सार्वजनिक वाचनालय (नाशिक)

(सावाना या पानावरून पुनर्निर्देशित)

सार्वजनिक वाचनालय नाशिक, हे नाशिक येथील प्रमुख वाचनालय आहे. हे वाचनालय सावाना म्हणूनही ओळखले जाते. येथे सुमारे एक लाखाहून अधिक पुस्तके आहेत. ही संस्था वाचनालयापुरती मर्यादित नसून ती एक सांस्कृतिक चळवळ हे असे मानले जाते. हे वाचनालय नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात शालिमार चौकाजवळ नेहरू गार्डनच्या समोर आहे. परशुराम सायखेडकर नाट्यगृह हा वाचनालय याचाच एक भाग आहे. वाचकांना वाचनाचा मुक्तपणे आणि मोफत आनंद घेता यावा यासाठी सावाना वाचनालयात मुक्तद्वार विभाग आहे. वाचनालयाची सरकार वाडा येथेही एक शाखा आहे. मुख्य ग्रंथालय आणि त्याचबरोबर सरकार वाडा शाखा अशा दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे तीन हजार वाचक दररोज या विभागांचा विनामूल्य लाभ घेतात.

इतिहास संपादन

या वाचनालयाची स्थापना सरकारवाड्यात झाली. त्यावेळी तिथे इंग्रजी राजवटीची कार्यालये होती. इ.स. १८८३च्या अहवालात वाचनालयात असलेल्या दोन हजार पुस्तकांचा उल्लेख आढळतो. हा काळ ग्रंथाच्या वाढ आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा होता. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि लोकहितवादी यांचादेखील सहवास काही काळ नाशिकला होता. त्यांचादेखील या सार्वजनिक

ग्रंथालयाशी संबंध आलेला आहे. लोकहितवादींनी काही ग्रंथ हे नाशिकच्या वास्तव काळामध्ये लिहिले. त्या ग्रंथातील मजकुर नाशिक क्षेत्राशीजुळणारा आहे. या काळामध्ये संदर्भासाठी इतरत्र कुठलेही ग्रंथालय उपलब्ध नव्हते.अशा वेळेस याच ग्रंथालयाचा त्यांना उपयोग झालेला असणार,तसेच या काळात ग्रंथालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी न्यायाधीशांना सरकारने सूचना केलेली होती. परिणामस्वरूप न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी हे न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित असल्यामुळे त्यांचा या ग्रंथालयांनी जवळून संबंध आलेला होता, हे तर्काधिष्ठित पुराव्यांच्या आधारे सिद्ध करणे सहज शक्य आहे.  वाचनालयाची जागा अपुरी पडू लागल्याने हे वाचनालय गो.ह. देशपांडे पथावरील राजेबहाद्दर यांच्या वाड्यात स्थानांतरण करण्यात आले. इ.स. १९२४ साली पुन्हा वाचनालय सरकार वाड्यातील दुसऱ्या मजल्यावर स्थलांतरित करण्यात आले.

वाचनालयातील काही अतिशय जुन्या ग्रंथांत व कागदपत्रांवर असलेल्या हस्तलिखित नोंदींनुसार या वाचनालयाची खालील नावे आढळतात. सुरुवातीच्या काळात काही ब्रिटिश अधिकारी ग्रंथालयाची संबंधित असल्याचा पुरावा देखील उपलब्ध होतो.

  • नाशिक सिटी लायब्ररी
  • नेटिव्ह जनरल लायब्ररी
  • नाशिक लायब्ररी ॲन्ड रीडिंग रूम
  • नाशिक जनरल लायब्ररी

तसेच 'नाशिक पुस्तकालय' हा मराठी मजकूर असलेला जुना शिक्का येथे संग्रही आहे. इ.स. १९२४ साली वाचनालयाची घटना नव्याने तयार केली गेली. या घटनेमध्ये सर्वप्रथम 'सार्वजनिक वाचनालय, नाशिक' असे नाव आले आहे.

इ.स. १९०५ मध्ये कवी गोविंद व स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्यप्रतिमेचा लाभ वाचनालयाला मिळाला. इ.स. १९४७ मध्ये वाचनालयात बालविभाग सुरू झाला. तसेच वाचनालयाला कुसुमाग्रज, डॉ. अ.वा. वर्टी, वसंत कानेटकर अशा थोर व्यक्तींचा आणि अनेक साहित्यिकांचा सहवास मिळालेला आढळतो. साहित्यिक आणि सुधारकांच्या सहवासामध्ये या ग्रंथालयाची मोठी जडणघडण झाली कविश्रेष्ठ वि वा शिरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली या ग्रंथालयाचा मोठा विकास झाला जे सुरुवातीला या ग्रंथालयाचे वाचक म्हणून या ग्रंथालयात येत होते तेच पुढे नाशिककर साहित्यिक नटसम्राट कार वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज हे या ग्रंथालयाचे दहा वर्ष अध्यक्ष राहिले या त्यांच्या कार्यकाळात मध्ये अनेक राजकीय सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांनी या ग्रंथालयाला भेटी दिल्या तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण यांनी या ग्रंथालयासाठी शासनाकडून मोठी मदत देऊ केली एकूणच हा कालखंड ग्रंथालयाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरला

