सरासरी यामिकी ही भौतिकशास्त्राची एक शाखा आहे ज्यामध्ये संभाव्यता सिद्धान्ताचा उपयोग करून ज्यांची स्थिती पूर्णपणे निश्चित नाही, किंवा ज्या संहति इतक्या किचकट आहेत की संपूर्णपणे ज्यांच्या वागणुकीचे गणितीय वर्णन शक्य नाही (किंवा दोन्ही),.अशा यामिकीय संहतींच्या वर्णनाचा अभ्यास केला जातो. अशा संहतीचे साधे उदाहरण म्हणजे एखाद्या बंद खोक्यामधे असलेला वायू. हा वायू प्रचंड संख्येच्या रेणूंचा समूह आहे. परंतु या सर्व रेणूंची स्थिती आणि गती कोणत्याही एका क्षणी जाणून घेणे अशक्य आहे. मात्र या वायूचा अभ्यास करण्यासाठी ते जाणणे आवश्यकदेखील नाही. यातील प्रत्येक रेणू हे यामिकीचे साधे नियम पाळतो आणि तो खोक्याच्या भिंतीबरोबर आणि इतर रेणूंबरोबर अन्योन्यक्रिया करतो. परंतु रेणूंची संख्या प्रचंड असल्याने यामिकीचे नियम जसेच्या तसे लावून या खोक्यातील वायूचे वर्णन करणे केवळ अशक्य आहे. सरासरी यामिकी आपल्याला अशा संहतींचे सरासरी वर्णन करण्याची सोय करून देते.