सह्याद्री माहात्म्य

(सह्याद्रि-माहात्म्य या पानावरून पुनर्निर्देशित)


सैह्याद्री-माहात्म्य किंवा सैह्याद्रवर्णन हा महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. कर्ता रवळोबास (हिराइसा हिचा शिष्य). प्रस्तुत काव्यात सह्याद्रीवर वास्तव्य करणाऱ्या व त्यांचे क्रीडास्थान असलेल्या श्रीदत्तात्रेयांचे चरित्र वर्णन केले आहे. ग्रंथात एकूण ५१७ ओव्या आहेत. त्यांत श्रीचक्रधरांचे अवतारकार्य व त्याच्या अनुषंगाने कवीचे आत्मनिवेदनही या काव्यात येते. किंबहुना ह्या दुसऱ्या विषयालाच या काव्यात अधिक जागा मिळाली आहे. महानुभावांच्या साती ग्रंथापैकी सह्याद्रि-वर्णन असलेले हे पहिलेच सर्वस्वी स्वतंत्र असे काव्य आहे, असे अ. ना. देशपांडे यांनी म्हटलेले आहे.

सह्याद्रि-माहात्म्य
लेखक रवळोबास
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार ग्रंथ

सह्यादि-माहात्म्यच्या एकाहून अधिक पोथ्या उपलब्ध आहेत. त्यांतील डॉ. वि.भि. कोलते यांनी ग्रंथसंपादनासाठी घेतलेली पोथी सकळा ऊर्फ नागरी लिपीत(महानुभावांच्या सकळा, सुंदरी, ब्रज, अंक, मनोहर अशा अनेक सांकेतिक लिप्यांपैकी एकीत) असून, नक्कलकार गोविंदमुनिसुत हा आहे. लेखनसमाप्तिकाल शके १५७० कीलक संमत्सर, आश्विन वद्य सप्तमी असा दिला आहे. मूळ ग्रंथ शके १२५४ ते १२७५ यादरम्यान केव्हातरी लिहिला गेला असावा.

सह्याद्रि-माहात्म्य या काव्यारंभी श्रीदत्तात्रेयांना वंदन करता चक्रपाणि यांनाच केले आहे. श्रीदत्तात्रेय-->श्रीचक्रपाणि-->श्रीगोविंदप्रभु-->श्रीचक्रधर अशी ती परंपरा आहे. सैह्याद्रवर्णनातून स्पष्ट होणारे दत्ताचे स्वरूप एकमुखी दत्ताचे आहे. श्रीनृसिंहसरस्वतींची त्रिमुखी दत्तपरंपरा ही दत्त संप्रदायाची एक वेगळी शाखा आहे.

सैह्याद्रवर्णन काव्यातील सह्याद्री म्हणजे माहूरचा डोंगर. हा माहूर डोंगर, महाराष्ट्रातील अजिंठा या डोंगर रांगेची एक शाखा आहे. त्याला पूर्वी सह्य म्हणत असत. हेच श्रीदत्तप्रभूंचे निवासस्थान. त्या स्थानाचे जुने नाव मातापूर. पश्चिम घाटावरील सह्याद्री डोंगराशी या काव्यातील सह्याद्रीचा काही संबंध नाही. सैह्यादी-माहात्म्य हे काव्य, कवीचे वर्णनचातुर्य, त्याची प्रतिभासृष्टी आणि काव्यातला रसाविष्कार या दृष्टीने वाचले तर, रवळोबास हे एक एक प्रतिभावंत कवी होते असे प्रत्ययास येते.

हे सुद्धा पहा

संपादन