स्वरूप संपादन

या वाचनालयात १ लाख ७० हजार पुस्तके आहेत. वाचनालयात आज सुमारे ४ हजार ५०० संस्कृतमधील दुर्मीळ हस्तलिखिते आहेत. यातील ३ हजार १५३ पोथ्यांची नोंद भारत सरकारच्या डिजिटल वाचनालयात घेतली गेली आहे. डिजिटलायझेशने उर्वरित काम इ.स. २०११ मध्येही सुरू होते. वाचनालयाच्या संदर्भ विभागात अनेक प्रकारची दुर्मीळ ग्रंथसंपदा आहे. अनेक ठिकाणी सर्वसामान्य वाचकाला पुस्तके उपलब्ध व्हावीत म्हणून वाचनालयाने ‘पेटी वाचनालय’ योजना सुरू केली आहे. गंगापूर रोड येथे सावानाचे ‘उद्यान वाचनालय’ आहे.

आधुनिकीकरण संपादन

इ.स. १९६२ मध्ये कुसुमाग्रज यांनी विनंती केल्यावर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी नव्या इमारतीसाठी आर्थिक मदत दिली. मे ३१ इ.स. १९६८ या दिवशी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते, नव्या इमारतीची कोनशिला बसविण्यात आली. तर ६ ऑगस्ट रोजी नव्या इमारतीच्या प्रवेश दालनास 'नगरपालिका दालन' असे नाव मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते देण्यात आले.

सांस्कृतिक वारसा संपादन

आद्य साहित्यिक संस्था असलेल्या वाचनालयात इ.स. १९२४ पासून नाशिक बाहेरील विद्वान, तपस्वी, साहित्यिक अध्यक्ष म्हणून निमंत्रित करण्याची प्रथा सुरू झाली.

उपक्रम संपादन

  • साहित्य मेळावा
  • काव्य वाचन
  • बालभवन सानेगुरुजी कथामाला
  • बालनाटय़ स्पर्धा
  • सावाना ग्रंथालय सप्ताह - विविध पुरस्कारांचे वितरण
  • के.ज. तथा काकासाहेब आकूत स्मृती व्याख्यान
  • जिल्हा साहित्यिक मेळावा
  • शिक्षक दिन
  • माधवराव लिमये कार्यक्षम आमदार पुरस्कार
  • पुस्तक मित्र मंडळ
  • पानसे अभ्यासिका
  • परशुराम सायखेडकर नाट्यगृह
  • वस्तुसंग्रहालय
  • वा. गो. कुलकर्णी कलादालन
  • यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ग्रंथालयशास्त्राचे बी.लिब., एम्‌.‍लिब. व एम्‌.फिल.चे वर्ग
  • महनीय वक्त्यांचे व पाहुण्यांचे विचारधन ऑडिओ आणि व्हीडिओ कॅसेटद्वारे संग्रहित
  • खुला रंगमंच
  • मुक्तद्वार व ग्रंथ देवघेव विभाग
  • अन्नपूर्णाबाई डोळे स्मृती व्याख्यान
  • शालेय पातळीवर कथाकथन स्पर्धेचे आयोजन

दिले जाणारे पुरस्कार संपादन

  • सावाना ग्रंथ पुरस्कार
  • ग्रंथालय भूषण मु. शं. औरंगाबादकर स्मृती पुरस्कार
  • सावित्रीबाई वावीकर पुरस्कार
  • ग.वि. अकोलकर पुरस्कार
  • मु. ब. यंदे पुरस्कार
  • पु. ना. पंडित पुरस्कार
  • डॉ. अ. वा. वर्टी कथालेखक पुरस्कार - उमेदीने कथा लेखनासाठी
  • वि.म. गोगटे पुरस्कार - ललितेतर माहितीपर ग्रंथासाठी
  • स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर पुरस्कार - अनुवादित ग्रंथासाठी (एक वर्षाआड)
  • वि.मा.दी. पटवर्धन पुरस्कार - विनोदी पुस्तकासाठी
  • अलकनंदा आकूत स्मृती पुरस्कार - नाशिक शहरातील पदवी परीक्षेत मराठी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला दिला जातो.
  • बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार

हेही पाहा संपादन