून हा दिवस मेक्सिकोचा स्वातंत्र्यदिन मानला जातो, पण प्रत्यक्षात १६ सप्टेंबर हा मेक्सिकोचा स्वातंत्र्यदिन आहे.